द्रुतगतीवरील ‘खंडाळा एक्झिट’ बनलाय ब्लॅक स्पॉट

By admin | Published: May 27, 2016 04:57 AM2016-05-27T04:57:42+5:302016-05-27T04:57:42+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा एक्झिटचा उतार व तीव्र वळण धोकादायक बनले आहे. सतत होत असलेल्या अपघातांमुळे हे ठिकाण मार्गावरील ब्लॅक स्पॉट बनले आहे.

The black spot created by Khandala exit | द्रुतगतीवरील ‘खंडाळा एक्झिट’ बनलाय ब्लॅक स्पॉट

द्रुतगतीवरील ‘खंडाळा एक्झिट’ बनलाय ब्लॅक स्पॉट

Next

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा एक्झिटचा उतार व तीव्र वळण धोकादायक बनले आहे. सतत होत असलेल्या अपघातांमुळे हे ठिकाण मार्गावरील ब्लॅक स्पॉट बनले आहे.
महामार्गावरील या ब्लॅक स्पॉटवर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या गाडीला बुधवारी रात्री अपघात झाला. त्या वेळी दुभाजकाभोवती आवश्यक कठडे व सुरक्षात्मक उपायोजना नव्हत्या. याबद्दल नागरिकांनी व प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
भारतातील पहिला जलदगती मार्ग म्हणून नावलौकिक असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास वेगवान झाला. मात्र, या महामार्गावरील खंडाळा एक्झिट येथील उतारावर सतत अवजड वाहने उलटणे, समोरच्या वाहनांना धडकणे, दुभाजक तोडत विरुद्ध लेनवर जाणे असे अपघात होतात.
आनंद अभ्यंकर यांच्या अपघातानंतर या मार्गावर दोन्ही कॉरिडोरच्या मध्ये सुरक्षेकरिता बायफ्रेन रोप लावण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हे रोप सर्वत्र लावलेले नाहीत. दगडी चिरे असणाऱ्या भागात, विशेषत: खंडाळा घाट व परिसरात हे रोप लावण्यात आलेले नाहीत. उतार व वळणामुळे वारंवार अपघात घडतात. त्या खंडाळा एक्झिटजवळील दुभाजकाची उंची वाढविण्याची मागणी स्थानिक नगरसेवक प्रमोद गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, स्वाभिमान संघटनेचे लोणावळा शहराध्यक्ष शौकत शेख यांनी केली होती. (प्रतिनिधी)

रस्ते विकास महामंडळ व आयआरबीकडे सातत्याने पाठपुरावा करूनही दुभाजकाची उंची या भागात वाढविली नाही. बायफ्रेन रोप न लावल्याने येथे वळणावर चालकांचे नियंत्रण सुटल्याने अवजड वाहने एक तर थेट समोरच्या वाहनांना धडकतात; अन्यथा दुभाजकावरून विरुद्ध लेनवर जाऊन अपघात होतात. या ठिकाणी महिन्यात सरासरी किमान दोन तरी अपघात घडतात. या धोकादायक ठिकाणी प्रशासकीय पातळीवर काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत, अशी तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे.

बुधवारी रात्री साडेअकरा वाजता अशाच एका अपघातात
डी. एस. कुलकर्णी हे गंभीर जखमी झाले. तर, काहीही चूक
नसताना त्यांचा चालक ठार झाला. तीन वर्षांपूर्वी ओझर्डे गावाजवळ रस्ता दुभाजक ओलांडून आलेल्या एका गाडीच्या धडकेने प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर व अन्य एकाचा मृत्यू झाला होता.

Web Title: The black spot created by Khandala exit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.