She is the inspiring inspiration of Ti | ‘ती’ची कर्तृत्वभरारी प्रेरणादायी
‘ती’ची कर्तृत्वभरारी प्रेरणादायी

आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात. अनेक घटना-प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात. काही घटना वाईट. काही सुखकारक असतात, तर काही दु:खदायक; तर काही अनुभव मन थक्क करणारे. हे अनुभव, या व्यक्ती आपल्याला बरेच काही शिकवून जातात. आपले आयुष्य विविध अंगांनी संपन्न करतात. परिपक्व बनवतात. जागतिक महिला दिनानिमित्त प्रेरणा देणा-या ग्रामीण भागातील काही महिलांविषयी...

जिद्दीवर ती बनली पहिली महिला रेल्वे चालक

बारामती : ‘बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,खूब लढी मर्दानी वह तो झाँसीवाली रानी थी’ असे वीरांगना रानी लक्ष्मीबाई यांचे वर्णन केले जाते.त्याच झाशीच्या राणीची प्रेरणा घेऊन झाशीच्या अभिलाशा प्रजापती यांनी तेथील पहिल्या महिला रेल्वेचालक बनण्याचा मान मिळविला आहे. त्या सध्या बारामती-पुण्याच्या पॅसेंजर रेल्वेचालक म्हणून दौंड येथे कार्यरत आहेत.
रेल्वेचालकाचे काम मुलींचे नाही. हे क्षेत्र केवळ मुलांचे आहे. कशाला असली नोकरी करतेस, असे म्हणून अनेकांनी त्यांना या रेल्वेच्या नोकरीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र, सरळ साधी नोकरी कोणीही करतात. मात्र, अभिलाषा यांना लहानपणापासूनच या नोकरीचे आकर्षण होते.त्यामुळे काही झाले तरी हीच नोकरी मिळवायची,अशी खुणगाठ त्यांनी लहानपणापासूनच मनाशी बांधली होती. वडिलांकडे ‘मला हीच नोकरी करायची आहे’ असा हट्ट देखील धरला. त्याला वडिलांनी प्रोत्साहन दिले.त्यामध्ये लहानपणापासून मनात असलेली जिद्द, स्वताला सिद्ध करण्याची अभिलाशा यांची जिद्द महत्वाची ठरली. सोलापूर रेल्वे विभागात सध्या अभिलाशा या दुसºया महिला रेल्वेचालक आहेत. दौंड-पुणे, दौंड-बारामती, दौंड-कुर्डुवाडी या रेल्वेमार्गावर त्या कार्यरत असतात. मुलगी असूनदेखील आत्मविश्वासाने रेल्वे चालविणाºया अभिलाशा प्रवाशांच्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत.

बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन’ मधील पदविका मिळविली. त्यानंतर त्यांनी रेल्वेची परीक्षा दिली. यामध्ये त्यांनी यश मिळविले. निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी अभिलाषा या इतर मुलांसमवेत एकट्याच होत्या. तरीदेखील त्यांनी मोठ्या जिद्दीने, परिश्रमाने हे प्रशिक्षण भुसावळ येथे पूर्ण केले. त्यानंतर त्या सोलापूर रेल्वे विभागात दौंड (जि. पुणे) येथ ेसहायक रेल्वे चालक पदावर रुजू होऊन स्वत:ला सिद्ध केले. रेल्वे चालविण्याचे तंत्र त्यांनी जिद्दीने आत्मसात केले.सुरुवातील त्या असिस्टंट लोकोपायलट म्हणून कार्यरत होत्या. आता त्या लोकोपायलट म्हणून कार्यरत आहेत.रेल्वे चालविताना अनेक जण आश्चर्याने कौतुकाने पाहतात,कौतुक करतात. त्यामुळे त्यांचा उत्साह दुणावतो, कामाची प्रेरणा मिळत असल्याचे त्या आवर्जुन सांगतात.

महाराष्ट्रात या क्षेत्रात येण्याबाबत मुली फारशा इच्छुक नसल्याचे चित्र आहे. येथील करिअरविषयी उदासीनता असल्याने रेल्वेचालक म्हणून काम करण्यासाठी फारसा मुलींचा कल नाही. मात्र, १८ तासांच्या प्रवासाच्या अंतरावर असलेल्या कुटुंबीयांपासून दूर येऊन रेल्वेचालकाची नोकरी करण्याचे आव्हान त्यांनी पेलले. या पार्श्वभूमीवर अभिलाषा यांनी केलेले आवाहन मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे ठरावे.‘बहुतसी सारी ‘फिल्ड’ है, जहॉं लडकीयोंको जानेसे रोका जाता है, वो लडकोवाला जॉब है, लडकीवाला नही, ऐसा बोलके लडकीयोंको रोका जाता है, फिर भी लडकीयोंको डरना नही चाहिए,हिंंमत करके करिअर बनाना चाहिऐ, अगर मै डरती तो आज यहाँ नही होती. दिलसे डर निकालके आगे बढो, दुनिया तुम्हारी है.
- अभिलाशा प्रजापती

ज्ञानदानातून घडविले आदर्श विद्यार्थी

नीरा : बाई! तुम्ही कोणत्या वर्गाला शिकवताय हो? चौथीच्या. ‘चला, मग बरे झाले. आमच्या मुलाला पुढच्या वर्षी पहिलीला घालायचाय. तुम्ही पहिलीला शिकवायला आल्यावर घालायचा त्याला शाळेत असे ठरलेच होते आमचे.’ हा छोटासा संवाद गुळुंचे (ता.पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या स्मिता जोशी बाईंच्या आयुष्यात अनेकदा झाला.
मूळचा कडक स्वभाव, पण विद्यार्थ्यांना आईच्या मायेने शिकवून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, पुढील आयुष्यात ते उत्तम नागरिक घडावेत यासाठी शिकविणाºया जोशी बाई. त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने सेवानिवृत्ती घेतली. परंतु या दिवशी त्यांना भेटायला आलेल्या त्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा त्यांच्या ज्ञानदानाची महती नकळत सांगून गेल्या.
बाई मूळ मुंबईच्या. तेथील सायनमधील शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पुढे वडील सातारला व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाल्यावर तीन बहिणी व भावासहित सातारा येथे राहू लागल्या. बीएस्सीनंतर गुळुंचे येथील अशोक जोशी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. मातीच्या भेंड्यापासून तयार केलेले पर्णकुटीवजा घर. संसार सुरु झाल्यावर आपल्या जिद्दीच्या जोरावर दोघे मिळून संसाराचा गाडा चालवू लागले. दिवसभर शिवणकामात जावू लागला. काबाडकष्टाने हळूहळू घराची सुधारणा व्हायला लागली. पुढे त्यांनी डीएडला प्रवेश घ्यायचे ठरवले. प्रवेश घेऊन सातारा ते गुळुंचे रोज एसटीने ये-जा करत अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे त्यांना नोकरी लागली आणि हळूहळू कुटुंबाची फरफट थांबली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मणिभाई देसाई ट्रस्टच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नोकरीला सुरुवात झाल्यापासून अभ्यासात कच्चे विद्यार्थी ओळखून त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करत. शिक्षणासाठी शाळेचा कालावधी सोडून शनिवार-रविवार त्या घरी मुलांना शिकवत. अप्रगत मुलांचे जादा तास घेत. त्यांना अधिकाधिक प्रगत करण्यासाठी शालेय शैक्षणिक साहित्याची निर्मित करत. मनोरंजनातून प्रबोधन करत मुलांना शिकवल्याने त्यांना अभ्यासात अधिक गोडी निर्माण होई. क्रीडा स्पर्धांचा सराव करून घेऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक व्यायामाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करत. वक्तृत्व, निबंध तसेच हस्ताक्षर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा यासाठी मेहनत करत. त्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक मेहनतीमुळे विद्यार्थीही हळूहळू तयार होत. इंग्रजी विषयात बाईंचा हातखंडा असल्याने विद्यार्थी इंग्रजीत संभाषण करत, स्वत: स्पेलिंग तयार करत, स्वत:विषयी माहिती सांगत, इंग्रजी विषयातील कविता, गाणी सहज म्हणत. एक शिक्षिका म्हणून बाईंचे जेवढे नाव घेतले जाते तेवढेच एक सामाजिक बांधिलकी जपणाºया महिला म्हणूनही त्यांना ओळखले जाते. आपल्या मागच्या परिस्थितीची जाणीव त्यांनी कायम ठेवली. परिसरातील अडचणीत असणाºया लोकांना त्यांनी नेहमी मदतीचा हात पुढे केला. तरुणांनी व्यवसाय करावा नाव कमवावे यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
- स्मिता जोशी, शिक्षीका


मुलींचे दायित्व स्वीकारणा-या निर्मला

चाकण : जिथे समाजात आपल्याला आपल्या दोन मुलांचे शिक्षण आणि इतर करताना दमछाक होते. तिथेच २५ मुलामुलींचं दायित्व स्वीकारून त्यांना घडवणं, हे शब्दात मांडणं कठीणच. निर्मला सावंत यानी चाकणपासून ९ किमी अंतरावर असलेल्या ठाकूर पिंपरी बु. ता. खेड, जि. पुणे या गावी २००४ मध्ये ‘निर्मल बाल संस्था’ हा अनाथ आश्रम सुरू केला. वैयक्तिक कुटुंब परिवार या गोष्टीपासून लांब असलेल्या निर्मला सावंत यांचा २००० पूर्वी १२-१५ वर्षाच्या हे क्षेत्र पाहिलेलं.
समाजातल्या अनाथ वंचित यांना रोजची अन्न, कपड्यासाठी करावी लागणारी कसरत त्यांनी बघितलेली. या सर्वांनी एकत्र बांधून मुख्य प्रवाहात जोडण्याच्या उदात्त हेतूने त्यानी हे अनाथालय सुरू करून त्यासाठी पूर्णपणे झोकून दिलेले. याच दरम्यान त्यानी एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन स्वत:चे नावही लावलं.आश्रमात राहायला असलेली २५ मुले पुन्हा पोरकी झालीत, यातून कुणीतरी पुढे येऊन या मुलांची जबाबदारी घेण्यासाठी तिथल्या हितचिंतकानी प्रयत्न केलेही पण हाती निराशाच आली. याच सर्वांमध्ये स्वत: अनाथ म्हणून जगलेल्या अनाथ मुलांच्या समस्या आणि बालपण स्वत:च बघितलेल्या निर्मला सावंत यांची दत्तक मुलगी ‘गीता सावंत’ यांनी स्वत: पुढ येऊन हे आश्रम चालवायला घेतले. त्यांनी स्वत: पदवीचे शिक्षण घेऊन त्यांचा अ‍ॅनिमेशनचा डिप्लोमा झालेला आहे.

आपण किती सुरक्षित आयुष्य जगतो, हे तिथल्या २५ जणांच्या काही प्रातिनिधीक अनुभवांनी लख्ख समजतं. तिथल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कहाण्या पण आता ते सगळे गीतातार्इंच्या पंखाखाली आहेत. साधारण आयुष्य जगताना अशा अनन्यसाधारण व्यक्ती भेटणं हे दुर्मिळच. दु:ख विसरण्यासाठी अनाथाश्रमातील अनाथ मुलामुलींचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर असावा. जिद्दीच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर आजही असंख्य अडचणींनी त्या दोन हात करत असतात. यश संपादन करत असताना आलेले अपयश त्याचे अनुभव, झालेला विरोध त्याचे अनुभव, असे विविध अनुभव, असंख्य गोष्टी कुठलेही ज्ञान नाही, की कुठलेही तत्वज्ञान नाही. साधे सोप्पे आयुष्य जगत असताना आलेले अनुभव जे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात.

 

आदीवासींची सेवा करण्यासाठी सरपंच - कल्पना वेगरे

वेल्हे : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत स्वराज्याचे पहिले तोरण बांधलेल्या तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे येथील महादेव कोळीसारख्या आदिवासी समाजात जन्मलेल्या कु. कल्पना गोविंद वेगरे या युवतीची ही एक अनोखी कहानी आहे. अनेक संकटांचा सामना करत, आयुष्याशी झगडत अगदी कमी वयात समाजामधे एक समाजसेविका म्हणून कल्पनाने वेगळे स्थान निर्माण केले आहे. कौटुंबिक स्थिती हालाकीची असतानाही सामाजिक पाठिंब्याच्या जोरावर वेल्ह्याचे सरपंचपद भूषवण्याचा बहुमान तिने मिळवला आहे.
२१ वर्षांची युवती असणारी कल्पना वेगरे ही आज आत्मविश्वासपूर्वक वेल्हेसारख्या तालुक्याच्या गावच्या सरपंचपदाचा कारभार हातळत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ही अशिक्षित आदिवासी समाजातील युवती वेल्ह्याची सरपंच झाली. आणि तिथून सुरु झाला एक समाजव्रताच प्रवास... एकटीच ‘कल्पना’ जिद्द, हुशारी, धाडस याच्या जोरावर आज स्वाभिमानाने उभी राहिली आहे.

भविष्यात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश संपादन करुन प्रशासकीय नोकरीतून जनसेवेसाठी योगदान देणार असल्याचे तिने स्वप्न उराशी बाळगले आहे. समाज, राजकारण, संस्कृती, साहित्य यांचा तिचा चांगला अभ्यास असून या जोरावर ती सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.


ग्रामीण भागातील स्त्रियांचा आधार
मंचर : मंचरच्या मातीमध्ये जन्मलेली एक महिला, मंचरच्या क्षितिजामध्ये महिलांच्या क्षेत्रामध्ये एक उत्तुंग यशाच्या शिखरावर विराजमान असलेले एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. वर्षाराणी गाडे. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून महिलांवर यशस्वी उपचार करणाºया गाडे यांनी गाडेज टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ग्रामीण भागात मंचर येथे सुरू केले आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांचा त्या आधार बनल्या.
आजवर १०५ दाम्पत्यांना त्याचा लाभ झाला आहे. इनरव्हील क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी गाडे काम करतात. जन्मापासूनच समाजात एक वेगळे काहीतरी करून दाखविण्याची जिद्द महिलांनी आपल्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असले पाहिजे, ही विचारसरणी मनाशी बाळगून महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत, हे डॉ. वर्षाराणी गाडे यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले. वडील डॉक्टर असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचे लहानपणापासूनच आकर्षण होते.
मंचर व नारायणगाव येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९१मध्ये एमबीबीएस ही पदवी बी.जे. महाविद्यालयातून घेतल्यानंतर १९९५मध्ये स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ ही पदवी बी.जे महाविद्यालयातून घेतली.
सुरुवातीची काही वर्षे जहांगीर हॉस्पिटल व रुबी हॉल येथे पॅ्रक्टिस केल्यानंतर आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची आवड मनामध्ये होती. त्यांनी ठरवले असते तर पुणे शहरात वैद्यकीय व्यवसाय सुरू करून चांगला जम बसवला असता. मात्र, ग्रामीण भागात काम करण्याची तीव्र इच्छा असल्याने मंचरला येऊन स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणूून पॅ्रक्टिस सुरू केली. आपल्या उच्च ज्ञानाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना व्हावा, ही धडपड नेहमीच मनात ठेवून मार्गक्रमण केले.
त्यांनी चालू केलेल्या गाडे हॉस्पिटलमध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर या आसपासच्या तालुक्यांतील रुग्ण येतात.अनेक गरीब महिलांवर मोफत उपचार केले. नुकतेच त्यांनी गाडे टेस्ट ट्यूब बेबी हे अत्याधुनिक सेंटर चालू केले आहे. आत्तापर्यंत १०५ दाम्पत्यांनी याचा अत्यंत माफक खर्चात लाभ घेतला आहे.

रोटरी क्लब, विशेषत: इनरव्हील क्लब व अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत राहून सामाजिक कार्याचा वसा पुढे नेला. विशेषत:, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष असताना त्यांनी महिलांसाठी विशेष काम केले. महिलांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. पती डॉ. सचिन गाडे हे राज्यस्तरीय नेत्ररोगतज्ज्ञ असून त्यांच्याही कार्यात नेहमीच मदत करीत आपलेही सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले आहे.
- वर्षाराणी गाडे

 


Web Title:  She is the inspiring inspiration of Ti
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.