आवाज कमी डीजे तुझा...  गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे; तर ढोलताशांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:35 AM2017-09-07T02:35:44+5:302017-09-07T02:36:07+5:30

यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण २५ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदवले. विसर्जन मिरवणुकीत गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे तर ढोलताशांचा होता.

 The noise was less than the DJ ... It was noisy but not the DJ; But Dholatash's | आवाज कमी डीजे तुझा...  गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे; तर ढोलताशांचा

आवाज कमी डीजे तुझा...  गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे; तर ढोलताशांचा

Next

ठाणे : यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण २५ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदवले. विसर्जन मिरवणुकीत गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे तर ढोलताशांचा होता. यंदा डीजेचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
डॉ. बेडेकर म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी शांतता असावी, याकरिता कोर्टाचे आदेश आहेत. रुग्णालयात स्वच्छता, उपचाराबरोबर शांतता पण असायला हवी. शाळेत विद्यार्थ्यांना शांततेत शिक्षण घेता यायला हवे. पण, दुर्दैवाने आतापर्यंत हा विचार केला जात नव्हता. म्हणूनच, कोर्टाने शांतता क्षेत्रे निश्चित केली. धार्मिकस्थळी आपण गोंगाट करायला जात नाही. शांतचित्ताने दर्शन मिळावे, हाच हेतू असतो. धार्मिक स्थळे, कोर्ट, शाळा आणि रुग्णालये या चारही ठिकाणी शांतता लागते. परंतु, दुर्दैवाने तो विचार आतापर्यंत झाला नाही. म्हणून, कायदे करावे लागले. आपली शहरे नियोजनबद्ध नाहीत. कुठेही शाळा, रुग्णालये आहेत. आमचे म्हणणे इतकेच आहे की, मिरवणुकीत धार्मिकतेच्या नावाखाली ज्या पद्धतीची गाणी वाजवली जातात व रुग्ण, विद्यार्थी यांना त्रास होतो, ते चुकीचे आहे. चुकीच्या प्रथा मिरवणुकीत शिरल्या आहेत. त्याच्यात बदल व्हावे, ही माफक अपेक्षा आहे. मिरवणुकीतील गोंगाटाचे समर्थन करताना धर्माचा आधार घेणे चुकीचे आहे. शांततेत मिरवणुका काढा. यंदाच्या मिरवणुकीत दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या, त्या म्हणजे २५ टक्क्यांनी ध्वनिप्रदूषण कमी झाले. ढोलताशाचा भर ध्वनिप्रदूषणात पडला असला तरी डीजेचे प्रमाण मात्र कमी झाले होते. यापूर्वी मिरवणुकीत ६० ते ७० टक्के ध्वनिप्रदूषण डीजेमुळे होत असे. यावेळी ६० ते ७० टक्के ध्वनिप्रदूषण ढोलताशामुळे होते आणि २० ते ३० टक्के डीजेमुळे झाले. डीजेचे प्रमाण कमी झाले, हे मात्र निश्चित.
ढोलताशा, बेंजो यांची भर यंदा ध्वनिप्रदूषणात पडली. अगोदर डीजेवर वाटेल त्या गाण्यांवर नाचायचे प्रमाण यंदा नक्कीच कमी झाले. फटाके फोडण्याचे प्रमाण मात्र कमी नव्हते. प्रामुख्याने जाणवले ते म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी-कार्यकर्ते वाहतूक व्यवस्थेचे नियोजित करत होते. वाहतुकीचे नियोजन यावेळी दिसून आले. एक दोन नव्हे तर १० ढोल वाजवले जात होते. त्यामुळे तक्रारी करण्याचे प्रमाणही वाढले.
लोकांचे मला खूप फोन आले. लोकांमध्ये जागरूकता वाढली आणि जागरूकता वाढवणे, हाच आमचा हेतू आहे, तो साध्य झाला. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते की, डेसिबल पातळी मर्यादित ठेवा, पण लोकांनी ते ऐकले नाही. पोलीसही ही मर्यादा पाळा, असे सांगताना दिसले नाही. पोलिसांनी सांगितले असते, तर लोकांनी ऐकले असते, असे डॉ. बेडेकर म्हणाले.

Web Title:  The noise was less than the DJ ... It was noisy but not the DJ; But Dholatash's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.