नागरिकांचा विरोध असताना मोनोरेल नाही होणार; पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन

By श्रीकिशन काळे | Published: March 22, 2024 02:29 PM2024-03-22T14:29:23+5:302024-03-22T14:29:51+5:30

कोथरूड परिसरातील थोरात उद्यानात मनपाच्या वतीने मोनोरेल प्रकल्प साकारणार असून त्यासाठी उद्यानातील झाडांची कत्तल होणार होती

Monorail wont happen amid citizen opposition Pune Municipal Commissioner's assurance | नागरिकांचा विरोध असताना मोनोरेल नाही होणार; पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन

नागरिकांचा विरोध असताना मोनोरेल नाही होणार; पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन

पुणे : कोथरूडमधील थोरात उद्यानामध्ये महापालिकेच्या उद्यान विभागाकडून मोनोरल प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला. आता नवीन महापालिका आयुक्त आले असून, त्यांना नागरिकांनी भेटून मोनोरेल प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. त्यावर आयुक्तांनी झाडे तोडून मोनोरेल होणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

कोथरूड परिसरातील थोरात उद्यानात मनपाच्या वतीने मोनोरेल प्रकल्प साकारणार आहेत. त्यासाठी उद्यानातील झाडांची कत्तल होणार आहे. या उद्यानामध्ये यांत्रिकीकरण केले जाणार आहे. यामुळे उद्यानामध्ये मोकळा श्वास घेण्यासाठी जागाच राहणार नाही. त्या ठिकाणचे पदपथ, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी आदी अनेक सुविधा काढाव्या लागणार आहेत. याचमुळे प्रकल्पास नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. कोथरूड मोनोरेल विरोधी कृती समिती आणि खासदार वंदना चव्हाण यांच्यावतीने या प्रकल्पाचे काम थांबवण्यात यावे, त्यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेण्यात आली. यावेळी भेटीदरम्यान थोरात उद्यानाच्या सोबत मुठा नदी काठ सुशोभीकरण कामाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून उद्यानात पुणे मनपाच्या मोटर वाहन विभागातर्फे मोनोरेल साकारण्यासाठी या ठिकाणी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध काम सुरू आहे. प्रदूषण वाढत असताना झाडे कापून तिथे सिमेंटीकरण करून मोनोरेल कशाला उभी करायची, असा सवाल वंदना चव्हाण यांनी उपस्थित केला. मुठा नदीकाठ सुशोभीकरण होत असून, या ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे काळाची गरज आहे. अन्यथा सांडपाणी आहे त्या स्वरूपात नदीमध्ये मिसळल्यास नदी काठाचे सुशोभीकरण आणि नदीचे प्रदूषण असे चित्र पाहायला मिळणार आहे. चव्हाण यांनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वप्रथम सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारावा अशी मागणी केली.

खडकवासला धरण क्षेत्राच्या लगत शहरीकरण वाढतेय. त्याठिकाणी मैला पाणी खडकवासला धरणामध्ये मिसळत आहे. याबाबत सुद्धा लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणी आयुक्तांकडे केली.

...तर कोणताही प्रकल्प नाही करणार !

मनपाचे नवनियुक्त आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. आयुक्तांनी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही उपक्रम राबविण्यात येणार नाही. नागरिकांचे हित लक्षात घेतले जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

Web Title: Monorail wont happen amid citizen opposition Pune Municipal Commissioner's assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.