पुणे : खेळ आणि व्यायाम या गोष्टी आरोग्याचा पाया आहेत. कोणत्याही क्षेत्रात शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. टक्केवारीच्या आग्रहापायी या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे मुलांच्या हिताचे नाही, असे परखड मत माजी क्रिकेट खेळाडू सदानंद मोहोळ यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा विलास शंकर रानडे क्रीडा पुरस्कार मनीषा बाठे आणि वैशाली भट लिखित ‘गाथा क्रीडातपस्वीची (वैद्य म. द. करमरकर यांचे चरित्र)’ या ग्रंथाला सदानंद मोहोळ यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, मनीषा बाठे, वैशाली भट, परीक्षक शशिकांत भागवत उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, ‘‘उत्तम प्रकृती आणि सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासणे गरजेचे आहे, हे त्रिकालाबाधित सत्य संतानीही सांगितले आहे. खेळांमुळे खिलाडू वृत्ती वाढते. आज त्याची समाजाला गरज आहे. पराभव पचवण्याचे सामर्थ्य त्यातून लाभते,. क्रीडाविषयक लेखनाने साहित्याचे दालन समृद्ध होते.’’
मनीषा बाठे म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला सभ्यता आहे. कारण, जाती-धर्म, वर्णांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना खेळ शिकवणारे क्रीडाशिक्षक येथे होऊन गेले. क्रीडा इतिहासाबद्दल लोकांची मते फारशी बरी नसताना ‘गाथा क्रीडातपस्वीची’ या क्रीडा पुस्तकाला पुरस्कार मिळणे कौतुकास्पद आहे. मुलींनी खेळामध्ये यावे, यासाठी वैद्य म. द. करमरकर आग्रही होते.’’
मसापच्या कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. बण्डा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. वि. दा. पिंगळे यांनी आभार मानले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.