वीजनिर्मितीमधून दीड लाख कमावले, पर्यावरणप्रेमी कॅमेलिया अपार्टमेंटचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:05 AM2018-06-13T03:05:06+5:302018-06-13T03:05:06+5:30

पाषाण-बाणेर लिंक रोडवरील कॅमेलिया अपार्टमेंट मधील रहिवाशांनी सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांनी इतर सोसायटींसमोर एक आदर्श ठेवला आहे. विजेची निर्मिती करून सहा महिन्यांत तब्बल दीड लाख रुपयांची वीज विक्री अपार्टमेंटतर्फे करण्यात आली आहे.

Eco-Friendly camelia apartment initiative, earned 1.5 lakhs in electricity generation | वीजनिर्मितीमधून दीड लाख कमावले, पर्यावरणप्रेमी कॅमेलिया अपार्टमेंटचा उपक्रम

वीजनिर्मितीमधून दीड लाख कमावले, पर्यावरणप्रेमी कॅमेलिया अपार्टमेंटचा उपक्रम

Next

पुणे : पावसाचे पडणारे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जमिनीत जिरवले जाते, सोसायटीमधील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्याने तो कचरा सोसायटीमध्ये जिरविला जातो, विजेची बचत व्हावी म्हणून सौरऊर्जेचा वापर करण्यात येतो. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपणाचा वसा त्यांनी घेतला आहे. हे सर्व उपक्रम पाषाण-बाणेर लिंक रोडवरील कॅमेलिया अपार्टमेंट मधील रहिवाशांनी सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांनी इतर सोसायटींसमोर एक आदर्श ठेवला आहे. विजेची निर्मिती करून सहा महिन्यांत तब्बल दीड लाख रुपयांची वीज विक्री अपार्टमेंटतर्फे करण्यात आली आहे.

पाषाण - बाणेर लिंक रोडवरील कॅमेलिया अपार्टमेंट ही सोसायटी बाणेर-पाषाणच्या टेकडीच्या पायथ्याशी आहे. या अपार्टमेंटमध्ये जवळपास १५० कुटुंबे वास्तव्याला आहेत. यामध्ये जवळपास सर्वच लोक उच्चशिक्षित
आणि उच्चपदस्थ आहेत. त्यामुळेच त्यांनी सोसायटीमध्ये सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
साधारण: २००७-०८ मध्ये येथे रहिवासी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर येथील रहिवाशांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी चांगले उपक्रम राबविण्याचा निर्धार केला. त्यानूसार रेनवॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन, सेंद्रिय खत प्रक्रिया, सौरऊर्जानिर्मिती, पाषाण - बाणेर टेकडीवर वृक्षारोपण, रोपवाटिका याप्रकारचे विविध उपक्रम सुरू केले. त्यामुळे इतर सोसायटीधारकही त्यांचा आदर्श जपण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
रेन वॉटर हार्वेस्टिंग : सोसायटीमध्ये हा प्रकल्प २०१६ मध्ये सुरू करण्यात आला. प्रामुख्याने अपार्टमेंटमधील अनावश्यक पाणी जलवाहिनीद्वारे जमिनीत सोडले जाऊ लागले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे या ठिकाणी ड्रेनेज लाईनच्या पाण्यामुळे इतरांना त्रास होण्याचा प्रकार दिसून येत नाही. या उपक्रमामुळे येथील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवत नाही.

सौरऊर्जानिर्मिती : या प्रकल्पाची सुरुवात नोव्हेंबर २०१७ मध्ये करण्यात आली. प्राथमिक प्रायोगिक तत्त्वावर ३१ सौर पॅनल या अपार्टमेंटमध्ये बसवण्यात आले आहेत. एका दिवसाला १० किलो वीजनिर्मिती केली जाते. तसेच, यामधून निर्माण होणारी वीज विद्युत वितरण कंपनीला दिली जाते. या बदल्यात आतापर्यंत सहा महिन्यांत जवळपास दीड लाख रुपयांच्या विजेची विक्री केली आहे.

घनकचरा व्यवस्थापन : सध्या शहरामध्ये कचºयाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सर्वच ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून काम केले जाते; परंतु या अपार्टमेंटमध्ये कचरा व्यवस्थापनाची स्वतंत्र यंत्रणा आहे. यामध्ये ओल्या कचºयासाठी वेगळ्या पेट्या तयार करण्यात आल्या आहेत. कचºयावर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया १५ दिवस चालते. त्यामुळे प्रत्येक दिवसाचा कचरा एका पेटीत टाकला जातो. त्यावर केमिकल्स टाकून त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. तसेच, सुका कचरा स्वच्छ संस्थेला देण्यात येतो. त्यावरही प्रक्रिया केली जाते.

वृक्षारोपण : या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताच एक प्रकारे सर्वांचेच मन मोहून जाईल, असे दृश्य समोर दिसते. कारण, सगळीकडे विविध प्रकारची झाडे पाहावयास मिळतात. तसेच, येथील रहिवासी अनिल लेले यांच्या प्रयत्नातून बाणेर टेकडीवर वृक्षारोपण केले आहे. मागील दोन ते तीन वर्षांत त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे.

रहिवाशांच्या पालिकेकडून अपेक्षा
कॅमेलिया अपार्टमेंटमध्ये मुलांना खेळण्यासाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आजू- बाजूच्या ठिकाणी उद्यानांची व्यवस्था केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच पाषाण-बानेर लिंक रोडवरील पथदिवे हे जवळपास तीन ते चार महिने बंदच अवस्थेत आहेत. त्यामुळे ते नियमित चालू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

इतर सोसायटी- धारकांसाठी प्रेरणा
या अपार्टमेंटने स्वत:ची कामे स्वत: करून लोकांपुढे एक प्रकारचा आदर्श निर्माण केला आहे. यामध्ये अपार्टमेंटचे तुषार लवलेकर, रवी सिन्हा, भूषण चिखलकर, अनिल लेले, हर्षद मेढेकर, शिरीष बेनगेर यांच्या प्रयत्नातून कॅमेलिया अपार्टमेंट हे पूर्णपणे स्वावलंबी बनले आहे. या अपार्टमेंटने समाजात एक प्रकारे आपला वेगळा ठसा उमटवला आहे आणि अशा प्रकारचे प्रकल्प राबवणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्रत्येक अपार्टमेंट, सोसायटी, वसाहती सर्वांनी याकडे एक प्रकारची प्रेरणा किंवा संधी म्हणून पाहिले पाहिजे आणि त्या प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत.

सामाजिक उपक्रम : यामध्ये गणपती उत्सव, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, नवरात्री उत्सव, क्रीडा दिवस अशाप्रकारचे उपक्रम राबवले जातात.
 

Web Title: Eco-Friendly camelia apartment initiative, earned 1.5 lakhs in electricity generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.