'ए' पाॅझिटिव्ह 'बी' ला, 'बी' पाॅझिटिव्ह 'ए' ला; रुग्णांच्या रक्ताची अदला बदल, जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: March 25, 2024 05:16 PM2024-03-25T17:16:55+5:302024-03-25T17:17:34+5:30

रक्तपिशवी अदलाबदली केल्याने दाेन्ही रुग्णांना त्रास होऊन त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे

A positive blood to B B positive to A Blood exchange of patients a shocking case in the district hospital | 'ए' पाॅझिटिव्ह 'बी' ला, 'बी' पाॅझिटिव्ह 'ए' ला; रुग्णांच्या रक्ताची अदला बदल, जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

'ए' पाॅझिटिव्ह 'बी' ला, 'बी' पाॅझिटिव्ह 'ए' ला; रुग्णांच्या रक्ताची अदला बदल, जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

पुणे : औंध येथील जिल्हा रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याच्या तक्रारी येत होत्या मात्र शनिवारी मात्र यामध्ये कहरच झाला. येथे उपचारासाठी दाखल असलेल्या दाेन रुग्णांना एका परिचारिकेचा निष्काळजीपणाचा फटका बसला. या परिचारिकेने शेजारी - शेजारी असलेल्या पेशंटना त्यांच्या नावे आलेली रक्तपिशवी देण्याऐवजी त्याची अदलाबदली केली. त्यामुळे, या दाेन्ही रुग्णांना त्रास झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. 

औंध येथील इंदिरा वसाहतीत राहणारे दत्तू सोनाजी सोनवणे यांना दि.21 मार्च  रोजी दुपारी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमाेनिया झाल्याने श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांचे हात पाय सुजले व पोट फुगलेले होते त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दोन-तीन दिवस ऍडमिट करण्याचा सल्ला दिला.

त्यांच्यावर रुग्णालयात दोन-तीन दिवस उपचार सुरू असतानाच शनिवारी दि. 23 रोजी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची रक्त तपासणी केली सोनवणे यांना रक्त चढवण्याची सूचना तेथील परिचारिकेला दिली. त्याचवेळी शेजारीच आणखी एक रुग्ण दगडू कांबळे यांना देखील रक्त चढवायचे हाेते. साेनवणे यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह तर कांबळे यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह हाेता.

त्यांच्या नावाने रक्ताच्या पिशव्या देखील आल्या. मात्र, संबंधित डयूटीवरील परिचारिकेने निष्काळजीपणा करत सोनवणे यांची पिशवी कांबळे यांना तर कांबळे यांची पिशवी साेनावणे यांना चढवली. विरूध्द रक्त चढवल्याने त्यांना त्याची रिॲक्शन आल्यानंतर व नातेवाईकांनी तक्रार केल्यावर त्या रक्तपिशव्या काढण्यात आल्या आणि रुग्ण कांबळे व साेनावणे यांना तात्काळ आयसीयु कक्षात उपचारासाठी शिफट करण्यात आले. आता दाेघांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले यांनी सांगितले.

परिचारिका माेबाईलवर...

दोन्ही रुग्णांना रक्त चढवीत असताना संबंधित परिचारिका मोबाईलवर बोलत असल्याने हा निष्काळजीपणा झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. ज्या मेडिसिन वाॅर्डमध्ये उपचार सूरू हाेते ताे डाॅ. किरण खलाटे यांच्या अंतर्गत आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

आमदार अश्विनी जगताप यांनी दिली भेट

या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांनी तातडीने  घटनास्थळी जात रुग्णांची व नातेवाईकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करत झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. तसेच डयूटीवरील डाॅक्टर, परिचारिकांना याबाबत धारेवर धरले. तसेच तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश व दोषींवर कारवाई  करण्याच्या सूचना त्यांनी  दिल्या

या प्रकरणाचा चाैकशी अहवाल मागवला आहे. चाैकशी अहवाल आल्यावर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. - डाॅ. राधाकिशन पवार, आराेग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ

Web Title: A positive blood to B B positive to A Blood exchange of patients a shocking case in the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.