ठळक मुद्दे१ नोव्हेंबरपासून नॅककडून मूल्यांकनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणारआवश्यक पल्बिकेशन, सायटेशन, एचइंडेक्स यासारखी माहिती मिळवून देण्यासाठी खासजी एजन्सीज काम करतात.

पुणे : विद्यापीठ व महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक  किचकट झाली आहे. त्यामुळे मूल्यांकनाच्या प्रक्रियेसाठी पैसे घेवून मदत करणार्‍या खासगी एजन्सीज्ला पुढील काळात चांगले दिवस येणार आहेत. मात्र, त्यामुळे शैक्षणिक संस्थांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे.
नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिलने (नॅक) मूल्यांकन प्रक्रियेत बदल केले असून येत्या १ नोव्हेंबरपासून नॅककडून मूल्यांकनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून नॅक मूल्यांकनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच नवीन विद्यापीठ कायद्यात नॅक मूल्यांकन करून न घेणार्‍या महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. परिणामी आत्तापर्यंत नॅककडे दुर्लक्ष केलेल्या महाविद्यालयांना मुल्यांकन करून घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकनासाठी व एनआयआरएफ रॅकिंगच्या कामात मदत करणार्‍या ‘खासगी एजन्सीज्’चा फायदा होणार आहे.
महाविद्यालय सुरू करून पाच किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी झालेल्या महाविद्यालयांना नॅक करून घेभे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश ग्रामीण भागातील व नुकत्याच सुरू झालेल्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अडचणी येतात. यामुळेच अनेक महाविद्यालयांनी अद्याप नॅककडून मूल्यांकन करून घेतलेले नाही. त्यात आता मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्वीपेक्षा किचकट झाली आहे. त्यामुळे मुल्यांकन प्रक्रियेच्या कामातील तज्ज्ञांची मदत घेतल्याशिवाय या महाविद्यालयांपुढे पर्याय उरणार नाही.
विद्यापीठ व महाविद्यालयाच्या इंटरनल क्वालिटी असेसमेंट सेल (आयक्यूएसी) मधील पदाधिकार्‍यांच्या मदतीने नॅक मूल्यांकनाचे काम केले जाते. मात्र, नॅककडून मागविण्यात आलेली माहिती सहजासहजी उपलब्ध होत नाही. नॅकसाठी संबंधित विद्यापीठ व महाविद्यालयाचे पल्बिकेशन, सायटेशन्स, एचइंडेक्स आदी बाबींची नोंद करावी लागते. ही माहिती मिळवून देण्याचे काम खासगी एजन्सीजकडून केले जाते. त्यातच आॅनलाईन सादर केलेल्या माहितीच्या आधारेच संबंधित शैक्षणिक संस्था मूल्यांकन करून घेण्यास पात्र आहे का? हे नॅककडून ठरविले जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण काम करणार्‍या एजन्सीजला चांगले दिवस येणार आहेत. 

नॅकसाठी आवश्यक पल्बिकेशन, सायटेशन, एचइंडेक्स यासारखी माहिती मिळवून देण्यासाठी खासजी एजन्सीज काम करतात. त्यात नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया बदलली असून ती समजून घेण्यासाठी काही कालावधी द्यावा लागणार आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकनाच्या क्षेत्रात काम करणार्‍या खासगी एजन्सीजचा नक्कीच फायदा होणार आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, प्रमुख, आयक्यूएसी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ