डीजेमुक्त ईदसाठी पुण्यातील मुस्लिम संघटनांचा पुढाकार; १००पेक्षा अधिक मंडळांनी केला डीजे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:28 PM2017-12-01T13:28:48+5:302017-12-01T13:35:01+5:30

डीजे विरहीत ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ साजरी करण्यासाठी पुण्यातील जवळपास ४५ मुस्लिम संघटनांनी पुढाकार घेतला असून मंडळांच्या कार्यकर्त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

Initiative of Muslim organizations in Pune for DJ Free Eid; More than 100 organisation have canceled the DJ | डीजेमुक्त ईदसाठी पुण्यातील मुस्लिम संघटनांचा पुढाकार; १००पेक्षा अधिक मंडळांनी केला डीजे रद्द

डीजेमुक्त ईदसाठी पुण्यातील मुस्लिम संघटनांचा पुढाकार; १००पेक्षा अधिक मंडळांनी केला डीजे रद्द

Next
ठळक मुद्दे१०० पेक्षा अधिक मंडळांनी डीजे विरहीत ईद साजरी करण्याचा घेतला निर्णयडीजे लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, संघटनांच्यावतीने पोलिसांना देण्यात येणार पत्र

पुणे : डीजे विरहीत ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ साजरी करण्यासाठी पुण्यातील जवळपास ४५ मुस्लिम संघटनांनी पुढाकार घेतला असून मंडळांच्या कार्यकर्त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. धर्मगुरु, मौलवी यांच्या समुपदेशनामुळे १०० पेक्षा अधिक मंडळांनी डीजे विरहीत ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला असून प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बंधुभाव-भाईचारा फाऊंडेशनचे सचिव यासीन शेख यांनी दिली. 
येत्या शनिवारी ईद साजरी होत आहे. या दिवशी दुपारी अडीच वाजल्यापासून मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. नाना पेठेतील मन्नूशाह मशिदीपासून सुरु होणारी ही मिरवणूक रविवार पेठेतील सुभानशाह दर्ग्यापाशी संपणार आहे. पुण्याच्या विविध भागांमधून मिरवणूका निघतात. या मिरवणुकांमध्ये स्पिकरच्या भिंती उभारलेल्या डीजेंवर गाणी वाजविली जातात. त्यामुळे समाजातील मान्यवरांनी स्पिकर वाजविणे इस्लाममध्ये नामंजूर असल्याने ही पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरातील विविध मशिदींमधील मौलवी, समाजातील जबाबदार आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या मध्यस्तीने मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायला सुरुवात करण्यात आली आहे. 
या उपक्रमामध्ये जवळपास ४५ संघटना सहभागी झाल्या आहेत. सिरत कमिटी, इंडीयन मुस्लिम फ्रंट, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, मुस्लिम एकता फाऊंडेशन, भंडारशहा बाबा ट्रस्ट, बाबाजान दर्गा ट्रस्ट, बंधूभाव भाईचारा फाऊंडेशन आदी संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते अहमदभाई सय्यद यांच्या पुढाकाराने या उपक्रमाला सुरु वात झाली आहे. या संघटनांचे नदीम मुजावर, मुनव्वर कुरेशी, उस्मान तांबोळी, आमिन शेख, बंधूभाव-भाईचाराचे शब्बीरभाई शेख यांनी तरुणांशी संवाद साधून धर्माचा आणि कायद्याचा आदर करुन डीजे न लावण्याबाबत विनंती केली. शहरामध्ये आतापर्यंत जवळपास २५ पेक्षा अधिक बैठका घेण्यात आलेल्या आहेत. नुकतीच याबाबतीत आझम कॅम्पसमध्ये बैठक घेण्यात आली होती. गेल्या वर्षी बंधूभाव-भाईचारा फाऊंडेशनच्यावतीने असाच उपक्रम राबवित अडीच हजार गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले होते. कायद्याचा भंग करुन डीजे लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी असे लेखी पत्रही सर्व संघटनांच्यावतीने पोलिसांना देण्यात येणार आहे. 

Web Title: Initiative of Muslim organizations in Pune for DJ Free Eid; More than 100 organisation have canceled the DJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे