गणित म्हटलं की नकाे रे बाबा; गणिताची वाट साेपी करून डाॅ. मंगला नारळीकरांनी घेतला पूर्णविराम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 01:32 PM2023-07-18T13:32:21+5:302023-07-18T13:32:47+5:30

ज्येष्ठ गणितज्ञ डाॅ. मंगला नारळीकर यांनी दुर्धर आजाराशी झुंजत असतानाही ‘गणिताच्या सोप्या वाटा’ हे पुस्तक पूर्ण केले

By making maths easy Dr. Mangala Naralikar written a book | गणित म्हटलं की नकाे रे बाबा; गणिताची वाट साेपी करून डाॅ. मंगला नारळीकरांनी घेतला पूर्णविराम!

गणित म्हटलं की नकाे रे बाबा; गणिताची वाट साेपी करून डाॅ. मंगला नारळीकरांनी घेतला पूर्णविराम!

googlenewsNext

उद्धव धुमाळे

पुणे : गणित विषय म्हटलं की नकाे रे बाबा... हीच आजही अनेकांची मानसिकता आहे. बालगीतंदेखील तशीच. ‘साेमवारचा असताे गणिताचा तास, गणिताच्या तासाला मी नापास... गणित विषय माझ्या नावडीचा’ हे सर्वाधिक पाहिले आणि ऐकले जाणारे गाणे. यातून झालेली गणिताची बिकट वाट साेपी करणे म्हणजे दिव्य काम. हे आव्हान पेलून ज्येष्ठ गणितज्ञ डाॅ. मंगला नारळीकर यांनी दुर्धर आजाराशी झुंजत असतानाही ‘गणिताच्या सोप्या वाटा’ हे पुस्तक पूर्ण करून स्वत:च्या जीवनाला पूर्णविराम दिला.

ज्येष्ठ गणितज्ञ, लेखिका डाॅ. मंगला नारळीकर (वय ७९) यांचे सोमवारी पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. मंगलाताई हे जग सोडून गेल्याची नकोशी बातमी सकाळी सकाळी येऊन धडकली आणि मन विषण्ण झालं. काही वर्षांपूर्वी ‘कहाणी एका रँग्लरची’ हे डाॅ. जयंत नारळीकर सरांच्या आईने म्हणजे सुमती विष्णू नारळीकर यांनी लिहिलेले पुस्तक साकेत प्रकाशनने प्रकाशित केले. तेव्हापासून मंगलाताईंचा आणि आमचा ऋणानुबंध जुळला. त्यानंतर ‘विज्ञान विश्वातील वेधक आणि वेचक’ हे जयंत नारळीकर सरांचे पुस्तक, तर विद्यार्थ्यांच्या गणिताच्या पायाभरणीसाठी ‘दोस्ती गणिताशी’ हे मंगलाताईंचे पुस्तक साकेत प्रकाशनाने प्रकाशित केले. ही सर्व पुस्तकं तयार होत असताना मंगलाताईंनी स्वत: जातीने यात लक्ष घातले होते. यादरम्यान त्यांचा लाभलेला सहवास आणि मार्गदर्शन समृद्ध करणारे होते. त्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी ‘गणिताच्या सोप्या वाटा’ हे मंगलाताईंचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर हाेते. ते त्यांनी त्यांच्याकडून पूर्ण केले. लवकरच ते प्रकाशित हाेणार असताना त्यांचे दु:खद निधन हाेणे अस्वस्थ करणारे आहे. हे पुस्तक पूर्ण झालेले त्या बघू शकल्या नाहीत याची रुखरुख मनाला वाटते, असे साकेत प्रकाशनच्या प्रतिमा भांड म्हणाल्या.

मंगलाताई या डाॅ. जयंत नारळीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शास्त्रज्ञांच्या सहचारिणी इतकीच त्यांची ओळख नव्हती. त्या स्वतः गणितज्ञ, मोठ्या पदांवर कार्यरत, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या हाेत्या. विशेष म्हणजे ‘कर्म हेच ईश्वर’ ही त्यांची भूमिका हाेती. त्या तत्त्वनिष्ठ तर हाेत्याच, तितक्याच त्या संवेदनशीलही होत्या. कॅन्सरशी झुंज देत असतानाही त्या झपाट्याने काम करत हाेत्या. त्यांचा कामाचा आवाका थक्क करणारा होता.
नारळीकर सरांची आणि स्वतःची पुस्तके तयार होताना त्या जातीने लक्ष घालणे असो वा सामाजिक बांधीलकी म्हणून दारिद्र्यरेषेखालील मुलींना शिकवणे असो... अगदी लांबचा प्रवास करून येताच माहेरवाशीण लेकीसाठी लगेचच केक करायला घेणे असो, त्यांचा याही वयातील उत्साह अचंबित करणारा होता. प्रापंचिक जबाबदाऱ्या आवडीने सांभाळताना आणि जगद्द्विख्यात शास्त्रज्ञाची पत्नी म्हणून तेवढ्याच तोलामोलाची साथ देताना त्यांची प्रज्ञा कधी झाकोळली गेली नाही, असेही त्या म्हणाल्या.

मंगलाताई, तुमचा सहवास अजून हवा होता

मंगलाताई नारळीकर या पुस्तक किंवा पुस्तकेतर विषयांवर बोलत तेव्हा अद्ययावत ज्ञान, कामाप्रती बांधीलकी व गुणवत्तेचा ध्यास याची वारंवार प्रचीती यायची. त्यांच्यापुढे आम्ही सर्वार्थाने लहान असूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायला त्या कधी विसरल्या नाहीत. वैयक्तिक आयुष्य किंवा कामाविषयीची चर्चा असो, त्यांच्या मार्गदर्शनाने आमचं आयुष्य समृद्ध झालं. निगर्वी मंगलाताई आमचा मोठा प्रेमळ आधार होत्या. मंगलाताई, तुमचा सहवास अजून हवा होता. तुमच्या जाण्याने समाजाची आणि साकेत परिवाराचीही वैयक्तिक हानी झाली आहे. - प्रतिमा भांड, साकेत प्रकाशन

Web Title: By making maths easy Dr. Mangala Naralikar written a book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.