जमिनीच्या दाव्याच्या निकालासाठी पावणेदोन कोटींची लाच; वकिलाला रंगेहात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 10:25 PM2018-12-26T22:25:53+5:302018-12-26T22:31:52+5:30

भूमी अभिलेख विभागाकडे सुरु असलेल्या पर्वती येथील जमिनीच्या दाव्यामध्ये सातबारा उता-यावरील नावे कमी करुन देऊन निकाल अर्जदाराच्या बाजुने लावून देण्याचे आमिष दाखवत एका वकिलाने तब्बल दोन कोटींची लाच मागत त्यातील एक कोटी ७० लाख रुपयांची लाच स्विकारली.

Bribe money for land claim settlement; The lawyer arrested | जमिनीच्या दाव्याच्या निकालासाठी पावणेदोन कोटींची लाच; वकिलाला रंगेहात पकडले

जमिनीच्या दाव्याच्या निकालासाठी पावणेदोन कोटींची लाच; वकिलाला रंगेहात पकडले

Next

पुणे : भूमी अभिलेख विभागाकडे सुरु असलेल्या पर्वती येथील जमिनीच्या दाव्यामध्ये सातबारा उता-यावरील नावे कमी करुन देऊन निकाल अर्जदाराच्या बाजुने लावून देण्याचे आमिष दाखवत एका वकिलाने तब्बल दोन कोटींची लाच मागत त्यातील एक कोटी ७० लाख रुपयांची लाच स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पुण्यातील बंडगार्डन परिसरात या वकिलाला रंगेहात पकडल्याची माहिती अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिली. एसीबीच्या पुण्याच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे. 
अ‍ॅड. रोहित शेंडे असे त्याचे नाव आहे. दिवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जमीन धारकाने एसीबीकडे तक्रार अर्ज केला होता. पर्वती टेकडीजवळील जवळपास दिड ते दोन एकर जमिनीसंदर्भात भूमी अभिलेख विभागाच्या उप संचालकांकडे सध्या सुनावणी सुरु आहे. या जमिनीच्या सातबारा उताºयावरील नावे कमी करण्यासंदर्भात हा दावा सुरु आहे. अ‍ॅड. शेंडे याने  ‘टायटल क्लिअर’ करुन तक्रारदार यांच्या बाजुने निकाल लावून देतो असे सांगितले. या कामासाठी उप संचालकांकडून सर्व मदत मिळेल असेही सांगितले होते. हे काम करुन देण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची लाच शेंडे याने मागितली होती. 
याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर अधिक्षक दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा लावण्यास सुरुवात करण्यात आली. एक महिन्यापासून पोलीस या कारवाईच्या मागे होते. मात्र, शेंडे हा तक्रारदार यांना निकाल तुमच्या बाजुने लावून देतो, मग पैसे द्या असे म्हणाला होता. त्यानुसार, बुधवारी निकाल घेऊन येतो पैसे तयार ठेवण्यास सांगितले होते. या दाव्यामध्ये उप संचालकांकडे दोन ते तीन वेळा सुनावण्याही झालेल्या आहेत. त्यामध्ये कोणताही निकाल लागला नव्हता. मात्र, बुधवारी पैसे तयार आहेत म्हटल्यावर अंतिम सुनावणी करुन तात्काळ शासकीय सही शिक्क्यांसह निकालाच्या आदेशाची प्रतच तयार करण्यात आली. त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील क्लार्क अ‍ॅड. शेंडेच्या कार्यालयात गेला. तेथे बसूनच हा निकाल तयार करण्यात आला. 
पोलिसांनी बुधवारी बंडगार्डन परिसरात सापळा लावला. त्याठिकाणी तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारत असताना शेंडे याला रंगेहात पकडण्यात आले. शेंडे हा उपसंचालकांचा खासगी एजंट म्हणून काम करीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बुधवारी तक्रारदार यांच्या बाजुने निकाल देण्यात आल्याच्या आदेशाची प्रत त्यांना दाखविण्यात आली. ही प्रत तक्रारदार यांना दिल्यावर शेंडे याने लाचेची रक्कम स्विकारली. 

- पर्वती जवळ दिड ते दोन एकर जमिनीचे हे प्रकरण आहे. पर्वती हा शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेला परिसर आहे. त्यामुळे येथील जमिनीच्या किंमती सध्या गगनाला भिडलेल्या आहेत. जाणकारांच्या मते दिड ते दोन एकर जमिनीचे चालू बाजारभावानुसार आजचे मूल्य शेकडो कोटींच्या घरात जाईल. 

बड्या धेंडांची नावे समोर येण्याची शक्यता
या पूर्ण लाच प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयातील बड्या धेंडांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी क्लार्कला ताब्यात घेतले असून त्याचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. त्याला या लाच प्रकरणाची माहिती नव्हती असे स्पष्ट झाले आहे. त्याला नेमके कोणी अ‍ॅड. शेंडेच्या कार्यालयात पाठवले याचा तपास सुरु करण्यात आला आहे. यातील सर्व  ‘लिंक’ तपासण्यात येत असून अद्याप तरी कोणत्याही अधिका-याचे नाव समोर आले नसल्याचे अधिक्षक दिवाण यांनी सांगितले. 

भूमी अभिलेखच्या उप संचालकांकडून निकाल लावून देतो असे शेंडे याने सांगितले. तसेच तसा निकालच त्याने आणून दाखविला. नेमका बुधवारीच हा आदेश कसा काय निघाला, यामागे कोणती  ‘लिंक’ आहे? याबाबतचा तपास सुरु आहे. आम्ही एक महिन्यापासून हा सापळा लावत होतो. अ‍ॅड. शेंडे हा उप संचालकांचा खासगी एजंट म्हणून काम करतो असे सांगत होता. अद्याप तरी उपसंचालकांचे या प्रकरणात नाव समोर आलेले नाही. मात्र, तपासाअंती यातील सर्व गोष्टी यथावकाश स्पष्ट होतील. 
- संदीप दिवाण, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे

Web Title: Bribe money for land claim settlement; The lawyer arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.