पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम

By निलेश राऊत | Published: December 14, 2023 12:06 PM2023-12-14T12:06:07+5:302023-12-14T13:03:43+5:30

चीनमध्ये ८ वर्षांपूर्वी २ हजार पालकांनी पाल्याना गोष्टी सांगितल्या तर पुण्यात ३ हजार पालक या उपक्रमात सहभागी झाले

Punekars broke China record World record of 3 thousand parents and children | पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम

पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या शनिवारी १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने पुणे महापालिकेने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या ' पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या ' या उपक्रमात  तीन हजार ७७ पालकांनी सहभागी होत, त्यांनी आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटे गोष्ट सांगितली. ही गोष्ट पूर्ण होताच पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा चीनचा रेकॉर्ड मोडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर गीतांवर आनंदोत्सव साजरा झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक जय काकडे, ॲड. एस. के. जैन, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, न्यासाचे संचालक  युवराज मलिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, संयोजक राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसेनजित फडणवीस, राहुल पाखरे, भाग्यश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.

वाचन संस्कृतीचा चालना देण्यासाठी गुरुवारी सकाळपासून स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आले. साधारण दहाच्या सुमारास तीन हजार २०० पेक्षा अधिक पालक आणि त्यांच्या पाल्यानी सहभाग नोंदवला. या सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या पुस्तकातील धड्याचे सलग तीन मिनिटे वाचन केले. यावेळी गिनेस बुक रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी  'पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या' हा नवा विश्वविक्रम भारताच्या नावाने प्रस्थापित केल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. या विश्व विक्रमानंतर पालक आणि मुलांनी वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख पद्धतीने केले. या संपूर्ण उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन करीत, त्यांना वाचन करण्याची प्रेरणा दिली. यावेळी चैतन्य कुलकर्णी यांनी मराठी गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

अन् चीनचा रेकॉर्ड मोडला

पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा विश्वविक्रम  यापूर्वी चीनच्या नावावर होता. चीनमध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार ४७९ पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या. त्यानंतर आज स. प. मैदानावर तीन हजार ६६ पालकांनी एकत्रित येत, आपल्या आपल्या पाल्यांना निसर्गाचा नाश करू नका हा धडा वाचला आणि विश्वविक्रमाला गवसणी घातली.

Web Title: Punekars broke China record World record of 3 thousand parents and children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.