सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By नम्रता फडणीस | Published: April 22, 2024 03:04 PM2024-04-22T15:04:27+5:302024-04-22T15:05:53+5:30

करोडो रुपयांच्या अपहारप्रकरणी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह रोहित भीमराव लभडे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला...

pre-arrest bail of Shekhar Charegaonkar, the former president of the Cooperative Council, was rejected | सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : कराडमधील (जि .सातारा) द यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील करोडो रुपयांच्या अपहार प्रकरणी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह रोहित भीमराव लभडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील विशेष न्यायाधीश (एमपीआयडी) के.पी नांदेडकर यांनी फेटाळला.

द यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेचे (शाखा कराड जि. सातारा) अध्यक्ष शेखर सुरेश चरेगावकर व द चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (चिखली. जि. बुलढाणा) चे अध्यक्ष सतीश भगवानदास गुप्ता व रोहित भीमराव लभडे यांसह आणखी पाच जणांनी त्यांच्या इतर साथीदारांसोबत संगनमत करून बँकेमार्फत राबविलेल्या गुंतवणुकीच्या स्कीमअंतर्गत ८ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून या कर्ज रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फिर्यादी प्रदीप रामचंद्र चोरघे यांच्या तक्रारी अर्जान्वये पुण्याच्या सत्र न्यायाधीशांच्या लेखी आदेशानुसार भोर पोलीस स्टेशन येथे ५ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हेशाखा विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण यांच्याकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी शेखर सुरेश चरेगावकर आणि रोहित भीमराव लभडे यांनी विशेष सत्र न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता १४ मार्च रोजी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणी अंतरिम अटकपूर्व जामीन नसताना देखील तपासी अधिका-यांनी आरोपींना अटक केली नाही.

फिर्यादीतर्फे ऍड विपुल दुशिंग, ऍड स्वानंद गोविंदवार यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. बँकांच्या आधारे भोळ्याभाबड्या कर्जदारांना आरोपींनी विविध गुंतवणुकीच्या योजनांच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याची कार्यपद्धती निश्चित केली. सातारा येथील सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांनी केलेल्या लेखापरीक्षणातून हा घोटाळा उघड झाला. आरोपींनी पुणे व सातारा भागातील अनेक कर्जदारांना देखील फसविले असल्याचे फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. ऍड विपुल दुशिंग, ऍड स्वानंद गोविंदवार यांच्यासमवेत ऍड रोहित राहींज व ऍड अभिनव नलावडे यांनी काम पाहिले.

Web Title: pre-arrest bail of Shekhar Charegaonkar, the former president of the Cooperative Council, was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.