उद्योगनगरीला राहण्यायोग्य शहर करणार- राहुल जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 02:22 AM2018-09-16T02:22:08+5:302018-09-16T02:22:25+5:30

वाहतूक व स्वच्छताविषयक शिक्षण देण्याचे नियोजन

Will make the city a livable city - Rahul Jadhav | उद्योगनगरीला राहण्यायोग्य शहर करणार- राहुल जाधव

उद्योगनगरीला राहण्यायोग्य शहर करणार- राहुल जाधव

Next

पिंपरी : लोकसंख्या अधिक असल्याने उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील समस्याही अधिक आहेत. या समस्यांवर मात करून शहराला राहण्यायोग्य शहर नक्की करणार आहे. २०३० पर्यंत शहरातील शाळांमध्ये वाहतूक व स्वच्छतेविषयी शिक्षण देण्याचे नियोजन केले जाणार आहे. खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट सिटी केले जाईल, असा दावा महापौर राहुल जाधव यांनी केला आहे.
आर्मेनिया देशातील येरेव्हान शहरातील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेस महापौर जाधव गेले होते. या परिषदेमध्ये जगातील रशिया, लंडन, फिलीपाईन्स, चीन, टांझानिया, स्पेन, बेल्जियम, बांग्लादेश, श्रीलंका अशा जवळपास ७६ देशांचे महापौर उपस्थित होते. भारतातून पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर जाधव यांना उपस्थित राहून आधुनिक शहर विकासाबाबत चर्चा करता आली. या परिषदेमध्ये स्वयंपूर्ण शहरे, पब्लिक ट्रान्सपोर्ट, नियोजनपूर्ण शहरांचा शाश्वत विकास, शहरांच्या विकासा संदर्भात कायदे व धोरणे याविषयी कार्यशाळा तसेच विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या सोबत येरव्हन शहरातील महापालिकेच्या विविध प्रकल्पांना तसेच महापालिकेत भेटी इ. आयोजन करण्यात आले होते.
महापौर जाधव म्हणाले,‘‘येरव्हन, आर्मेनिया येथे यांत्रिक पद्धतीने करण्यात येत असलेली साफसफाई, स्वच्छ पाणीपुरवठा योजना व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारची दिसून आली. तेथील नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. विद्यार्थी दशेतच त्यांना वाहतूक व स्वच्छतेविषयी शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होत असतो. याचा विचार करता पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्येही वाहतूक व स्वच्छतेविषयी शिक्षण देण्याचे नियोजन केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद
महापौरांनी विद्यार्थी संवादाचा अनुभव सांगितला. जाधव म्हणाले,‘‘येरव्हन, आर्मेनिया येथे राहत असलेले पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधता आला. त्याला प्रतिसाद देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी भारतातील विद्यार्थी भाराऊन गेले होते.’’

महापौरांबरोबर शहराच्या विकासाच्या संदर्भात उपस्थितांनी चर्चा केली. तसेच त्यांना पिंपरी-चिंचवड शहरात राबविलेले विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी भेटीचे निमंत्रण दिले. या भेटीमधून शहराच्या विकासाच्या दृष्टीने काही तांत्रिक तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वैविध्यपूर्ण प्रकल्पाबद्दल मदत होऊ शकते, याबद्दलही चर्चा झाली.

Web Title: Will make the city a livable city - Rahul Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.