अल्पवयीन मुले व्यसनाच्या विळख्यात, पालकांमध्ये वाढते चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 06:37 PM2018-04-13T18:37:41+5:302018-04-13T18:37:41+5:30

अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.

Knowing the addiction of minors, increasing anxiety among parents | अल्पवयीन मुले व्यसनाच्या विळख्यात, पालकांमध्ये वाढते चिंता

अल्पवयीन मुले व्यसनाच्या विळख्यात, पालकांमध्ये वाढते चिंता

Next

- हनुमंत देवकर

चाकण : अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. अगदी आठवी ते दहावीच्या वर्गातील मुले व्यसन करण्यासाठी हुक्का खरेदी करीत असून हुक्का ओढण्यासाठी वेगवेगळे फ्लेवर्स वापरीत आहेत, तर काही मुले अक्षरश: पब मध्ये जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक अल्पवयीन मुले तर दारू व बिअर पिण्यासाठी वर्षातून अनेकदा कोकणात बीचवर जाऊन मजा लुटण्यासाठी फिरायला जाताना दिसत आहे. मात्र काही गोष्टी पालकांच्या कानावर येऊनही ‘आपला तो बाब्या...’ या उक्तीप्रमाणे आमचा पोरगा तसा नाही म्हणून कानाडोळा करणारे पालक याबाबत अजूनही अनभिज्ञ आहेत. अल्पवयीन मुलां बरोबरच तरुणाई आजकाल वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली रात्री उशिरा हॉटेलात दारू पिऊन मोक्याच्या चौकात, रस्त्यावर केक कापताना दिसत आहेत. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने औद्योगिक कंपन्यांमधून दुसऱ्या पाळीतून कामावरून घरी येणाऱ्या महिला कामगारांना याची भीती वाटते. मागील काही दिवसांपासून मुख्य रस्त्यांवरून उशिरा पोलीस गस्ती घालीत असल्याने रस्त्यावर केक कापून धिंगाणा घालणाऱ्या प्रकारात मात्र चांगलीच घट झाली आहे. 

सोशल मीडियातूनही फोफावते व्यसनाधीनता व गुन्हेगारी 
आजकाल घरातील लहान मुलांकडेही मोबाईल पाहायला मिळतात, मात्र या वयात मोबाइल हाताळताना त्यांच्यात अजून परिपक्वता आली नाही याचा विसर पालकांना पडला आहे. अशी मुले सर्रास व्हॉट्सअॅपचा वापर करीत आहेत. अगदी दहा ते सोळा वर्षाच्या मुलांचे फेसबुकवर अकाउंट पाहायला मिळते. व्हॉट्सअॅप स्टेटस व फेसबुकवरील पोस्ट मुळेही गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून सोशल मीडियासारख्या माध्यमाचा एखाद्याची बदनामी, जाती धर्मात दुही माजविण्यासाठी गैरवापर केला जात आहे, अशा गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. पण हे काम सायबर क्राईमचे आहे, असे सांगून स्थानिक पोलीस यापासून चार हात दूर राहत आहेत. 

गुटखा बंदी असूनही होते चोरून विक्री ( गुटख्याचा कोड वर्ड ‘हॉट‘ ) 
महाराष्ट्रात गुटखा बंदी झाली असली तरी राज्यामध्ये चोरून गुटखा विक्री करण्याचे मोठे प्रमाण आहे, मागील महिन्यात कुरुळी गावच्या हद्दीत काही कोटींचा गुटखा साठा सापडल्याने याची राज्यात किती मोठी व्याप्ती असेल याचा अंदाज येतो. अबालवृद्ध या गुटख्याच्या आहारी गेले असून पावलोपावली पानटपऱ्या व किराणा दुकानांमध्ये गुटखा चोरून विकला जात आहे. गुटख्याचा कोड वर्ड ‘हॉट’ असा असून चोरून माल टाकणारा गुटखा माफिया फक्त दुकानदाराला हॉट म्हणून हटकतो. गांजा व सिगारेटचे व्यसन करणारी मुलेही मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्यात परप्रांतीय मुलांचा मोठा सहभाग दिसून येतो. 

गुटखा विक्री करणाऱ्यांना असं केले जातंय ब्लॅकमेल 
गुटखा विक्री करणाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्यांची टोळी चाकण परिसरात सक्रिय आहे. टोळीतील एकजण टपरीवर जाऊन गुटखा आहे का विचारतो, पुडी खरेदी करून खात्री करतो, त्यांनतर त्याच्याकडे हप्ता मागितला जातो, हप्ता दिला नाहीतर महिलेचा वापर करून विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. आणि नाईलाजाने हप्ता दिला जातो. अशाच प्रकारे अवैधरित्या हंडी गॅस रिफिलिंग करणारांकडूनही हप्ता वसूल केला जातो. राज्यात गुटखा बंदी असतानाही चोरून विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. 
- कुशल जाधव ( अध्यक्ष श्री शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ ) 


दारू, गुटखा विकणाराचे नाव कळवा, १०० टक्के कारवाई करणार 
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जर कोणी चोरून अफू, गांजा, दारू व गुटखा विक्री करीत असेल तर अशा इसमांची नावे आम्हाला कळवा, त्यांच्यावर १०० टक्के कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- मनोजकुमार यादव ( पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस स्टेशन ) 

कायद्यानुसार कारवाई आवश्यक
गांजा व चरस सारख्या अंमली पदार्थाद्वारेच नशा करता येते, असे नाही तर घरांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑयोडेक्स, ग्लुस्टिक, नेलपेंट, व्हाईटनरचा वापर अंमली पदार्थ म्हणून केला जात असल्याने व त्याला अल्पवयीन मुले बळी पडत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. जवळपास अडीचशे प्रकारच्या अंमली पदार्थाना देशात बंदी घालण्यात आली असून त्यात प्रामुख्याने गांजा, चरस, हेरॉईन, ब्राऊन शुगर, कफ सिरप, कोकेन, एमडी, अफीम आदींचा त्यात समावेश आहे. मात्र, या व्यतिरिक्तही अनेक पदार्थ नशेकरिता वापरण्यात येतात. ऑयोडेक्स, ग्लुस्टिक, नेलपेंट, व्हाईटनर, स्प्रेपेंट आदींपासूनही नशा करता येते. या सर्व वस्तू घराघरांमध्ये उपलब्ध असतात. पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरात शाळकरी व अल्पवयीन मुले अशा वस्तूंचा नशेकरिता वापर करीत असल्याचे प्रकार उघड होत असून देशाच्या ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. या पदार्थाच्या विक्रीवर बंदी नाही. ते औषध किंवा इतर दुकानात सहज मिळते. या पदार्थाद्वारे नशा करणाऱ्यांवर कारवाई कशी करणार, हा प्रश्न अंमली पदार्थ विरोधी यंत्रणांच्या समोर उभा ठाकला आहे.
- आशा भट ( सामाजिक कार्यकर्त्या ) 

आईवडिलांनी काळजी घ्यावी
अल्पवयीन व तरुण मुले लहानपणापासून आई-वडिलांच्या सान्निध्यात असतात. मात्र, व्यसनांच्या आहारी गेलेल्या मुलांच्या स्वभावात झपाटय़ाने बदल होतो. त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध काही घडल्यास ते चिडचिड करतात. मुलांमध्ये अशाप्रकारचे बदल दिसून आल्यावर आईवडिलांनी अधिक सजग व्हावे. मुलगा अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे समजताच वेळीच त्यांच्यावर डॉक्टरांमार्फत उपचार करावेत. यासाठी सर्व स्तरातून जनजागृती करण्यात यावी. 
- डॉ. विशाल गारगोटे ( व्यसनमुक्ती प्रसारक ) 

शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती
घराघरांमध्ये सहज उपलब्ध पदार्थामधूनही नशा केली जाते हे लोकांना सांगावे लागेल. त्यासाठी जनजागृती करणे हाच एक पर्याय आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांमध्ये पथनाटय़ करून जनजागृतीची मोहीम हाती घेतली पाहिजे. यातून मुलांच्या पालकांनाही संदेश दिला जातो. मात्र, अशा अंमली पदार्थावर नियंत्रण आणण्यासाठी पालक जागृत असणे आवश्यक आहे. कायद्यात अशा अंमली पदार्थाविरुद्ध कारवाई करण्यासाठी काहीही तरतुदी नाहीत. आम्ही आमच्या वडवानल या संस्थेच्या माध्यमातून शाळा, कॉलेज व सार्वजनिक ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करीत असतो. 
- दीपक मांडेकर ( सामाजिक कार्यकर्ता ) 
 

Web Title: Knowing the addiction of minors, increasing anxiety among parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.