राज्यसभा सदस्यत्व माझ्यासाठी सर्वांत वाईट काळ- अनु आगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 03:18 AM2019-03-13T03:18:28+5:302019-03-13T03:18:48+5:30

'आयुष्याची सहा वर्षे वाया गेली, शत्रूही संसदेत बसू नये'

Rajya Sabha membership is the worst time for me- Anu Aga | राज्यसभा सदस्यत्व माझ्यासाठी सर्वांत वाईट काळ- अनु आगा

राज्यसभा सदस्यत्व माझ्यासाठी सर्वांत वाईट काळ- अनु आगा

Next

पुणे : राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी हा माझ्यासाठी सर्वांत वाईट काळ होता. माझ्या आयुष्याची सहा वर्षे तिथे वाया गेली. संसदेत कोणीही एकमेकांचा आदर करत नाही. शत्रूवरही संसदेत बसण्याची वेळ येऊ नये, अशा शब्दांत उद्योजिका आणि समाजसेविका अनु आगा यांनी निशाणा साधला. मतदारांनी योग्य आणि सक्षम लोकप्रतिनिधींचीच निवड करायला हवी. आपण ज्यांना निवडून दिले आहे, त्यांना परखडपणे प्रश्न विचारायला हवेत. योग्य राज्यकर्ते असतील तरच देशाचे भविष्य उज्ज्वल असेल, असा सल्लाही त्यांनी दिला. त्या २०१२ ते २०१८ या काळात राज्यसभेच्या सदस्य होत्या.

जनसेवा फाउंडेशनतर्फे ‘मीट द स्टॉलवर्ट, भेटू या एका दिग्गजाला’ या कार्यक्रमांतर्गत अनु आगा यांची प्रकट मुलाखत पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यभेचे खासदार आणि अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विकफिल्ड ग्रुपचे चेअरमन बहारी बी.आर. मल्होत्रा होते. या वेळी डॉ. शां. ब. मुजुमदार, जॅकी मल्होत्रा, कृष्णकुमार गोयल, मोहन जोशी, विजय सराफ, संजय सिन्हा, विनोद शहा, राजेश शहा उपस्थित होते.

‘मी कधीच टीव्ही पाहत नाही, तर पुस्तकांमध्ये रमते. आपण प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा प्रत्येकाचे आयुष्य जगू शकत नाही. मात्र, हा अनुभव पुस्तकांमधून मिळतो. पुस्तक हे सर्वात छान मित्र असतात. माझ्यावर महात्मा गांधीजी आणि माझे पती रोहिंटन आगा यांचा खूप प्रभाव आहे’, याकडेही आगा यांनी लक्ष वेधले.
जनसेवा फाउंडेशनचे विनोद शहा यांनी प्रास्ताविक केले. आगा यांची मुलाखत नीरजा आपटे आणि डॉ. वर्धमान जैन यांनी घेतली. प्रा. जे. पी. देसाई आणि विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

आपण नेहमीच स्वत:ला कमी लेखतो. आधी स्वत:वर विश्वास ठेवायला शिका. प्रत्येक सामान्य व्यक्तीमध्ये असामान्यत्व दडलेले असते. या असामान्यत्वाचा शोध आपणच लावायला हवा. त्याचवेळी मी असामान्य आहे, ही भावना आपल्यावर स्वार होता कामा नये. आयुष्यात किंवा व्यवसायात चढता आलेख, लाभ महत्त्वाचा असतो. मात्र, केवळ त्यावर लक्ष केंद्रित करुन चालणार नाही. आयुष्याचे ध्येय जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे कोठे स्वल्पविराम, पूर्णविराम द्यायचा, हे आपले आपणच ठरवायला हवे.
- अनु आगा

काय म्हणाल्या अनु आगा?
पूर्वी कंपन्या कर्मचाऱ्यांच्या निष्ठेवर विश्वास ठेवत. आता कार्यक्षमता पाहिली जाते.
स्वत:साठी काही केल्यास मिळणारा आनंद तात्पुरता असतो. इतरांना मदत करण्यातून मिळणारा आनंद चिरंतन असतो. पैशांचीच मदत गरजेची नसते. आपले ज्ञान, कौैशल्य, वेळही इतरांसाठी देता येतो.
कुटुंबासाठी दिलेला वेळही
खूप आनंद देतो.
काही जण ८५-९० वर्षांचे होईपर्यंत खुर्चीला चिकटून राहतात. लोकांना असे लोक नकोसे होतात. लोक आपल्यावर प्रेम करतात, तोपर्यंतच निवृत्त झाले पाहिजे.
आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृती पाहायला मिळत होती. आता परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे पुरुषांनी स्त्रियांना गृहीत धरु नये.

Web Title: Rajya Sabha membership is the worst time for me- Anu Aga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.