लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख मंडळांचा चांगला पायंडा : वेळ कमी करण्यात मात्र अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 02:07 AM2018-09-25T02:07:23+5:302018-09-25T02:07:46+5:30

Better rules for major circles on Lakshmi road: Failure to reduce time | लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख मंडळांचा चांगला पायंडा : वेळ कमी करण्यात मात्र अपयश

लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख मंडळांचा चांगला पायंडा : वेळ कमी करण्यात मात्र अपयश

googlenewsNext

पुणे : लक्ष्मी रस्त्यावरून मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर भाविकांचे लक्ष संपूर्ण लक्ष लागते ते आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीकडे. जिलब्या मारुती, भाऊ रंगारी, बाबू गेनू, अखिल मंडई, श्रीमंत दगडूशेठ गणपती आदी मंडळांनी दरवर्षीपेक्षा दोन ते अडीच तास अगोदरच विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन एक चांगला पायंडा पाडला. मात्र, ही मिरवणूक रस्त्यामध्ये रेंगाळल्याने विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी होऊ शकला नाही. एक चांगली सुरुवात यानिमित्ताने झाली असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सर्व भाविकांच्या नजरा प्रमुख मंडळांच्या मिरवणुकीकडे लागलेल्या असतात. जिलब्या, भाऊ रंगारी, बाबू गेनू, अखिल मंडई पाठोपाठ श्रीमंत दगडूशेठ गणपती बेलबाग चौकातून मिरवणुकीत सहभागी झाला की त्याचे दर्शन घेऊन लाखो भाविक घरी परततात. यंदा मात्र या मंडळांनी नेहमीपेक्षा दोन ते अडीच तास अगोदर मिरवणुकीत सहभाग घेऊन भाविकांना सुखद धक्का दिला.
मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक पुढे सरकल्यानंतर आदल्या दिवशीपासून बेलबाग चौकात रांगेत थांबलेल्या काही मंडळांना पोलिसांकडून लक्ष्मी रस्त्यावर सोडले जाते. यंदा मात्र पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यामध्ये बदल केला. मानाच्या गणपतींची मिरवणूक पुढे सरकताच जिलब्या मारुती मंडळाची विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकात आली.
ढोलताशांसह पारंपरिक वाद्यांचा गजर करीत मिरवणूक पुढे सरकली. त्यापाठोपाठ ७ वाजून ५० मिनिटांनी भाऊ रंगारी मंडळ बेलबाग चौकात दाखल झाले. त्यानंतर ८ वाजून ११ मिनिटांनी अखिल मंडई मंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. दरवर्षीच्या परंपरेनुसार दगडूशेठ गणपती मध्यरात्री एकच्या सुमारास बेलबाग चौकातून मार्गस्थ होतो. यंदा मात्र अकरा वाजण्याच्या सुमारास दगडूशेठ मंडळाचा विद्युत रोषणाईने सजविलेला रथ बेलबाग चौकात दाखल झाला. लखलखत्या २७ हजार दिव्यांनी उजळलेल्या श्री विश्वविनायक रथातून श्रीमंत दगडूशेठ विराजमान झालेले होते. त्या वेळी भाविकांनी एकच जोरदार जल्लोष केला. दगडूशेठपाठोपाठ श्री गजानन मंडळ व गरुड मंडळ यांची संयुक्त विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकात आली.

पारंपरिक वाद्यांचाच गजर
लक्ष्मी रस्त्यावर दरवर्षीच्या परंपरेनुसार पारंपरिक वाद्यांचाच गजर दिसून येत होता. रूद्रगर्जना, शिवतेज, समर्थ, वर्चस्व आदी अनेक ढोल-ताशा पथकांच्या वादनाने भाविकांना खिळवून ठेवले. यंदा डीजेच्या भिंती उभारण्यावर बंधने आणण्यात आल्याने डीजे घेऊन लक्ष्मी रस्त्यावर येणाºया मंडळांनी केवळ प्रकाशरचनेवर भर दिला. दगडूशेठ गणपती मंडळाच्या लहान मुलांच्या टाळकरी पथकाने लक्ष वेधून घेतले.

मिरवणूक रेंगाळली
लक्ष्मी रस्त्यावर पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा ५ ते ६ जणांची काही पथके गस्त घालत होती. मंडळांनी लवकर पुढे सरकावे यासाठी ती प्रयत्न करीत होती. भाऊ रंगारी, अखिल मंडई, दगडूशेठ आदी प्रमुख मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर मात्र ही मिरवणूक काहीशी रेंगाळली. त्यामुळे प्रमुख मंडळांच्या मिरवणुकीला लवकर सुरुवात होऊनही ती लवकर संपू शकली नाही.

आकर्षक रोषणाई
विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळाचे रथ फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचा रथ २७ हजार दिव्यांनी उजळलेल्या श्री विश्वविनायक रथात विराजमान झाला होता. जिलब्या मारुती मंडळाच्या रथात तिरूपती बालाजी मंदिर साकारण्यात आले होते. गरूड गणेश व गजानन यांचा गणेशमूर्ती हातात घेतल्याचा भव्य रथ सहभागी झाला होता.

पोलिसांच्या प्रयत्नांना यश
पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक खूपच लांबत असल्याने ती लवकर संपवावी, यासाठी दरवर्षी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येतात. मात्र, यापूर्वी त्याला तितकासा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नव्हता. यंदा मात्र प्रमुख मंडळांनी दोन ते अडीच तास अगोदर विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.
पोलिसांकडून अनेक वर्षांपासून केल्या जात असलेल्या प्रयत्नांना यश आले. पोलिसांनी विविध पातळ्यांवर गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांशी सातत्याने संवाद साधला. त्याला मंडळांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मिरवणूक लवकर सुरू होऊ शकली.

गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच हे पाहिले
मी गेली २५ वर्षे सलग बेलबाग चौकातून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत आहे. यंदा पहिल्यांदाच प्रमुख मंडळे इतक्या लवकर मिरवणुकीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. दगडूशेठ गणपती रात्री अकरा वाजता मिरवणुकीत सहभागी झाल्याचे पाहून आश्चर्याचा धक्का बसला. प्रमुख मंडळांनी चांगला पायंडा पाडला आहे. इतर मंडळांनीही असाच सकारात्मक प्रतिसाद देऊन विसर्जन मिरवणुकीची वेळ कमी करावी. - दिनेश वाघ, भाविक
 

Web Title: Better rules for major circles on Lakshmi road: Failure to reduce time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.