तरुणावर ॲसिडसदृ्श रसायन फेकले; खडकीतील महाविद्यालयाच्या वसतीगृहातील प्रकार

By विवेक भुसे | Published: March 26, 2024 04:08 PM2024-03-26T16:08:24+5:302024-03-26T16:09:14+5:30

वसतीगृहातील विद्यार्थ्याने खोडसाळपणे तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन ओतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

An acid-like chemical was thrown at the youth Type of College Hostel in Khadki | तरुणावर ॲसिडसदृ्श रसायन फेकले; खडकीतील महाविद्यालयाच्या वसतीगृहातील प्रकार

तरुणावर ॲसिडसदृ्श रसायन फेकले; खडकीतील महाविद्यालयाच्या वसतीगृहातील प्रकार

पुणे : खडकी येथील महाविद्यालयाच्या वसतीगृहामधील खोलीत झोपलेल्या तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृ्श रसायन फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तरुण जखमी झाला आहे.

या प्रकरणी आशिषकुमार नरेंद्रकुमार दास (वय २४, रा. सिंबायोसिस बाॅईज हाॅस्टेल, रेंजहिल्स) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २३ मार्च रोजी रात्री साठे आठ ते नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण रेंजहिल्स परिसरातील सिंबायोसिस बाॅईज हाॅस्टेलमध्ये राहायला आहे. शनिवारी (२३ मार्च) तो वसतीगृहातील खोलीत रात्री साडेआठच्या सुमारास झोपला होता. त्यावेळी एक जण वसतीगृहातील खोलीत शिरला. त्याने प्लास्टिकच्या मगमध्ये ॲसिडसदृश रसायन भरले. झोपेत असलेल्या आशिषकुमारच्या अंगावर मगमध्ये असलेले रसायन फेकून तो पसार झाला.

झोपेत असलेल्या आशिषकुमारच्या अंगावर रसायन ओतल्याने दाह झाला. त्याने आरडाओरडा केला. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वसतीगृहातील खोलीचा दरवाज्याला बाहेरून कडी लावण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेत दास यांच्या पाठीला भाजले असून त्यांच्यावर सिंबायोसिसच्या लवळे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक रूईकर तपास करत आहेत. पोलिसांनी वसतीगृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. वसतीगृहातील विद्यार्थ्याने खोडसाळपणे आशिषकुमारच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन ओतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: An acid-like chemical was thrown at the youth Type of College Hostel in Khadki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.