भोर नगरपालिकेवर काँग्रेसचा ऐतिहासिक विजय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:46 PM2018-07-16T17:46:07+5:302018-07-16T17:56:16+5:30

एकीकडे देशात ‘परिवर्तना’ची लाट असताना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मात्र, काँग्रेसने नगरपालिकेवर ऐतिहासिक विजय मिळविला.

Congress historic victory on Bhor Municipal Corporation | भोर नगरपालिकेवर काँग्रेसचा ऐतिहासिक विजय 

भोर नगरपालिकेवर काँग्रेसचा ऐतिहासिक विजय 

Next
ठळक मुद्देसर्वच्या सर्व जागा जिंकल्या : १७ पैकी १७ नगरसेवक; नगराध्यक्षपदही मोठ्या फरकाने सर्व विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा दारुण पराभव पाच वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे जनतेने आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास

भोर : एकीकडे देशात ‘परिवर्तना’ची लाट असताना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मात्र, काँग्रेसने नगरपालिकेवर ऐतिहासिक विजय मिळविला. नगरसेवकपदाच्या १७ पैैकी १७ जागा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निर्मला रामचंद्र आवारे यांनी ३९६८ इतक्या मोठ्या फरकाने एकहाती विजय मिळवत पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवला आहे. 
सर्व विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. यात विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. माजी नगराध्यक्षा तृप्ती जगदीश किरवे सर्वाधिक ७९३ मतांनी विजयी झाल्या आहेत. भोर नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी १०.३० वाजता आयटीआय कार्यालयात निवडणुक अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी सुरू केली. प्रभाग एक ते चार एकाच वेळी मोजणीला सुरुवात केली. यात सुरुवातीपासूनच काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर होते. ती आघाडी कायम राखत २०० ते ७०० मतांनी विजय मिळवला. त्यानंतर ५ ते ८ प्रभागांची मतमोजणी सुरू झाली. यातील प्रभाग ७ मधील सुशील तारू आणि प्रभाग ८ मधील रुपाली भेलके यांनी चांगली मते घेतली. हे वगळता सर्व प्रभागात काँग्रेसनेच आघाडी घेतली आणि सर्वच्या सर्व १७ उमेदवार विजयी झाले.
या मतमोजणीबरोबरच नगराध्यक्षपदाचीही मतमोजणी सुरू होती. यातही काँग्रेसच्या उमेदवार निर्मला आवारे यांनी सुरुवातीला ४ प्रभागांत १८०० मतांची आघाडी घेतली. ती कायम ठेवत सुमारे ३९६८ मतांची आघाडी घेत मोठ्या फरकाने विजय मिळवला.
माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्या पत्नी निर्मला आवारे नगराध्यक्षपदी व विद्यमान नगरसेविका माजी नगराध्यक्षा तृप्ती किरवे या पुन्हा विजयी झाल्या आहेत. विद्यमान नगराध्यक्ष तानाजी तारू यांच्या पत्नी पद्मिनी तारू, विद्यमान नगरसेवक देविदास गायकवाड, माजी नगराध्यक्ष सचिन हर्णसकर, माजी नगराध्यक्षा चंद्रकांत सागळे यांचे पुतणे अमित सागळे, माजी नगरसेवक अ‍ॅड. विश्वनाथ रोमण यांच्या पत्नी आशा रोमण, माजी नगरसेवक (कै.) शंकर पवार यांचे पुतणे गणेश पवार, विद्यमान नगरसेविका शुभांगी पवार यांचे पती अनिल पवार यांनी विजय मिळवला आहे. विद्यमान नगरसेवक यशवंत डाळ, माजी नगराध्यक्ष दीपाली शेटे, माजी नगरसेवक केदार देशपांडे, माजी नगरसेविका मनीषा काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धारणे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
झोपडपट्टीतील मुलगी सर्वात तरुण नगरसेविका 
महाड-पंढरपूर रोडवरील भोर शहरातील पोलीस स्टेशनशेजारी अनंतनगर या झोपडपट्टीत राहणारी कु. स्नेहा शांताराम पवार २१ वर्षांची सर्वात तरुण नगरसेविका काँग्रेसकडून विजयी झाली आहे. नगरपालिकेच्या इतिहासात ही सर्वात तरुण नगरसेविका असावी.
.....................

नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने मंत्री, आमदार, खासदार उतरवले, टीका केली. मात्र भोर शहरात काँग्रेसच्या माध्यमातून पाच वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे जनतेने आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व जागा काँग्रेसला दिल्या. जनतेचा विश्वास सार्थ ठरवला जाईल. 
संग्राम थोपटे, आमदार  
.....................

विजयी उमेदवार
निर्मला रामचंद्र आवारे (काँॅग्रेस- ६९६४) 
शारदा यशवंत डाळ (राष्ट्रवादी २९९६),
स्वप्ना केदार देशपांडे (शिवसेना, ७३४)
दिपाली शेटे (भाजपा १२५६) 
तर नोटा १६ मते मिळाली
एकुण १५२५१ पैकी १२०३३ आणि टपाली मते ३ मिळुन १२६६ (८०%) मतदान झाले होते. काँॅग्रेसच्या निर्मला आवारे यांनी राष्ट्रवादीच्या शारदा डाळ यांच्यावर सुमारे ३९६८ मतांनी दणदणीत विजय मिळवला.
 नगरसेवकपदासाठी प्रभाग निहाय पडलेली मते पुढील प्रमाणे 
प्रभाग १ अ : पद्मिनी तारु (६३६)
               ब : चंद्रकांत मळेकर (६२९)
 प्रभाग २ अ : समीर सागळे (६८८)
               ब : आशा विश्वनाथ रोमण (७५२)
प्रभाग ३ अ : सचिन हर्णसकर (८६७ ) 
          ब तृप्ती किरवे (११५०)
 प्रभाग ४ अ : रुपाली कांबळे ( १०५७)
                ब : अमित सागळे (१०९०)
प्रभाग ५ अ : अमृता बहिरट (१०४०)
            ब : गणेश पवार (९८६)
प्रभाग ६ अ : वृषाली घोरपडे (६८४)
       ब : देवीदास गायकवाड (६७०) 
प्रभाग ७ अ : सोनम मोहिते (७५१) 
             ब : अनिल पवार (५१०)
प्रभाग ८ अ : स्नेहा शांताराम पवार (९३८)
            ब  : आशा शिंदे (७७०) 
            क  : सुमंत शेटे (८२५) 
            

Web Title: Congress historic victory on Bhor Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.