Pune: RPF जवान आणि कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 04:02 PM2023-11-01T16:02:26+5:302023-11-01T16:03:15+5:30

कर्मचाऱ्याला अटक झाली तर जवानावर गुन्हा दाखल असून तो पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले  

Repeated rape of minor girl by jawans and employees A question mark on the safety of girls | Pune: RPF जवान आणि कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Pune: RPF जवान आणि कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पुणे : पुण्यात आता तर महिलांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण रेल्वे सुरक्षा दलातील (RPF) जवानाकडून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी जवानाच्या साथीदारास पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. कमलेश तिवारी (मूळ रा. उत्तर प्रदेश ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) जवान अनिल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत एका अल्पवयीन मुलीने पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रेमप्रकरणातून छत्तीसगडमधून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. लीलाधर ठाकूर नावाचा मित्राने तिला भेटून 'माझे तुझ्यावर खूप प्रेम असून आपण पुण्याला जाऊन लग्न करू' अशी बतावणी केली. 12 सप्टेंबर रोजी ते पुणे रेल्वे स्थानकावर पोहचले. मुलगी अल्पवयीन असल्याने रेल्वे सुरक्षा दलाने तिला एका संस्थेत ठेवले. संबंधित संस्थेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे असल्याने पुणे रेल्वे स्थानकात सापडलेल्या अल्पवयीन मुलांना या संस्थेत दाखल करण्यात येते. मुलांच्या पालकांचा शोध घेऊन याबाबतची माहिती पालकांना देण्यात आली.  

कर्मचारी आणि जवानाकडून बलात्कार 

अल्पवयीन मुलीवर संस्थेतील कर्मचारी तिवारी आणि जवान पवार यांनी वारंवार बलात्कार केला. दरम्यान, अल्पवयीन मुलगी सुखरुप सापडल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी छत्तीसगड पाेलिसांना दिली. छत्तीसगड पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिला पालकांच्या ताब्यात दिले. मुलीची चौकशी करण्यात आली. तेव्हा रेल्वे सुरक्षा दलातील जवान पवार आणि  संस्थेतील कर्मचारी तिवारीने बलात्कार केल्याची माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित गुन्हा पुणे रेल्वे स्थानक पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड आणि पथकाने तातडीने तपास सुरु केला. तिवारीला अटक करण्यात आली असून, लोहमार्ग पोलीस दलातील उपविभागीय अधिकारी देवीकर तपास करत आहेत. रेल्वे सुरक्षा दलातील जवान अनिल पवारला निलंबित करण्यात आले असून, तो पसार झाला आहे. पवार याचा शोध घेण्यात येत आहे. 

Web Title: Repeated rape of minor girl by jawans and employees A question mark on the safety of girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.