अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश; पुणे शहर काँग्रेस सुन्न पण परिणाम शुन्य

By राजू इनामदार | Published: February 13, 2024 05:19 PM2024-02-13T17:19:12+5:302024-02-13T17:20:22+5:30

एकटे अशोक चव्हाण गेले याचा अर्थ आघाडी कमकुवत झाली असे राजकारणात होत नाही; पुण्यातील काँग्रेस नेत्यांचे मत

Ashok Chavan joins BJP Pune City Congress silent but no results | अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश; पुणे शहर काँग्रेस सुन्न पण परिणाम शुन्य

अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश; पुणे शहर काँग्रेस सुन्न पण परिणाम शुन्य

पुणे: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसच्या शहर शाखेत खळबळ झाली, मात्र त्यांच्या या बंडाचा इथे परिणाम शुन्य दिसतो आहे. कोणीही मोठा नेता त्यांच्याबरोबर जाईल अशी स्थिती नाही. चव्हाण प्रदेशाध्यक्ष असताना शहरात त्यांचे चांगले नेटवर्क होते, मात्र त्यानंतर फक्त त्यांचे म्हणता येईल असे कोणी राहिलेले नाही.

लोकसभेचा पुण्यातील जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे. आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना (उद्ध‌व ठाकरे) यांच्याकडून ही जागा लढवण्याबाबत काँग्रेसच्या साह्याने चांगली मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याला धक्का बसला आहे, मात्र काँग्रेसमधील पुण्यातील कोणीही बडा नेता चव्हाण यांच्याबरोबर जाईल अशी आज चर्चासुद्धा नाही. चव्हाण प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे शहरात चांगले नेटवर्क होते, मात्र ते आता राहिलेले नाही. त्यांच्या जवळचे म्हणता येतील अशा काही नेत्यांना विधानसभा तसेच महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाची मोठी अडचण आहे. चव्हाण यांच्याबरोबर गेले तर भाजपा त्यांच्या कार्यकर्त्यांना सोडून यांना उमेदवारी देईल अशी खात्री नाही. अशी राजकीय अडचण असल्यामुळेही चव्हाण यांच्या निकटचे म्हणता येईल अशांनी बंडानंतर त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले आहे.

काँग्रेसच्या सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात या नेत्यांची पुण्यातील काँग्रेसमध्ये खास माणसे आहेत. हे नेते पुण्यात आले की त्यांची सर्व व्यवस्था या खास नेत्यांकडेच असते. चव्हाण यांचे तसे पुण्यात कधीही नव्हते. ते प्रदेशाध्यक्ष असतानाही पुण्यात ते फार वेळा आले असे झालेले नाही. मात्र तरीही त्यांच्या पदामुळे काही नेते त्यांच्या निकट आले होते. पण पद गेल्यानंतर हे नेतेही त्यांच्यापासून बाजूला झाले. नंतर त्यांचाही संपर्क कमी झाला. त्यामुळेच आता त्यांनी पक्षाला सोडले असले तरी त्यांच्याबरोबर लगेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतील इतके त्यांच्या जवळचे पुण्यात कोणीही नाही.

काही माजी आमदार, माजी नगरसेवक अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जात होते. त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सावध भूमिका व्यक्त केली. चव्हाण यांनी ऐनवेळी असा निर्णय का घेतला ते माहिती नाही, मात्र त्यांच्याबरोबर जावे असे वाटत नसल्याचे या नेत्यांनी सांगितले. चव्हाण काँग्रेसचे मोठ्या वर्तुळातील नेते होते, पक्षात त्यांचा तसाही तळापर्यंत असा संपर्क कधीच नव्हता. त्यामुळेच त्यांच्याबरोबर जातील असे पुण्यात कोणीही नाही असे या नेत्यांचे मत आहे. ऐनवेळी पक्ष सोडून गेल्याची टीका होण्याचा धोका त्यांच्यासाठी घ्यावा अशी त्यांच्याबरोबर कधीही जवळीक नसल्याचेच बहुसंख्य नेत्यांचे मत आहे.

भाजपच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढवण्याची महाविकास आघाडी गंभीरपणे तयारी करत आहे. राज्यात आघाडीला अतीशय चांगले वातावरण आहे, तसेच पुण्यातही आहे. एक अशोक चव्हाण गेले याचा अर्थ आघाडी कमकुवत झाली असे राजकारणात होत नाही. त्यांच्या जाण्याने आघाडीत फार फरक पडले असे वाटत नाही, तसेच भाजपलाही त्यांचा फार मोठा फरक पडेल अशीही स्थिती नाही. - मोहन जोशी, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य

Web Title: Ashok Chavan joins BJP Pune City Congress silent but no results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.