जय गणेश! सुवर्णपाळण्यात होणार 'दगडूशेठचा' गणेश जन्म सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 09:05 AM2023-01-24T09:05:28+5:302023-01-24T09:05:56+5:30

भाविकांसाठी पहाटे ३ पासून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार

Jai Ganesha! Ganesh birth ceremony of 'Dagdusheth' will be held in Suvarnapalan | जय गणेश! सुवर्णपाळण्यात होणार 'दगडूशेठचा' गणेश जन्म सोहळा

जय गणेश! सुवर्णपाळण्यात होणार 'दगडूशेठचा' गणेश जन्म सोहळा

googlenewsNext

पुणे: स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपतीमंदिरात श्री गणेश जन्म सोहळा होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच बुधवार, दिनांक २५ जानेवारी रोजी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा सुवर्णपाळण्यात हा सोहळा पार पडणार आहे. भक्तांनी दिलेल्या देणगीतून हा पाळणा साकारण्यात आला आहे. पाळण्याकरिता पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टँड तयार करण्यात आला असून त्यावर ८.५ किलो चांदी वापरण्यात आली आहे. तसेच त्यावर सोनाचे पॉलिश देखील करण्यात आले आहे. या स्टँडवर १६ बाय २४ इंचाचा सोन्याचा पाळणा साकारण्यात आला असून त्याकरिता २ किलो २८० ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे.
 
बुधवारी पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत पद्मश्री उस्मान खान हे सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण करणार आहेत. मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. त्यापूर्वी पहाटे ३ वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक होणार आहे.
 
सकाळी ७ वाजता गणेशयाग, दुपारी ३ वाजता सहस्त्रावर्तने होणार आहेत. तर, सायंकाळी ६ वाजता नगर प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. तसेच रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत गणेश जागर मंदिरामध्ये होणार आहे. मंदिरात आकर्षक पुष्पआरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात येणार आहे. भाविकांसाठी पहाटे ३ पासून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Web Title: Jai Ganesha! Ganesh birth ceremony of 'Dagdusheth' will be held in Suvarnapalan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.