समन्वय, संवादाची भूमिका घेणे आवश्यक - संतोष पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 02:51 AM2017-11-28T02:51:28+5:302017-11-28T02:51:32+5:30

भारतीय राज्यघटनेला मानून काम करणारी ही चळवळ आहे. व्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मात्र, आजकाल असहिष्णुता वाढली असून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे.

 Need to get the coordination, communication role - Santosh Pawar | समन्वय, संवादाची भूमिका घेणे आवश्यक - संतोष पवार

समन्वय, संवादाची भूमिका घेणे आवश्यक - संतोष पवार

Next

भारतीय राज्यघटनेला मानून काम करणारी ही चळवळ आहे. व्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मात्र, आजकाल असहिष्णुता वाढली असून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. अशा वेळी लेखक, कवींनी आपल्या लिखाणातून वास्तव चित्रण करण्याचे धाडस दाखवले पाहिजे. समाजात समानता रुजवायची असेल तर धार्मिक, जातीय तेढ बाजूला ठेवून प्रत्येकाने समन्वयाची, संवादाची भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मत कवी आणि युवा विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले.

विद्रोह अर्थात नकार. समाजातील विशिष्ट जातीला, घटकाला दुय्यम वागणूक मिळू नये, सर्व स्तरांतील साहित्याचे स्वागत व्हावे, अशी संकल्पना त्यामागे होती. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे विचार मानणाºया परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विद्रोही चळवळीची सुरुवात केली. १९९९मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईला भरलेले असताना धारावी येथे पहिले विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
बाबूराव बागुल या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर २० विविध गटांनी मिळून अनेक ठिकाणी संमेलने आयोजित केली. फुले, शाहू, आंबेडकर चळवळ मानणारे, डाव्या विचारसरणीचे, कम्युनिस्ट असे सर्व कार्यकर्ते त्या वेळी एकत्र होते. कालांतराने काही कारणाने विद्रोही चळवळीमध्येही गट पडले. पण, चळवळीचा गाभा कायम राहिला आहे.
मी पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाला हजेरी लावली. तेव्हा खूप लहान होतो. त्यानंतर चळवळीचा सखोल अभ्यास करू लागलो. कविता लिहीत राहिलो आणि विद्रोही विचारधारेशी समरस झालो. आजवरच्या प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वादाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. साहित्यामध्ये अभिजन, बहुजन अशी वर्गवारी होणे चुकीचे आहे. विचारांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. आजकाल देशात धार्मिक भावना तीव्र झाल्या आहेत. टोकाला जाऊन हिंसेचा पुरस्कार होऊ लागला आहे. आपल्या अधिकारांसाठी विविध जातींचे मोर्चे निघत आहेत. समाजात समानता रुजवायची असेल तर कोणत्याही विशिष्ट जाती, धर्माचा द्वेष करणे चुकीचे आहे. समाज एकत्रित राहिला पाहिजे, हीच विद्रोही साहित्य चळवळीची कायम भूमिका राहिली आहे. धार्मिक, जातीय तेढ बाजूला ठेवून प्रत्येकाने समन्वयाची, संवादाची भूमिका घेणे आवश्यक आहे. समानतेची चळवळ रुजवताना व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे कामही विद्रोही चळवळीने केले आहे. समाजातील सर्व स्तरांमध्ये संवादाची भूमिका कायम राहावी, कोणालाही दुय्यम वागणूक मिळू नये, यासाठीच आजवर प्रयत्न झाले आणि यापुढेही होत राहतील.
भारतीय राज्यघटनेला मानून काम करणारी ही चळवळ आहे. व्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मात्र, आजकाल असहिष्णुता वाढली असून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. समाजात पूर्वीपासून कमी-अधिक प्रमाणात असहिष्णुता होतीच; मात्र, सत्तेचे बळ मिळाल्यापासून असहिष्णुतेची तीव्रता वाढली आहे. लेखक, कवींना लिखाणापासून परावृत्त केले जात आहे. सरकारच्या विरोधात लिहिण्यावर बंधने आणली जात आहेत. समाजहिताचा विचार करणाºया, त्यासाठी झटणा-या विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या. सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी लेखक, कवींनी आपल्या लिखाणातून वास्तव चित्रण करण्याचे धाडस दाखवले पाहिजे. समाजातील घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यकृतीतून उतरले पाहिजे.
शासनाच्या चुकीच्या धोरणांचा सजग नागरिकांकडून निषेध केला जाईल, यात शंकाच नाही. कलावंतांचा सहृदयतेने विचार केला जाणे आवश्यक आहे. भ्रमिष्टाचा जाहीरनामा, पिढीपेस्तर प्यादेमात आदी कवितांमधून मी मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. सध्या ग्रामीण भागातून अनेक कवी पुढे येत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा अभ्यास करणारे नवीन लेखक, कवी निर्माण झाल्यास चळवळीला आणखी बळकटी मिळेल, यात शंका नाही.

Web Title:  Need to get the coordination, communication role - Santosh Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे