Pune: शारीरिक व मानसिक छळामुळे विवाहितेचा मृत्यू; सासू-सासरे, पतीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 02:18 PM2024-01-31T14:18:53+5:302024-01-31T14:19:35+5:30

मंचर : लग्नात मानपान नीट केला नाही. तसेच हुंडा दिला नाही. चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरावरून पैसे आणावे, या कारणावरून ...

Death of spouse due to physical and mental torture; Case filed against mother-in-law, husband | Pune: शारीरिक व मानसिक छळामुळे विवाहितेचा मृत्यू; सासू-सासरे, पतीविरोधात गुन्हा दाखल

Pune: शारीरिक व मानसिक छळामुळे विवाहितेचा मृत्यू; सासू-सासरे, पतीविरोधात गुन्हा दाखल

मंचर : लग्नात मानपान नीट केला नाही. तसेच हुंडा दिला नाही. चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरावरून पैसे आणावे, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या छळामुळे विवाहिता अनुष्का केतन गावडे (वय २५, रा. मंचर, मूळ रा. बेलसरवाडी, निरगुडसर) हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल सासू-सासरे, पती, डॉक्टर असलेले भाया व जाऊ यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्का हिचा विवाह १ एप्रिल २०२१ रोजी केतन गुलाब गावडे यांच्याशी झाला. नवऱ्या मुलाच्या मागणीप्रमाणे सर्व प्रापंचिक साहित्य देऊन, दहा तोळे सोन्याचे दागिने मुलीच्या अंगावर घालण्यात आले. लग्नानंतर ३ ते ४ महिने अनुष्काला व्यवस्थित नांदविण्यात आले. नंतर पती केतन गुलाब गावडे हा तुझ्या माहेराहून चारचाकी गाडी घेण्यासाठी पैसे घेऊन ये, असे म्हणून तिचा छळ करू लागला. दारू पिऊन येऊन मारहाण केली जात होती. या गोष्टीची कल्पना अनुष्का माहेरी देत होती. मात्र आई-वडील तिची समजूत काढून पुन्हा सासरी नांदायला पाठवत होते. सासरा गुलाब सखाराम गावडे व सासू कल्पना गुलाब गावडे यांनी कोणत्यातरी कारणावरून भांडणतंटा करत मुलगी अनुष्का व तिचा पती केतन यांना एकदा घराच्या बाहेर काढले होते. तुला घरात नीट स्वयंपाक येत नाही, कपडे धुता येत नाही, झाडून घेता येत नाही, लग्नात आमचा मानपान नीट केला नाही, हुंडा दिला नाही. माहेरावरून चारचाकी गाडी घेण्यासाठी पैसे घेऊन ये, असे म्हणून विवाहिता अनुष्का हिचा वारंवार छळ करण्यात आला.

तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आला. २४ जानेवारी या दिवशी अनुष्का व पती केतन हे जेवण्यासाठी सासरवाडीला फाकटे येथे आले होते. परत आल्यानंतर नेहमीप्रमाणे तिने वडिलांना फोन केला होता. त्यानंतर २६ जानेवारीला तिची तब्येत बिघडल्याचे समजल्यानंतर कुटुंबीय मंचर उपजिल्हा रुग्णालयात गेले. त्यावेळी अनुष्का हिच्या नाका-तोंडातून रक्त व फेस आला होता. तिचे शरीर काळे-निळे पडले होते. अनुष्काला काय झाले असे विचारले असता, पती व सासू-सासरे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अनुष्का गावडे हिचे शवविच्छेदन पुणे येथील ससून रुग्णालयात करण्यात आले आहे.

तिचा पती केतन गुलाब गावडे, सासरे गुलाब सखाराम गावडे, सासू कल्पना गुलाब गावडे, भाया डॉ. कांचन गुलाब गावडे व जाऊ डॉ. शुभांगी कांचन गावडे यांनी छळ केला असून, तिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, अशी फिर्याद तिची आई स्वाती अतुल बांगर यांनी मंचर पोलिसात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सासू-सासरे, पती, भाया व जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे करत आहेत.

Web Title: Death of spouse due to physical and mental torture; Case filed against mother-in-law, husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.