समता सहकारी बँकेतील १४५ काेटींचा गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:30 PM2024-05-16T12:30:21+5:302024-05-16T12:31:22+5:30

फरारी आरोपी गेली १७ वर्षे पुणे, मुंबईसह तेलंगणा राज्यात ओळख लपवून वास्तव्य करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे....

145 crore embezzlement in Samata Cooperative Bank: Identity hidden for 17 years, fugitive accused arrested in Hyderabad | समता सहकारी बँकेतील १४५ काेटींचा गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद

समता सहकारी बँकेतील १४५ काेटींचा गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद

पुणे :नागपूरमधील समता सहकारी बँकेला १४५ कोटींचा चुना लावणाऱ्या फरारी आराेपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने हैदराबाद येथून अटक केली. फरारी आरोपी गेली १७ वर्षे पुणे, मुंबईसह तेलंगणा राज्यात ओळख लपवून वास्तव्य करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

विजयकुमार रामचंद्र दायमा (रा. फेअर व्ह्यू सोसायटी, गोदावरी होम्स, हैदराबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नागपूर येथील समता सहकारी बँकेतील अधिकारी, कर्मचारी, बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाने बनावट कर्जप्रकरणे सादर करून १४५ कोटी ६० लाख रुपयांचा गैरव्यवहार केला होता. या प्रकरणी नागपूरमधील सीताबर्डी पोलिस ठाण्यात २००७ साली अपहार, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी ५७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती विचारात घेता या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडून सीआयडीच्या नागपूर कार्यालयाकडे सोपवण्यात आला होता. सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. दायमा गेली १७ वर्षे पुणे, मुंबई आणि तेलंगणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत होता.

तो हैदराबादमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती सीआयडीच्या पुणे कार्यालयातील पथकाला मिळाली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला हैदराबाद येथून अटक केली. त्याला नागपूरमधील सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले आहे. सीआयडीच्या पुणे कार्यालयाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. दिलीप पाटील- भुजबळ, पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंद रावडे, हवालदार विकास काेळी, सुनील बनसोडे आणि प्रदीप चव्हाण यांनी ही कामगिरी केली.

Web Title: 145 crore embezzlement in Samata Cooperative Bank: Identity hidden for 17 years, fugitive accused arrested in Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.