आळंदी नगर परिषद शाळेचा वीजपुरवठा खंडित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:58 PM2018-03-15T14:58:39+5:302018-03-15T14:58:39+5:30

आळंदी नगर परिषद शाळा क्रमांक दोनमध्ये वीजबिल न भरल्याच्या कारणावरून वीज महावितरणाची कारवाई

Alandi Nagar Parishad School electric connection cut | आळंदी नगर परिषद शाळेचा वीजपुरवठा खंडित 

आळंदी नगर परिषद शाळेचा वीजपुरवठा खंडित 

googlenewsNext
ठळक मुद्देआळंदी नगरपरिषदेची शाळा : प्रशालेच्या कामावर परिणाम  

आळंदी : येथील नगर परिषद शाळा क्रमांक दोन या शाळेतील वीजपुरवठ्याचे वीजबिल न भरल्याच्या कारणावरून वीज महावितरणाने वीजपुरवठा खंडित केला. यामुळे शाळा क्रमांक दोनमधील संगणकीय कामकाजावर परिणाम झाल्याने प्रशालेतून नाराजीचा सूर उमटत आहे.आळंदी नगर परिषदेकडे १ ते ४ क्रमांकाप्रमाणे चार शाळा इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत भरविल्या जात आहेत. शासनाचे धोरण प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण देण्याचे असताना आळंदीत मात्र याकडे वर्गखोल्या नसल्याच्या कारणावरून दुभार व फक्त सातवी पर्यंत शाळा भरविली जाते. यामुळे अनेक पालक व वारकरी विद्यार्थ्यांना खासगी शाळेत वाढीव शुल्क देऊन प्रवेश घ्यावा लागत आहे. यातून पालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
आळंदी नगर परिषदेची शाळा क्रमांक दोन सर्वांत जुनी ओळखली जात आहे. या प्रशालेतील शिक्षण मंडळाचे कार्यालय वर्गखोल्या नसल्याच्या कारणावरून नगर परिषद इमारतीलगतच्या संकुलात हलविण्यात आले; मात्र या ठिकाणी नगर भूमापनचे कार्यालय अजून वर्गखोलीत कार्यरत आहे. 
या कार्यालयाचे स्थलांतर चौपाल इमारतीत करण्याच्या सूचना दिल्या असतानादेखील शालेय इमारतीत भरविले जात असल्याने पालकांत नाराजी आहे. शालेय इमारतीस वर्गखोल्या नसताना शाळेच्या खोल्या इतर कारणांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांतून देखील नाराजी आहे. या संदर्भात नगराध्यक्षा वैजयंता उमार्गेकर यांनी देखील नगर रचना कार्यालय स्थलांतरित करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. चौपाल इमारतीत आवश्यक त्या दुरुस्त्या करून इमारत वापरास देण्यास मान्यता या पूर्वीच दिली असल्याचे सांगितले.
प्रशालेचा वीजपुरवठा बिल न भरल्याने खंडित करण्यात आला असल्याचे मुख्याध्यापिका छाया परदेशी यांनी सांगितले. याबाबत प्रशासन अधिकारी व मुख्याधिकारी यांना कळविण्यात आले असून, शाळा क्रमांक दोनच्या विविध अडीअडचणी व समस्यांबाबत लेखी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती त्यांनी दिली. या शाळेतील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी तत्काळ नवीन वीजजोड देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शासकीय कामे आता संगणकीकरणावर आधारित असल्याने वीजजोडाची मागणी प्राधान्याने केली आहे. अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे, अडगळीचे साहित्य ठेवण्याची जागा म्हणून पाहिले जात असल्याने आळंदी नगर परिषद प्रशासनाने शालेय मुलांना सुरक्षित आणि हसत-खेळत शिक्षण देण्याची  सुविधा आणि शासनाच्या धोरणाप्रमाणे कामकाज करण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे.
कामकाज हाती घेतल्यानंतर तत्काळ शाळांच्या अडचणी दूर केल्या जातील. शालेय वातावरण निर्मितीला तसेच शैक्षणिक सेवा-सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येईल. चौपल इमारतीची देखभाल दुरुस्ती करून शिक्षण मंडळ कार्यालय, नगर भूमापन कार्यालय एकाच ठिकाणी स्थलांतर करून वर्गखोल्या शाळेस उपलब्ध करून देण्यात येतील. सचिन गिलबिले, सभापती
शाळा क्रमांक दोनचा वीजपुरवठा खंडित केल्याबाबत माहिती मिळाली आहे. मुख्याध्यापिकांचा अर्ज मिळाला आहे. अर्ज शिक्षण मंडळाकडे वर्ग करण्यात येईल. नगर परिषद शाळेचे बिल भरत नव्हते. दत्तात्रय सोनटक्के, विद्युत विभागप्रमुख 
नगर परिषद शिक्षण मंडळ यापूर्वी वीजबिल भरत होते. वीज खंडित झाल्याच्या प्रकाराची चौकशी करून शाळेस वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल. 
    - समीर भूमकर, 
    नगर परिषद मुख्याधिकार

Web Title: Alandi Nagar Parishad School electric connection cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.