आंबेडकर जयंतीसाठी तरतूद नाही, न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 04:09 AM2018-04-05T04:09:37+5:302018-04-05T04:09:37+5:30

‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उधळपट्टी नको’ या न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने जारी केलेल्या परिपत्रकाचा फटका शिवजयंतीप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही बसला आहे.

There is no provision for Ambedkar Jayanti, court order | आंबेडकर जयंतीसाठी तरतूद नाही, न्यायालयाचा आदेश

आंबेडकर जयंतीसाठी तरतूद नाही, न्यायालयाचा आदेश

Next

पुणे - ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उधळपट्टी नको’ या न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने जारी केलेल्या परिपत्रकाचा फटका शिवजयंतीप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही बसला आहे. यानिमित्त कार्यक्रम करण्यासाठी म्हणून महापालिकेच्या अंदाजपत्रकात कसलीही तरतूद करण्यात आलेली नाही, मात्र तरीही जयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्धार यानिमित्त महापालिका सभागृहात बुधवारी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. जयंतीदिनाच्या नियोजनासाठी म्हणून महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका सभागृहात शहरातील विविध संघटना, संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयच्या (आठवले) गटनेत्या सुनीता वाडेकर, एमआयएमच्या गटनेत्या अश्विनी लांडगे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग, डॉ. प्रवीण मुंडे, नगरसेवक अजय खेडेकर, आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महापौरांनी यावेळी महापालिकेने जयंतीदिनासाठी केलेल्या विविध सुविधांची माहिती दिली. पुतळ्याच्या परिसरात फ्लेक्स लावले जातात, त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. पीएमपीच्या फेºया वाढवण्यास सांगण्यात येणार आहे, असे महापौरांनी सांगितले. अशा प्रकारच्या बैठका आयोजित करून अंमलबजावणी करण्याची मागणी मिलिंद अहिरे यांनी केली. अ‍ॅड. वैशाली चांदणे, हनुमंत गायकवाड, योगेश पिंगळे, उमेश चव्हाण, श्याम गायकवाड, नीलेश गायकवाड यांच्यासह आंबेडकरी चळवळीत काम करणाºया पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही यावेळी अनेक सूचना केल्या.

कायद्याचे उल्लंघन नको
कोरेगाव भीमा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विविध दलित संघटना आक्रमक आहेत. त्यामुळे पोलीस अधिकाºयांनी चिंता व्यक्त करीत कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये. तसे काही आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. नागरिकांनीच याबाबत सतर्क रहावे व कुठेही काहीही अनुचित प्रकार, घटना, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना त्याची माहिती कळवावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांनी केले.

उपमहापौर डॉ. धेंडे यांनी न्यायालयाचा आदेश व सरकारी परिपत्रक यामुळे जयंतीसाठी अंदाजपत्रकात तरतूद नसली तरीही महापालिकेच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. संस्था, संघटना यांनी महापालिकेची मदत हवी असेल तर त्याबाबत त्वरित सांगावे, रस्ते किंवा परिसर स्वच्छता याबाबत संबंधित विभागांना आदेश देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

Web Title: There is no provision for Ambedkar Jayanti, court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.