जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी फिरोजचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 10:00 AM2024-04-08T10:00:08+5:302024-04-08T10:00:27+5:30

त्याची प्रकृती खालावल्याने एक महिन्यापूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी (ता. ७) दुपारी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले....

Feroze, the accused in the Jangli Maharaj road chain blast, died during treatment | जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी फिरोजचा उपचारादरम्यान मृत्यू

जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी फिरोजचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : जंगली महाराज रस्त्यावर २०१२ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फिरोज ऊर्फ हमजा अब्दुल सय्यदचा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सय्यदला कर्करोगाने ग्रासले होते. त्याची प्रकृती खालावल्याने एक महिन्यापूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी (ता. ७) दुपारी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

जंगली महाराज रस्त्यावर एक ऑगस्ट २०१२ रोजी पाच साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात एकजण जखमी झाला होता. डेक्कन परिसरातील सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यातील पाच बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटले, तर एक बॉम्ब फुटला नव्हता. तो बॉम्बशोध व नाशक पथकाने निकामी केला. पुणे पोलिस, दहशतवादविरोधी पथक आणि दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली होती. त्यात सय्यदचा समावेश होता. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला होता.

फिरोज सय्यद हा लष्कर परिसरात टेलरिंगचा व्यवसाय करत होता. तो ‘लष्कर-ए-तय्यबा’चा दहशतवादी फैय्याज कागझीच्या संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा होता. त्याने कासारवाडी येथे भाड्याचा फ्लॅट घेऊन अन्य आरोपींसाठी ‘शेल्टर’ तयार करून दिले होते; तसेच फ्लॅटवर स्फोटके, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जमविल्या होत्या. प्रत्यक्ष जंगली महाराज रस्त्यावर स्फोटके पेरण्यातही त्याचा सहभाग होता, असा आरोप पोलिसांनी ठेवला होता. अटकेची कारवाई झाल्यापासून फिरोज हा ऑर्थर रोड कारागृहात होता. तेथूनच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा मृतदेह रविवारी रात्री कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

 

Web Title: Feroze, the accused in the Jangli Maharaj road chain blast, died during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.