ब्रिटिशकालीन पुलांची ‘एक्स्पायरी डेट’ संपली; बारामती, इंदापूर, पुरंदरमधील स्थिती, नव्या पुलांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:55 PM2018-01-09T12:55:32+5:302018-01-09T12:59:49+5:30

बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची  ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

Expiry date of british bridges ended; Status of Baramati, Indapur, Purandar, Needs of new bridges | ब्रिटिशकालीन पुलांची ‘एक्स्पायरी डेट’ संपली; बारामती, इंदापूर, पुरंदरमधील स्थिती, नव्या पुलांची गरज

ब्रिटिशकालीन पुलांची ‘एक्स्पायरी डेट’ संपली; बारामती, इंदापूर, पुरंदरमधील स्थिती, नव्या पुलांची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देब्रिटिशकालीन यंत्रणा अजून बदललेली नसून, कालव्याला झाडाझुडपांचा विळखापुलांकडे व कालव्यावरील विविध बांधकामांकडे पाटबंधारे खात्याने लक्ष देण्याची गरज

सोमेश्वरनगर : बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची  ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हे पूल पाडून पुन्हा नव्याने बांधण्याची गरज आहे. 
भोर (जि. पुणे) या ठिकाणी नीरा नदीवर इंग्रज सरकारने सन १८८१ मध्ये भाटघर धरणाचे काम पूर्ण केले. तर नीरा नदीच्या दोन्ही बाजूने बारामती व इंदापूर तालुक्यासाठी नीरा डावा कालवा व फलटण व माळशिरस तालुक्यांसाठी नीरा उजवा कालवा, या कालव्याची कामेही त्याच वेळी पूर्ण केली. तसेच दोन गावांतील संपर्क वाढण्यासाठी व दळणवळणासाठी भाटघर धरणांबरोबरच कालाव्यांवरील व नीरा नदीवरील पूल तसेच पालथ्या मोऱ्या व भुयारी मोऱ्यांची निर्मिती केली. कालव्यावरील काही पुलांच्या बांधकामावेळी बांधकाम करणाऱ्या कारागिरांनी दगडावर कोरीव १८८१ हे वर्ष टाकले आहे. यावरून कालव्यावरील पूल १८८१ साली बांधल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, आज या पुलांना १३५ वर्षे पूर्ण झाली असून ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. अनेक पुलांची दगडे निखळून पडली आहेत. पुलांना मध्यभागी बोगदे पडले आहेत. तर भुयारी मोऱ्यांना पाण्याच्या धारा लागल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात पाटबंधारे खात्याने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.  १८८१मध्ये बांधलेले छोटेखानी भाटघर धरणाचे इंग्रज सरकारने १९१२ साली काम हातात घेतले. ते सलग १५ वर्षे चालले. सन  १९२७ साली नवीन भाटघर धरणाचे काम पूर्ण झाले. त्याआधी ५.३३ टीएमसी असणाऱ्या भाटघर या छोट्या धरणाचे विस्तारीकरण करून ते २३.७२ टीएमसी करण्यात आले. भारत देश स्वतंत्र झाल्यावर सन १९६४ साली पुरंदर तालुक्यातील वीर येथे नीरा नदीवर ९.०४ टीएमसी वीर धरणाचे काम पूर्ण करण्यात आले.  मात्र आता ‘आयत्या बिळावर नागोबा’ अशी अवस्था भाटघर व वीर पाटबंधारे खात्याची झाली आहे. ब्रिटिशकालीन यंत्रणा अजून बदललेली नसून, कालव्याला झाडाझुडपांनी विळखा दिला आहे तर गावोगावचे पाणवठे व घाटही उध्व्स्त झाले आहेत. गेल्या १३५ वर्षांपासून कालव्याच्या वितरिकेचे विमोचक बदलले नाहीत. ते जीर्ण झाले असून, पाणी सोडण्याची प्रकिया अवघड बनली आहे.  
पंधरा ते वीस वर्षांपासून या कालव्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नीरा डाव्या कालव्याची लांबी १५२ किलोमीटर आहे. या अंतरात जवळपास ६२ वितरिका (फाटे) येतात. यापैकी ८० टक्के वितरिका नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाण्याची गळती सुरू आहे. या पुलांकडे व कालव्यावरील विविध बांधकामांकडे पाटबंधारे खात्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

Web Title: Expiry date of british bridges ended; Status of Baramati, Indapur, Purandar, Needs of new bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.