पीएमपी ठेकेदारांचा संप मागे

By admin | Published: July 1, 2017 08:06 AM2017-07-01T08:06:33+5:302017-07-01T08:06:33+5:30

दंड आकारल्याच्या कारणास्तव गुरुवारपासून पीएमपीच्या खासगी ठेकेदारांनी सुरू केलेला संप शुक्रवारी रात्री चर्चेअंती मागे घेतला.

PMP contractor retreated | पीएमपी ठेकेदारांचा संप मागे

पीएमपी ठेकेदारांचा संप मागे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दंड आकारल्याच्या कारणास्तव गुरुवारपासून पीएमपीच्या खासगी ठेकेदारांनी सुरू केलेला संप शुक्रवारी रात्री चर्चेअंती मागे घेतला. महापौर मुक्ता टिळक यांच्या मध्यस्थीनंतर पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर दंडाबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय मान्य करीत ठेकेदारांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच संप मागे घेत असल्याचे स्पष्ट केले.
पीएमपी प्रशासनाने पाच खासगी ठेकेदारांना मागील तीन महिन्यांचा सुमारे १७ कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. ब्रेकडाऊन व बसस्थानकावर बस न थांबविणे अशा विविध कारणांमुळे हा दंड आकारण्यात आला आहे. या कारणावरून पाचही ठेकेदारांनी गुरुवारी दुपारपासून अचानक संप पुकारला. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. याबाबत तोडगा निघत नसल्याचे पाहून महापौर मुक्ता टिळक यांनी मध्यस्थी करून मुंढे व पाचही ठेकेदारांची बैठक घडवून आणली. पीएमपीच्या स्वारगेट येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीस उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. सुमारे अडीच तास ही बैठक चालली.
प्रशासनाकडून आकारण्यात येणारा दंड अन्यायकारक आहे. चालकांना बसमार्गावर विविध अडचणींना सामोरे जावे लागते. मार्गावरील त्रुटींबाबत कोणताही विचार न करता एकतर्फी दंड आकारला जात असल्याचा दावा ठेकेदारांकडून करण्यात आला. या तक्रारींचा विचार करून त्याची तपासणी करण्याबाबत मुंढे यांनी होकार दर्शविला आहे. याबाबत माहिती देताना टिळक म्हणाल्या, ठेकेदारांनी केलेल्या तक्रारी विचारात घेण्याचे आश्वासन मुंढे यांनी दिले आहे. त्यामुळे ठेकेदारांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘ठेकेदारांनी आपली बससेवा सुधारायला हवी. त्याचबरोबर थांब्यावर बस थांबविणे, बस मार्गावर नेताना लॉगिन करणे, बस स्वच्छ ठेवणे या गोष्टीही करायला हव्यात. बसथांब्यावर बस थांबविल्या जात नसल्याने ठेकेदारांना दंड आकारला जात आहे. याबाबत त्यांनी केलेल्या तक्रारींची तपासणी करण्यात येईल,’ असे मुंढे यांनी सांगितले.
प्रवासी दुसऱ्या दिवशीही ‘लटकलेले’-
पुणे : खासगी ठेकेदारांनी केलेल्या बंदमुळे सलग दुसऱ्या दिवशीही पीएमपी बस प्रवाशांचे हाल झाले. मार्गावर बसची संख्या कमी असल्याने बहुतेक गाड्यांमध्ये गर्दी ओसंडून वाहत होती. त्यामुळे विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.
‘पीएमपी’ला पाच ठेकेदारांमार्फत भाडेतत्त्वावर बससेवा दिली जाते. त्यांच्या सुमारे ६५३ बस ताफ्यात आहेत. पीएमपी प्रशासनाकडून बेकायदेशीर व बेसुमार दंड आकारण्यावरून या ठेकेदारांनी गुरुवारी दुपारी अचानक बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुपारनंतर संपूर्ण बस संचलन कोलमडून पडले. मार्गावरील सुमारे ५५० बस अचानक बंद झाल्याने उपलब्ध बसचे नियोजन करताना पीएमपी प्रशासनाला नाकीनऊ आले. या बंदमुळे गुरुवारी प्रवाशांचे मोठे हाल झाले. हे चित्र शुक्रवारीही पाहायला मिळाले. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ११५० तर पीपीपी तत्त्वावरील २०० बस आहेत. त्यापैकी सुमारे १ हजार ते १०५० बस मार्गावर आणल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
दररोज किमान १५०० ते १६०० बस मार्गावर असतात. शुक्रवारी केवळ एक हजार बसच मार्गावर आल्याने बहुतेक बसथांब्यांवर प्रवाशांची गर्दी दिसत होती. बहुतेक बसमध्ये प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तासन्तास थांब्यावर उभे राहूनही बस येत नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला. याचा फटका नोकरदार व विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसला. महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे अनेक प्रवाशांनी पर्यायी वाहनांचा वापर केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी सकाळपासून १ हजार ते १०५० बस मार्गावर आहेत. चालकांना जादा काम देऊन बस मार्गावर आणण्यात आल्या. स्कूलबसही नंतर मार्गावर आणण्यात आल्या. आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासनातील कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या मदतीसाठी मार्गांवर पाठविण्यात आले.
बस कमी असल्याने प्रवाशांना त्रास झाला असला तरी त्यांनी पीएमपीनेच प्रवास केला. त्यामुळे प्रवाशी संख्या कमी झाली नाही. गुरुवारी सुमारे १ कोटी ४८ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. तेवढेच उत्पन्न शुक्रवारीही मिळेल, असा दावा पीएमपीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.

Web Title: PMP contractor retreated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.