BJP will not continue grouping, Guardian Minister's warning | भाजपामध्ये गटबाजी चालू देणार नाही, पालकमंत्र्यांचा इशारा

पुणे : ‘‘भारतीय जनता पार्टीत गटबाजीला थारा नाही, कोणी तसे करत असेल तर ते चालू देणार नाही’’ असा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी समान पाणी योजनेवरून महापालिकेतील काही नगरसेवक घेत असलेल्या वेगळ्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर दिला. या योजनेत बºयाच तांत्रिक बाबी आहेत. प्रशासकीय स्तरावर काम सुरू आहे, ते झाले की सर्वांच्याच सर्वच शंकांचे निरसन करू असे ते म्हणाले.
आरोग्य व बांधकाम अशा दोन विभागांमधील कार्यक्रमांसाठी महापालिकेत आलेल्या बापट यांनी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महापालिकेची सर्व टीम चांगली आहे, चांगले काम सुरू आहे, ते अधिक चांगले होण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे सांगितले. पाणी योजनेवरून काही नगरसेवकांनी वेगळी बैठक घेतली याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, असे काहीही नाही. भाजपात असे चालत नाही. सुरू असले तर ते चालू देणार नाही. गटबाजीला इथे थारा नाही. पक्षाचे शहरातील सगळे खासदार, आमदार, नगरसेवक एकत्र आहेत. गट वगैरे काहीही नाही असे ते म्हणाले.
विधानसभेचे अधिवेशन आहे. महापालिकेकडून राज्य सरकारशी संबधित काही विषयांची माहिती बरोबर घेतली आहे. ते प्रश्न सोडवणार आहे. त्यासाठी आवश्यकता भासली तर सर्व पदाधिकाºयांची नागपूर येथे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. पुणेकरांचे प्रश्न सोडवा असे आवाहन सर्वच नगरसेवकांना आहे. आमच्या वेळी प्रशासन, अधिकारी, पदाधिकारी व पत्रकार असा एकत्रित संवाद असे. तोच आताही आहे. त्यातून अनेक विषय सुटतात. तसा सल्ला नगरसेवकांना दिला असे बापट यांनी सांगितले. आमचे १०० नगरसेवक आहेत. पाणी योजनेत अनेक तांत्रिक बाबी आहेत. त्यामुळे कोणाला त्यात शंका असणे शक्य आहे. सध्या प्रशासकीय स्तरावर योजनेचे काम सुरू आहे. ते झाले की फक्त नगरसेवकांच्याच काय, अन्य कोणी असतील तर त्यांच्याही शंका दूर करू, असे बापट म्हणाले.

नाराज नगरसेवकांना, त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल असे सांगण्यात आले. याविषयी विचारले असता बापट यांनी कोणाचेही नाव न घेता भाजपात लोकशाही आहे. मुख्यमंत्रीच काय, कोणाला वाटले तर ते पंतप्रधानांनाही भेटून काही सांगू शकतात, असा टोला मारला.

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीत घोंगावणारे समान पाणी योजनेचे वादळ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या ‘गटबाजी चालू देणार नाही’ या वक्तव्यानंतर शमले तर नाहीच उलट जोरात सुरू झाले आहे. महापालिकेत बापट यांनी हे सांगितले त्या वेळी तिथे ‘त्या’ वेगळ्या बैठकीला गेलेले अनेक नगरसेवकही उपस्थित होते. बापट सभागृहातून निघून गेल्यानंतर लगेचच
त्यांची खलबते सुरू झाली. त्यातील काहींनी लगेचच मोबाईलवर योग्य ठिकाणी ही माहिती देण्यास सुरुवातही केली.

पाणी योजनेचे वादळ जोरातच
या योजनेवरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला आधीच विरोधकांना तोंड द्यावे लागत आहे. विविध आरोपांच्या फैरी झाडत त्यांनी या योजनेतील पहिली निविदा रद्द करायला लावली. त्यानंतर आता फेरनिविदाही आरोपांच्या फैरीत सापडली आहे. त्यातच भाजपाच्याच काही नगरसेवकांनी विरोधी आघाडी उघडल्यानंतर अडचणीत वाढ झाली आहे. चुचकारण्याऐेवजी बापट यांनी सोमवारी महापालिकेतील कार्यक्रमात ठणकावल्यामुळे त्यांची थोडी गडबड उडाली आहे, मात्र त्यांच्यातील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी योजना समजावून घेण्याचा नगरसेवक म्हणून आपल्याला हक्कच
आहे असे इतरांना सांगत गडबड कमी करण्याचा प्रयत्न केला.
 


Web Title: BJP will not continue grouping, Guardian Minister's warning
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.