भुयारी मार्गातील बाधितांना त्याच परिसरात मिळणार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:28 AM2019-02-24T00:28:31+5:302019-02-24T00:28:42+5:30

कामाची निविदा मंजूर : कोणीही विस्थापित होणार नाही

Houses will be available in the suburbs of the subway in the same area | भुयारी मार्गातील बाधितांना त्याच परिसरात मिळणार घरे

भुयारी मार्गातील बाधितांना त्याच परिसरात मिळणार घरे

Next

पुणे : मेट्रोच्या रेंजहिल ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. रेंजहिल ते फडके हौद या मार्गाच्या कामाची निविदा मंजूर झाल्यानंतर आता फडके हौद ते स्वारगेट या मार्गाच्या निविदेलाही गुरुवारी मंजुरी मिळाली. फडके हौद ते स्वारगेट या मार्गाचे काम सुरू असताना एकूण २९६ निवासी व १०६ व्यावसायिक मालमत्ता बाधित होणार आहेत. या सर्वांचे पुनर्वसन त्यांच्याच परिसरात होण्याचे नियोजन मेट्रोने केले असून एकहीजण विस्थापित होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.


पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्वत: यात लक्ष घातले आहे. कसबा पेठेतील काही घरे यात बाधित होत आहेत. त्या सर्वांना महापालिकेच्या त्याच परिसरात असलेल्या एका शाळेत जागा देण्यात येणार असून त्यासंबधीची प्रशासकीय पूर्तता करण्यात येत आहे. ती झाल्याशिवाय कोणालाही त्यांच्या आताच्या जागेतून हलवण्यात येणार नाही. रेंजहिल ते स्वारगेट हा भूयारी मार्ग ५.१ किलोमीटरचा आहे. त्यात शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, फडके हौद, मंडई व स्वारगेट अशी ५ स्थानके आहेत. ती जमिनीच्या खाली असली तरी स्थानकातून वर येण्यासाठी म्हणून जमिनीवर काही जागा लागणार आहे. त्यामुळे ही घरे व दुकाने बाधीत होत आहेत.


भुयारी मार्गात दोन बोगदे असतील. तेही जमिनीखाली १८ ते २२ मीटर खाली असतील. प्रत्येक बोगद्याचा व्यास ६.३५ असणार आहे. हाँगकाँग येथून बोगदा खणणारी यंत्रे आयात करण्यात येणार आहेत. सप्टेंबरपर्यंत ती येतील. एकूण चार यंत्रे आहेत. ही यंत्रे जमिनीत खाली उतरवण्यासाठी रेंजहिल येथे व स्वारगेट येथे शाफ्टचे काम सुरू करण्यात आले आहे. यंत्राची लांबी ९० मीटर असेल. बोगद्याच्या आकाराचेच कटर त्याला असतील. जमिनीखाली २२ मीटर अंतरावर ही यंत्र सरळ पुढेपुढे बोगदा तयार करत जातील.
त्यातून निघणारी खडी, माती, यंत्रामधून थेट मालमोटारींमध्ये भरली जाणार आहे. बोगदा तयार करण्याचे काम सुरू असतानाच तयार झालेल्या भागाला यंत्राद्वारेच काँक्रिट रिंगही बसवल्या जातील.

1दोन यंत्र स्वारगेटकडून व दोन यंत्र रेंजहिलकडून अशी एकूण चार यंत्रे बोगदा तयार करण्याचे काम करतील. मंडई परिसरात ही चारही यंत्रे जमिनीवर घेतली जातील. जमिनीखालील स्थानकातून प्रवाशांना वर येण्यासाठी लिफ्ट, सरकते जीने अशा दोन्ही व्यवस्था असणार आहेत. प्रवासी तिथून वर आले की रस्त्यावरच्या गर्दीत मिसळतील किंवा अन्य एखाद्या वाहनाने इच्छित स्थळी जातील.
2मेट्रोने केलेल्या पाहणीनुसार २९६ घरे यात बाधीत होणार आहेत. तसेच स्वारगेट येथे जास्त दुकाने म्हणजे टपऱ्या बाधीत होत आहेत. अशा बाधीत होणाºया व्यावसायिक मालमत्तांची संख्या १०६ आहे. या सर्वांबरोबर मेट्रो प्रशासन संवाद साधत असून महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

भुयार खणण्याचे काम किचकट
असल्याने संपुर्ण भूयारी मार्ग पूर्ण होण्यास साधारण दोन वर्षे लागतील असा अंदाज आहे. २४ तासांमध्ये एक यंत्र साधारण ५ मीटर अंतराचे भुयार खणते. खोदलेल्या भूयाराला काँक्रिट रिंग लावल्यानंतर त्याचा आकार एखाद्या ट्यूबसारखा होईल. येणारी व जाणारी अशा दोन मेट्रोंसाठी दोन बोगदे असणार आहेत. स्थानक असलेल्या ठिकाणी प्लॅटफॉर्मसह जमिनीखालीच बरेच मोठे अंतर असेल.

Web Title: Houses will be available in the suburbs of the subway in the same area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.