Pune: माजी महसूलमंत्र्यांच्या स्वाक्षरीचा बनावट आदेश, वनविभागाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 09:12 AM2023-10-26T09:12:49+5:302023-10-26T09:14:53+5:30

संशयित आरोपीविरुद्ध बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता....

Pune: Fake order signed by ex-revenue minister, attempt to grab forest department land | Pune: माजी महसूलमंत्र्यांच्या स्वाक्षरीचा बनावट आदेश, वनविभागाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न

Pune: माजी महसूलमंत्र्यांच्या स्वाक्षरीचा बनावट आदेश, वनविभागाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न

पुणे : तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षरीचा बनावट आदेश प्रशासनाला सादर करत हडपसर येथील वनविभागाची तब्बल १८ एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने पोपट पांडुरंग शितकल (रा. रामोशी आळी, हडपसर) या आरोपीला ताब्यात घेतले. हा प्रकार सप्टेंबर २०२१ मध्ये उघडकीस आला होता. तेव्हापासून आरोपी पोलिसांना चकवा देत होता. या प्रकरणी हवेलीच्या तत्कालीन तहसीलदार तृप्ती कोलते यांनी खडक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपीविरुद्ध बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शितकल याच्या पूर्वजांना वतनापोटी देण्यात आलेली हडपसर येथील सर्वे क्रमांक ६२ मधील १८ एकर वनक्षेत्रातील जमीन कायमस्वरूपी आपल्या नावावर करून देण्याची मागणी महसूल विभागाकडे करण्यात आली होती. याबाबत शासनाने विचार करून निर्णय घेण्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनीही ही मागणी फेटाळली. या सगळ्या घडामोडीनंतर शितकल याने केलेला दावा तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाखल झाला. तेव्हा त्यांनीही त्याचा दावा फेटाळला. शितकलचा दावा सर्वांनी फेटाळल्यानंतरही त्याने संबंधित जमीन आपल्या नावावर करावी, असा आदेश तत्कालीन महसूल मंत्री पाटील यांनी दिल्याचा बनावट १६ पानी आदेश हवेली तहसीलदारांकडे दिला होता.

थेट महसूल मंत्र्यांचाच आदेश असल्याने महसूल विभागानेही आदेशाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया तत्काळ राबवून त्याच्या नावे सातबारा केला होता. दरम्यान, हे प्रकरण वनविभागाकडे आल्यानंतर उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी संबंधित जमीन वनखात्याची असल्याने ती हस्तांतरित करता येणार नसल्याचे तत्कालीन तहसीलदार यांना कळवले. त्यामुळे महसूल विभागाने त्या आदेशाची सत्यता पडताळून पाहिली असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शासनातर्फे खडक पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. वनविभागाने दाखविलेली सतर्कता व महसूल विभागाने तत्काळ केलेल्या पाठपुराव्यामुळे संबंधित व्यक्तीच्या नावे झालेला सातबारा पुन्हा सरकारच्या नावावरही आला. मात्र, शितकल हा पसार झाला होता. अखेर गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले.

Web Title: Pune: Fake order signed by ex-revenue minister, attempt to grab forest department land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.