सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प बंधनकारक करणार : शिवाजीराव कचरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:00 PM2017-12-02T17:00:09+5:302017-12-02T17:04:39+5:30

सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प राबविणे बंधनकारक करणार आहे, असे प्रतिपादन सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले. सौर उर्जा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

Solar power projects will be mandatory for public trusts: Shivajirao Kachare | सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प बंधनकारक करणार : शिवाजीराव कचरे 

सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प बंधनकारक करणार : शिवाजीराव कचरे 

Next
ठळक मुद्देलक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात २३ किलोवॅट सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटनभारतामध्ये १७५ गिगावॅट अपारंपरिक उर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट : किशोर शिंदे

पुणे : धार्मिक स्थळांमध्ये अशा प्रकारचा सौर उर्जा प्रकल्प उभारणे, ही स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण बाब आहे. धर्मादाय आयुक्तालयाच्या माध्यमातून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर उर्जा वापरण्याचे आम्ही ठरविले आहे. दत्तमंदिराने केलेला सौर उर्जा प्रकल्प इतर संस्थांकरिता मार्गदर्शक असून या विभागातील सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प राबविणे बंधनकारक करणार आहे, असे प्रतिपादन सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिरात २३ किलोवॅट सौर उर्जा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास यावेळी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (मेडा) अध्यक्ष किशोर शिंदे, व्यवस्थापक विकास रोडे, महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा महामंडळ पुणेचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, कार्यकारी अभियंता किशोर गोर्डे, प्रणव शहा, नितीन शहा, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, बी. एम. गायकवाड, शिरीष मोहिते, चंद्रशेखर हलवाई, युवराज गाडवे, उल्हास कदम, अ‍ॅड. एन. डी.पाटील आदी उपस्थित होते. 
शिवाजीराव कचरे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा परिसरात सौर उर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकºयांची परिस्थिती वाईट आहे. तेथे सौर उर्जा शेती प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. 
किशोर शिंदे म्हणाले, भारतामध्ये १७५ गिगावॅट अपारंपरिक उर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ६० गेगावॅट वीजनिर्मिती आपण पूर्ण केली आहे. संपूर्ण उद्दिष्टापैकी तब्बल १०० गीगावॅट वीज सौरउर्जेच्या माध्यमातून आपण तयार करणार आहोत. सौर उर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात सौर उर्जेचा वापर व्हायला हवा.
एम. जी. शिंदे म्हणाले, पुण्यामध्ये हा ७५वा सौर उर्जा प्रकल्प सुरु झाला आहे. पुणे विभागामध्ये १ हजार ५५१ किलोवॅट वीज निर्मिती होत अपारंपरिक उर्जा स्त्रोतातून होत असून प्रत्यक्षात १ हजार ५०० मेगावॅटची आवश्यकता आहे. अपारंपरिक उर्जा ही निसर्गावर अवलंबून असली, तरी क्लिन एनर्जी, ग्रीन एनर्जीकरीता याकडे वळायला हवे. महाराष्ट्राने २०२२पर्यंत १२ हजार मेगावॅट वीज तयार करण्याचे धोरण केले आहे. त्यापैकी ३ हजार ७८० मेगावॅट वीज सौर उर्जा, बायोगॅस आदींच्या माध्यमातून तयार झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. उल्हास कदम यांनी आभार मानले. 

Web Title: Solar power projects will be mandatory for public trusts: Shivajirao Kachare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे