समन्वयाच्या अभावामुळे ‘बीआरटी’त त्रुटी - प्रांजली देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:18 AM2018-08-12T00:18:35+5:302018-08-12T00:18:49+5:30

मागील काही वर्षांपासून शहरात सुरू झालेल्या बस रॅपिड ट्रान्झिंट (बीआरटी) या सेवेकडे दोन्ही महापालिकांसह पुणे महानगर परिवहन महामंडळाकडूनही (पीएमपी) दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे समन्वय राहिला नाही. परिणामी, बीआरटी मार्गातील त्रुटी वर्षानुवर्षे तशाच राहिल्या.

 Error in 'BRT' due to lack of coordination - Pranjali Deshpande | समन्वयाच्या अभावामुळे ‘बीआरटी’त त्रुटी - प्रांजली देशपांडे

समन्वयाच्या अभावामुळे ‘बीआरटी’त त्रुटी - प्रांजली देशपांडे

Next

मागील काही वर्षांपासून शहरात सुरू झालेल्या बस रॅपिड ट्रान्झिंट (बीआरटी) या सेवेकडे दोन्ही महापालिकांसह पुणे महानगर परिवहन महामंडळाकडूनही (पीएमपी) दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे समन्वय राहिला नाही. परिणामी, बीआरटी मार्गातील त्रुटी वर्षानुवर्षे तशाच राहिल्या. ‘पीएमपी’कडून या मार्गांवर बसेसच्या नियमित फेऱ्या दिल्या गेल्या नाहीत. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन यापुढील काळात बीआरटीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. तरच त्यामध्ये सुधारणा होऊ शकतील, अशी अपेक्षा वाहतूकतज्ज्ञ व बीआरटी समितीच्या सदस्या प्रांजली देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

देशात सर्वाधिक प्रवासी असलेले बीआरटी मार्ग म्हणून पुणे व पिंपरी चिंचवडमधील बीआरटी मार्गांची ओळख बनली आहे. हे सर्व मार्ग ‘हायब्रीड’ आहेत. प्रवाशांकडून बीआरटीसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीच्या काळात खासगी वाहने सोडून जवळपास १२ टक्क्यांहून अधिक प्रवासी बीआरटीकडे वळाले होते. त्यावेळी बसेसची वारंवारिताही चांगली होती. पण कालांतराने त्याकडे दुर्लक्ष होत गेले. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच पीएमपी प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे बसेसची वारंवारिता कमी झाली. या मार्गावर चांगल्या क्षमतेच्या, आरामदायी बसेसही
कमी आहेत. बहुतेक मार्गांवर
अनेक त्रुटी दिसून येतात. त्यामुळे प्रवाशांना अपेक्षित बससेवा
मिळत नाही, असे देशपांडे यांनी सांगितले.
बीआरटी मार्ग सक्षम झाले तर त्याकडे प्रवासी आकर्षित होतील. त्यामुळे रस्त्यांवरील खासगी वाहने कमी होऊन वाहतुकीचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल. तसेच या मार्गावरील प्रवाशांना चांगल्या सुविधाही मिळणे गरजेचे आहे. आरामदायी बस असतील तर प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊ शकेल. त्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटी समिती स्थापन केली आहे. बीआरटी मार्गावरील त्रुटी दूर करून प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा, हे समितीचे ध्येय आहे. समितीमध्ये दोन्ही पालिकेतील संबंधित अधिकारी, प्रवासी
प्रतिनिधी, वाहतूकतज्ज्ञ, पीएमपीतील अधिकारी आहेत. त्यामुळे आता
सर्व यंत्रणांमध्ये समन्वय व संवाद सुरू झाला आहे.
समितीने सध्या जे मार्ग आहेत, त्यातील त्रुटी दूर करण्याकडे लक्ष्य केंद्रित केले आहे. नगर रस्त्यावरील प्रवासीसंख्या अधिक असल्याने या मार्गाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. सिग्नल यंत्रणा, बसस्थानकांची दुर्दशा, तुटलेली बॅरिकेट्स, दरवाजे, वाहनांची घुसखोरी अशा त्रुटी दिसून आल्या. या त्रुटी दूर करण्याबाबत समितीच्या बैठकीमध्ये पाठपुरावा केला जात आहे. काही त्रुटींवर तातडीने उपाययोजना केल्या जाऊ शकतात. तसेच सातत्याने आढावा घेऊन त्यानुसार त्रुटी दूर करायला हव्यात.
समितीने त्रुटींबाबत ‘आॅडिट लिस्ट’ तयार करून दिली आहे. काही उपाययोजना सुचविल्या आहेत. नगर रस्त्यावर काही चौक खूप मोठे आहे. हे चौक लहान करणे, पादचारी सिग्नल उभारणे, बसेसची वारंवारिता वाढविणे, आरामदायी बस उपलब्ध करून देणे, प्रवाशांचे प्रबोधन, चालक-वाहकांना प्रशिक्षण, मी कार्डचा सक्षमपणे वापर करणे अशा काही गोष्टी करण्याची गरज आहे.
नवीन बसेस घेण्याबाबतही तातडीने निर्णय व्हायला हवा. ईलेक्ट्रिक बस बीआरटी मार्गासाठी चांगल्या आहेत. केवळ त्यांचे तिकीट साध्या बसेसप्रमाणेच ठेवायला हवे. असे झाल्यास प्रवाशांची संख्या वाढू शकेल. बीआरटी सेलही आणखी सक्षम करणे आवश्यक आहे.
सध्या या मार्गांवर भाडेतत्त्वावरील बस धावतात. त्यांची देखभाल-दुरुस्तीवर पीएमपी नियंत्रण नाही. त्यासह मार्गांच्या पाहणीसाठीही नियंत्रण यंत्रणा उभी करायला हवी. त्यासाठी भरारी पथके नेमणे अपेक्षित आहे.
दोन्ही पालिकांनी ‘बीआरटी देखभाल-दुरुस्ती वाहन’ दिल्यास हे प्रश्न लवकर मार्गी लागू शकतील. हे वाहन सतत केवळ बीआरटी रस्त्यावरून जाईल. या मार्गांवर आढळून आलेल्या छोट्या-छोट्या त्रुटी तातडीने दुरुस्त होऊ शकतील. या सर्व बाबींचा आता समितीकडून सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे देशपांडे म्हणाल्या.

Web Title:  Error in 'BRT' due to lack of coordination - Pranjali Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.