मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या वसंतराव भालेरावांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 02:56 PM2023-05-23T14:56:50+5:302023-05-23T15:00:24+5:30

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या...

NCP's Vasantrao Bhalerao as Chairman of Manchar Agricultural Produce Market Committee | मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या वसंतराव भालेरावांची बिनविरोध निवड

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या वसंतराव भालेरावांची बिनविरोध निवड

googlenewsNext

मंचर (पुणे) :  मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव भालेराव व उपसभापतीपदी सचिन पानसरे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस. रोकडे यांनी दिली.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या. तर एका जागी राष्ट्रवादी बंडखोर माजी सभापती देवदत्त निकम हे निवडून आले होते. आज सभापती, उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी निकम हे गैरहजर राहिले होते. सभापती पदासाठी वसंतराव भागुजी भालेराव यांनी अर्ज भरला. त्यांना संदीप दत्तात्रय थोरात हे सूचक तर शिवाजी बाबुराव ढोबळे हे अनुमोदक होते.

उपसभापतीपदी पदासाठी सचिन हरिभाऊ पानसरे यांनी अर्ज भरला. त्यांना निलेश विलास थोरात हे सूचक तर सोमनाथ वसंतराव काळे हे अनुमोदक होते.दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी रोकडे यांनी केली.यावेळी संचालक रामचंद्र गावडे, गणेश वायाळ, मयुरी भोर, रत्ना गाडे, जयसिंग थोरात, सखाराम गभाले, संदीप चपटे, अरुण बांगर, राजेंद्र भंडारी, लक्ष्मण बाणखेले, सुनील खानदेशे आदी उपस्थित होते.

शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती वसंतराव भालेराव व उपसभापती सचिन पानसरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लाला बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर तालुकाप्रमुख दिलीप पवळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्याची आतिषबाजी तसेच भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली.

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. सत्काराला उत्तर देताना सभापती वसंतराव भालेराव यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसह बाजार समितीतील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, प्रशासन गतिमान करत व्यवसाय वाढवण्याबरोबर लवकरच भाजी बाजार सुरू करणार असल्याचे सांगितले. दरम्यान सर्वांना संधी मिळावी या दृष्टीने सभापती व उपसभापती यांना प्रत्येकी अडीच वर्षाचा कालावधी दिला असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी सांगितले.

Web Title: NCP's Vasantrao Bhalerao as Chairman of Manchar Agricultural Produce Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.