पुणे जिल्ह्यात अडीच लाख कुणबी नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतून सर्वाधिक २ लाख ३६ हजार पुरावे

By नितीन चौधरी | Published: January 30, 2024 05:55 PM2024-01-30T17:55:01+5:302024-01-30T17:55:41+5:30

शैक्षणिक अभिलेखांमधून १२ हजार ४९८ नोंदी सापडल्या आहेत...

Pune district has 2.5 lakh Kunbi records, the highest number of 236 thousand proofs from birth and death records | पुणे जिल्ह्यात अडीच लाख कुणबी नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतून सर्वाधिक २ लाख ३६ हजार पुरावे

पुणे जिल्ह्यात अडीच लाख कुणबी नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतून सर्वाधिक २ लाख ३६ हजार पुरावे

पुणे :मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असताना जिल्ह्यातही मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २ लाख ५७ हजार इतक्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे कामही सुरू झाले आहे. या नोंदींपैकी सुमारे २ लाख ३६ हजार नोंदी केवळ जन्म मृत्यू पुराव्यांमध्ये आढळल्या आहेत. शैक्षणिक अभिलेखांमधून १२ हजार ४९८ नोंदी सापडल्या आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी तपासण्याचे आदेश दिले होता. त्यानुसार मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदीसाठी कागदपत्रांची तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली. या नोंदीसाठी १३ प्रकारच्या कागदपत्रांच्या आधारानुसार, प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत आवश्यक आणि अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूल पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज आदी पुराव्यांची वैधानिक; तसेच प्रशासकीय तपासणी करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २३ लाखांपेक्षा अधिक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ लाख ५७ हजार ८०७ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यात जन्म मृत्यूच्या पुराव्यांमधून तब्बल २ लाख ३६ हजार ५६८ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. शैक्षणिक अभिलेखांमधून जसे प्रवेश निर्गम नोंदवही, जनरल रजिस्टरमधून १२ हजार ४९८ नोंदी सापडल्या आहेत. तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडील खरेदीखत केलेल्या रजिस्टरमध्ये ३ हजार ६४७, डे बूकमध्ये ६, करार खतातून ९०, साठे खतातून ७, भाडे चिठ्ठीतून २ व इतर अभिलेखांमधून ६२९ अशा एकूण ४ हजार ३८३ नोंदी सापडल्या आहेत. भूमिअभिलेख विभागाकडील रिव्हिजन प्रतिबुकातून ९० नोंदी तर महापालिकाव नगरपालिकेच्या शेतवार तक्ता वसुली मिळकत व मालमत्ता पत्रकांमधून ४ हजार ११५ नोंदी आढळून आल्या आहेत. तर पुराभिलेख विभागाकडील इनाम कमिशन, पुणे जमाव, डेक्कन कमिशनर व सोलापूर जमाव यांच्याकडील कागदपत्रांमध्ये १४३ नोंदी सापडल्या आहेत.

जिल्ह्यात सापडलेल्या या कुणबी नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे आहे, त्यांनी वेबसाइटवर जाऊन या नोंदी पाहाव्यात. या नोंदी पाहून त्यात काही साधर्म्य असल्यास त्याचा उपयोग प्रमाणपत्र मिळण्यासाठी करून घेता येणार आहे.

- ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी

Web Title: Pune district has 2.5 lakh Kunbi records, the highest number of 236 thousand proofs from birth and death records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.