पुण्यामध्ये सर्वाधिक दावे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:51 AM2018-09-10T01:51:15+5:302018-09-10T01:51:17+5:30

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दर तीन महिन्यांनी आयोजिण्यात येत असलेल्या महालोकअदालतीमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळवला.

Most claims were settled in Pune | पुण्यामध्ये सर्वाधिक दावे निकाली

पुण्यामध्ये सर्वाधिक दावे निकाली

Next

पुणे : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दर तीन महिन्यांनी आयोजिण्यात येत असलेल्या महालोकअदालतीमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळवला.
राज्यात ३४ जिल्ह्यांत ८ सप्टेंबरला महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण ७ लाख ७९ हजार ५८३ खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ३८ हजार ६४ दावे निकाली काढण्यात आले. पुणे जिल्ह्यात ७९ हजार ३१२ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३७ हजार ७२१ दावे निकाली काढण्यात आले, तर सातारा जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तेथे १ लाख १७ हजार ७२१ पैकी ३२ हजार ६१५ दावे निकाली निघाले. त्यानंतर तिसरा क्रमांक रागयड जिल्ह्याचा लागला. रायगडमध्ये ५९ हजार ९२७ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी १४ हजार ५१४ दावे निकाली काढण्यात आले. पुण्यात निकाली काढलेल्या दाव्यात ३५ हजार ४४७ दावे दाखलपूर्व आहेत, तर २ हजार २७४ दावे प्रलंबित स्वरूपाचे आहेत. यात ३९ कोटी ४० लाख ९३ हजार २५८ रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली. दाखलपूर्व आणि प्रलंबित असे दोन प्रकारचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी दिली.
जुलै महिन्यात झालेल्या लोकअदालतीमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळवला होता. पुण्यात ६५ हजार १४७ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २५ हजार ७६५ दावे निकाली काढण्यात आले. निकाली काढलेल्या दाव्यात २३ हजार १४२ दावे दाखलपूर्व आहेत, तर २ हजार ६२३ दावे प्रलंबित स्वरूपाचे होते. २० कोटी ३५ लाख ८३ हजार ६८३ रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली होती. धनादेश बाऊन्स, बँक, मोटार अपघात न्याय प्राधिकरण, वीज, पाणी, वैवाहिक, जमिनीसंबंधी वाद, महसूल, विविध सेवा आणि तडजोड योग्य फौजदारी, दिवाणी स्वरूपाचे प्रलंबित दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी लोकअदालत होते.
>मोटार अपघात न्याय प्राधिकरणाच्या ३६ दाव्यांत तडजोड
अपघातात मृत्यू व्यक्तींचे वारस अथवा जखमी झालेल्या व्यक्ती नुकसानभरपाईसाठी मोटार अपघात न्याय प्राधिकरणात दावा दाखल करतात. महालोकअदालतीत अशा स्वरूपाचे ११५ दावे तडजोडीसाठी होते. त्यापैकी ३६ दाव्यांमध्ये तडजोड झाली. त्यामध्ये २ कोटी ६६ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांनी दिली.
>कौटुंबिक न्यायालयात ८ खटले निकाली
कौटुंबिक न्यायालयातदेखील लोकअदालत भरविण्यात आली होती. या ठिकाणी एकूण ७२ खटले निकालासाठी ठेवण्यात आले होते. त्यातील ८ दावे निकाली निघाले. न्यायाधीश व्ही. व्ही. शहापूरकर, एस. जी. तांबे आणि डी. डी. जोशी यांच्या पॅनलने हे आदेश दिले, अशी माहिती दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.
>जिल्हा निकाली निघालेले दावे नुकसानभरपाई
पुणे ३७,७२१ ३९,४०,९३,२५८
सातारा ३२,६१५ १६,९४,९२,३०३
रायगड १४,१६४ १४,९४,०९,१००
नाशिक १२,५१४ १६,९७,३५,६८७
मुंबई ५९३२ १८,०७,०३,४०३

Web Title: Most claims were settled in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.