स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे हॅश टॅग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 09:01 PM2018-06-16T21:01:09+5:302018-06-16T21:01:09+5:30

स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागण्यासंदर्भात १८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हॅश टॅग आंदोलन करण्यात येणार आहे

Hash tag movement by competitive exams students | स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे हॅश टॅग आंदोलन

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे हॅश टॅग आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यासहित सर्व मंत्र्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून मागण्यांचा पाऊस पाडला जाणारअभिनव आंदोलन : एकाच दिवशी राज्यभरातून पडणार मागण्यांचा पाऊस सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहचविण्याचा निर्णय

पुणे : राज्यभरात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असताना प्रत्यक्षात भरतीसाठी निघणाºया अल्प जागा, शासकीय कर्मचाऱ्यांचे वय ५८ ऐवजी ६० करण्याचे चालू असलेले प्रयत्न, कंत्राट पध्दतीचा मोठयाप्रमाणात अवलंब, महापरीक्षा पोर्टलव्दारे होणारा गैरकारभार याविरोधात सोशल मीडियावरून पोस्ट करीत ‘हॅश टॅग’ आंदोलन केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यासहित सर्व मंत्र्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून मागण्यांचा पाऊस पाडला जाणार आहे.
हॅश टॅग आंदोलन सोमवारी (दि. १८ जून) रोजी केले जाणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमधून मोर्चे काढून त्यांनी त्यांच्या मागण्या शासनापुढे ठेवल्या होत्या. त्याचबरोबर पुणे ते मुंबई असा लॉग मार्चही या विद्यार्थ्यांनी काढला. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडून ठोस पावले उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहचविण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. किमान यामुळे तरी राज्य सरकारला जाग येईल, अशी अपेक्षा उमेदवारांतून व्यक्त होत आहे. 
राज्य शासनाकडील रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात, सेवा निवृत्तीचे वय ५५ करण्यात यावे,कंत्राट पद्धतीने नोकर भरती येऊ नये, संयुक्त परीक्षा गट- ब याची जाहिरातीच्या पदसंख्येत वाढ करावी, तलाठीची भरती एमपीएससीद्वारे व्हावी, उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात यावी, सर्व परीक्षा सीसीटीव्ही व मोबाईल जॅमर नियंत्रण कक्षेत आणावेत, राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र मुख्यालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, प्रतीक्षा यादी लावण्यात यावी आदी मागण्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शासनापुढे मांडल्या जाणार आहेत. 
राज्यभरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी १८ जून रोजी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिवसह सर्व मंत्र्यांना फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून हॅश टॅग करण्याचे असे आवाहन एमपीएससी स्टुडंट राईटसतर्फे करण्यात आले आहे. 
..............
निवृत्तीचे वय ६० नव्हे ५५ व्हावे
शासनाच्या अधिकारी व कर्मचारी संघटनांकडून निवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० करावे यासाठी शासनावर मोठयाप्रमाणात दबाव निर्माण केला आहे. यापार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मागणीला तीव्र विरोध दर्शविला आहे. उलट निवृत्तीचे वय ५८ नव्हे तर ५५ करण्यात यावे अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निवृत्ती वयाचा मुदद लावून धरल्याने शासना पुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.असे होता येईल आंदोलनात सहभागी
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागण्यासंदर्भात १८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हॅश टॅग आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्र्यांना फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करायच्या आहेत. सर्वांनी मागण्या नोंदविताना  #MPSC-STUDENTS-RIGHTS हा हॅश टॅग वापरायचा  आहे.

Web Title: Hash tag movement by competitive exams students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.