मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 09:22 PM2018-07-02T21:22:14+5:302018-07-02T21:24:14+5:30

ऐन पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात बांधलेली शेडही उध्वस्त झाल्यावर इथले कामगार सैरभैर होऊन पत्र्यांखाली वाचलेले तुटके,फुटके सामान गोळा करताना दिसून आले. 

pmpml bus fall down from warje bridge | मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा !

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा !

googlenewsNext

पुणे : शहरातील वारजे सर्व्हिस पुलावरून कोसळलेल्या बसमुळे  प्रवाशांसोबत स्थानिकांच्या निवाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. ऐन पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात बांधलेली शेडही उध्वस्त झाल्यावर इथले कामगार सैरभैर होऊन पत्र्यांखाली वाचलेले तुटके,फुटके सामान गोळा करताना दिसून आले. 

      सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास कात्रजहून निगडीला जाणारी  पीएमपीएमएलची बस वारजे पुलावरून कोसळली. स्टेअरिंगचा रॉड तुटून काही समजण्याच्या आत अपघात झाल्याने प्रवाशांचा आरडाओरडा सुरु होता. मात्र त्याच वेळी काही डोळे बेघर झाल्याचेही दुःख विसरून जखमींना बाहेर काढण्यात गुंतले होते. ही बस कोसळलेल्या ठिकाणी कंत्राटी कामगारांची तात्पुरती पत्र्याची शेड होती. संध्याकाळी थकून भागून आल्यावर हे कामगार चार घास तिथेच शिजवून खात असत. सध्या त्यांचे रामवाडी ते वारजे स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरु होते. मात्र पावसात ओढा वाहत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात काम थांबवण्यात आल्याने बहुतेक जण बाहेर कामाला गेले होते. त्या शेडमध्ये फक्त आजारी असलेला त्यांचा सोबती हरिश्चंद्र झोपला होता. त्यांचा दुसरा सहकारी रात्रीचे काम संपवून बाहेर तोंड धुवत होता. अचानक आवाज आला आणि मागे वळून बघण्याच्या आत चार झोपड्या भुईसपाट झाल्या. त्यावेळी  सुदैवाने कोपऱ्यात असलेला  हरिश्चन्द्र किरकोळ जखमी झाला होता. बाकीचे आजूबाजूला राहणारे सहकारी जखमींना बाहेर काढण्यात गुंतले.जखमींना रुग्णवाहिकेत पोचवल्यावर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली. अनेकांनी फुटकी बादली, चेपलेले डबे बाजूला काढायला सुरुवात केली. 

      हे सर्व उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गेले चार महिने पुण्यात राहत असून कंत्राटी कामगार म्हणून काम करत असल्याचे समजले. ५० वर्षांच्या राजपती राय यांनी सगळे गेल्याचे सांगितले. आता पहिल्यांदा हे पत्रे बाजूला करून स्वच्छता करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा झोपडी उभार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.गेल्या ७ महिन्यांपासून या मार्गावर प्रवास करणारे जितेंद्र पवार या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. ते पिंपळे सौदागर येथे लॅब टेक्निशयन म्हणून काम करतात. गाडीने टर्न घेतल्यावर काय झाले हे समजण्याच्या आत आम्ही खाली गेलो असा अनुभव त्यांनी सांगितला. या बसचे चालक असलेले प्रकाश रामभाऊ खोपे मागील पाच वर्षांपासून या मार्गावर गाडी चालवत आहेत. त्यांनी सकाळपासून या मार्गावर अपघाती बस घेऊन एक फेरीही पूर्ण केली होती. तेव्हा काहीही तांत्रिक अडचण आली नव्हती. मात्र वारज्याला बस आल्यावर टर्न घेतला आणि गाडी वळवायला लागलो तर स्टेअरिंगचं हातात आल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. ज्याक्षणी स्टिअरिंग हातात आलं तोवर बस कठड्यावरून पडली होती असेही ते म्हणाले. दरम्यान खोपे यांना डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. ते महालक्ष्मी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करतात.  

Web Title: pmpml bus fall down from warje bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.