Fake Facebook account; Both arrested | बनावट फेसबुक अकाऊंट; दोघांना अटक

शिक्रापूर : कान्हूर मेसाई येथे नववी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या मिडगुलवाडी येथील मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्याचा वापर केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील युवती ही कान्हूर मेसाई येथे इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. या युवतीच्या नावे कोणीतरी फेसबुक अकाऊंट बनवून ते वापरत होते. मुलीच्या भावाला फेसबुकवर बहिणीच्या नावाचे फेसबुक अकाउंट दिसून आले. याबाबत त्याचे बहिणीकडे चौकशी केल्यानंतर बनावट फेसबुक अकाऊंट असल्याची बाब समोर आली. त्यांनतर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल गुन्हा करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे व पोलीस नाईक विलास आंबेकर हे करत असताना त्यांनी सायबर विभागाकडून फेसबुक व त्याचा वापर होत असलेल्या मोबाईलची माहिती मिळवीत चौकशी केली. यात संतोष बाजीराव इचके व सुधीर सुभाष गोडसे या दोघांनी संगनमत करून या मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट उघडले असल्याचे समजले. यांनतर शिक्रापूर पोलिसांनी वरील व्यक्तींना ताब्यात घेत त्यांचेकडील मोबाईल जप्त करून तपासणी केली. त्याने बनावट फेसबुक अकाऊंट बनविले असल्याचे कबुल केले असून संतोष बाजीराव इचके (वय २१ वर्षे रा. लाखणगाव ता. आंबेगाव जि. पुणे व सुधीर सुभाष गोडसे वय ३२ वर्षे रा. खैरेवाडी ता. शिरूर जि. पुण) या दोघांना अटक केली आहे.