स्वारगेट हबचे काम लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 02:28 AM2018-04-24T02:28:28+5:302018-04-24T02:28:28+5:30

पीएमपीएल या तिन्ही प्रवासी सेवांचा अत्युत्कृष्ट समन्वय या बहुमजली हबमधून प्रत्यक्षात येणार आहे.

Swargate hub work soon | स्वारगेट हबचे काम लवकरच

स्वारगेट हबचे काम लवकरच

Next

पुणे : महामेट्रोच्या स्वारगेट चौकातील बहुमजली ट्रान्स्पोर्ट हबचे काम येत्या १५ दिवसांत सुरू होणार आहे. सुमारे २० एकर जागेत हे स्थानक होणार असून, त्यातून एसटी, मेट्रो व पीएमपीएल यांचे एकात्मिक व्यवस्थापन साकार होणार आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. शहरातील प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो, एसटी तसेच पीएमपीएल या तिन्ही प्रवासी सेवांचा अत्युत्कृष्ट समन्वय या बहुमजली हबमधून प्रत्यक्षात येणार आहे. त्याचा आराखडा निश्चित करण्यात आला असून, त्यासाठीच्या निविदांची मुदतही संपली आहे. येत्या काही दिवसांमध्येच या महत्त्वाकांक्षी हबचे काम सुरू होईल, अशी खात्री दीक्षित यांनी व्यक्त केली.
जागेसाठी महापालिका, एसटी महामंडळ तसेच पीएमपी यांनी सहकार्य केले आहे. एकूण २० एकर जागेत हे बहुमजली स्थानक असेल. त्यात कॅब कंपन्यांनाही सामावून घेण्यात येणार आहे. प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये अशा प्रकारची व्यवस्था या हबमध्ये असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा त्यात देण्यात येतील. याच स्थानकात मेट्रोच्या कात्रज तसेच खडकवासला या विस्तारीत मार्गासाठीही तरतूद करण्यात आली आहे. स्वारगेटच्या देशभक्त केशवराव जेधे चौकातील बीआरटीला या रचनेमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.
हे काम मोठे आहे. स्वारगेट चौकातून दररोज लाखापेक्षा जास्त पायी चालणारेच असतात. त्याशिवाय एसटी, पीएमपीएल, रिक्षा, खासगी वाहने यांचीही संख्या बरीच आहे. या सर्वांना या कामाचा कमीतकमी त्रास होईल याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पर्यायी मार्ग निश्चित करण्यात येत आहे. पादचारी सुरक्षित राहतील व वाहतूकही सुरळीत राहील, याच पद्धतीने हबचे काम होईल, असे दीक्षित म्हणाले.

प्रस्ताव महामेट्रोकडे पाठवावा
दरम्यान, मेट्रो मार्गाच्या दुतर्फा २० मीटर अंतराच्या आतमध्ये कोणतेही नवे बांधकाम करण्यास अथवा आहे त्या बांधकामामध्ये दुरुस्ती करण्यास आता महामेट्रोचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. मेट्रो कायद्यातच तशी तरतूद असल्याची माहिती दीक्षित यांनी दिली.
मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना, विशेषत: भुयारी मार्गाचे काम सुरू असताना त्याला किंवा जे बांधकाम होणार आहे त्याला कसलाही धोका होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येत असते. ज्यांना बांधकाम करायचे आहे, त्यांनी महापालिकेकडे त्यासाठी परवानगी मागावी, महापालिकेने त्यांच्याकडे अर्ज आल्यानंतर त्याचा प्रस्ताव महामेट्रोकडे पाठवावा, महामेट्रोचे तज्ज्ञ त्याची तपासणी करतील, आवश्यकता असल्यास त्यात सुधारणाही सुचवतील किंवा स्थगितीही देतील, असे दीक्षित यांनी सांगितले.

Web Title: Swargate hub work soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो