प्रजासत्ताक दिनी पीएमपी सेवा विस्कळीत?; तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:16 PM2018-01-23T15:16:57+5:302018-01-23T15:20:13+5:30

पीएमपी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची कार्यशैली कामगार विरोधी असल्याची टीका सर्वच कर्मचारी संघटनांकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर टाकलेल्या बहिष्कारावर ठाम राहण्याचा निर्णय महाराष्ट्र कामगार मंचने घेतला आहे.

PMP service disrupted on Republic Day; unwilling about Tukaram Mundhe | प्रजासत्ताक दिनी पीएमपी सेवा विस्कळीत?; तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी

प्रजासत्ताक दिनी पीएमपी सेवा विस्कळीत?; तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी

Next
ठळक मुद्देप्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर टाकलेल्या बहिष्कारावर कर्मचारी संघटना ठामकर्मचाऱ्यांवरील कारवाई थांबवावी, अशी संघटनांकडून मागणी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची कार्यशैली कामगार विरोधी असल्याची टीका सर्वच कर्मचारी संघटनांकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर टाकलेल्या बहिष्कारावर ठाम राहण्याचा निर्णय महाराष्ट्र कामगार मंचने घेतला आहे. त्यामुळे यादिवशी सकाळी बस सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून सातत्याने गैरहजर, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. यावर मंचसह इंटक तसेच राष्ट्रावादी कामगार युनियननेही टीका केली आहे. ही कारवाई बेकायदेशीर असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ही कारवाई थांबवावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. मात्र, मुंढे यांनी त्याकडे दुर्लक्ष करत कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. यापार्श्वभूमीवर मंचने सोमवारी पीएमपी कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. 
मंचचे अध्यक्ष दिलीप मोहिते, इंटकचे महासचिव नुरूद्दीन इनामदार, निवृत्त सेवक किशोर जोरी, दिलीपसिंग विश्वकर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यावर ठाम राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्य कार्यालयाबाहेर कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय हातात तिरंगा घेऊन आंदोलन करतील, असे मोहिते यांनी सांगितले. मेळाव्यामुळे मुंढे यांच्या कार्यपध्दतीवर कर्मचाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली. कुटूंबप्रमुख म्हणून मुंढे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याची गरज आहे. मात्र, या अडचणींकडे दुर्लक्ष करून केवळ कारवाई केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रोजगाराची हमी वाटत नाही. बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, पण त्यांच्यासोबत प्रामाणिक कर्मचारीही भरडले जात आहेत, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्याचे मोहिते यांनी सांगितले. 

बससेवा विस्कळीत होणार
महाराष्ट्र कामगार मंचने प्रजासत्ताक दिनावर टाकलेल्या बहिष्कारामुळे त्यादिवशी सकाळी बस सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. इंटकने या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला नसला तरी महासचिवांनी मेळाव्याला उपस्थिती लावून आपली भूमिका स्पष्ट केल्याचे समजते. पीएमपी प्रशासनाकडूनही अद्याप याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. 

Web Title: PMP service disrupted on Republic Day; unwilling about Tukaram Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.