Pune: ट्रिपल सीट अडवले; सैन्य दलाच्या शिपायाने पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक

By नितीश गोवंडे | Published: October 26, 2023 07:26 PM2023-10-26T19:26:42+5:302023-10-26T19:26:56+5:30

ट्रिपल सीटच्या कारवाईनंतर शिपाई दीड महिन्यानंतर बदला घेण्यासाठी पुन्हा पुण्यात आला

Pune Triple Seat Blocked Army Constable Throws Cement Block On Cop Head | Pune: ट्रिपल सीट अडवले; सैन्य दलाच्या शिपायाने पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक

Pune: ट्रिपल सीट अडवले; सैन्य दलाच्या शिपायाने पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक

पुणे: भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या वैभव संभाजी मनगटे (२५) याने बुधवार चौकात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वाहतुक शाखेचे कर्मचारी पंकज शंकर भोपळे (३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव संभाजी मनगटे हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील मंगळुर येथील मूळ रहिवासी असून तो सैन्य दलात शिपाई पदावर कार्यरत आहे. वाहतुक शाखेचे कर्मचारी पंकज भोपळे यांनी मनगटे याला दीड महिन्यापूर्वी दुचाकीवर ट्रिपल सीट जाताना अडवले होते, या रागातून त्याने २५ ऑक्टोबर रोजी रात्री हे कृत्य केले. याप्रकरणी वैभव मनगटेला अटक करण्यात आली आहे.

दंडात्मक कारवाई केल्याचा आला राग..

फरासखाना पोलिस ठाण्यात पंकज शंकर भोपळे यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार भोपळे हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ शिवाजी रस्त्यावर बुधवार चौक याठिकाणी वाहतूक नियमाचे काम करतात. बुधवार चौक येथे पंकज भोपळे व पोलिस अंमलदार रमेश ढावरे व इतर पोलिस अमलदार वाहतुकीचे नियमन करत असताना, रमेश ढावरे यांनी आरोपीवर सदर भागातून ट्रिपल सीट जात असताना त्यांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती.

बदला घेण्यासाठी पुन्हा आला शहरात..

कारवाई दरम्यान झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरून, त्याचा बदला घेण्यासाठी वैभव मनगटे दीड महिन्यानंतर पुन्हा पुण्यात आला. त्याने रमेश ढावरे यांचा शोध घेऊन त्यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने सिमेंटचा ब्लॉक त्यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीवर फरासखाना पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अभंग करत आहेत.

Web Title: Pune Triple Seat Blocked Army Constable Throws Cement Block On Cop Head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.