अतिजोखमीचे रुग्ण ठरतायेत बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:21 AM2018-10-25T01:21:59+5:302018-10-25T01:22:06+5:30

स्वाइन फ्लू या आजाराने जुलै महिन्यापासून शहरात थैमान घातले आहे. त्याची तीव्रता अद्याप कमी झाली नाही.

Victims of high risk patients | अतिजोखमीचे रुग्ण ठरतायेत बळी

अतिजोखमीचे रुग्ण ठरतायेत बळी

Next

- प्रकाश गायकर 

पिंपरी : स्वाइन फ्लू या आजाराने जुलै महिन्यापासून शहरात थैमान घातले आहे. त्याची तीव्रता अद्याप कमी झाली नाही. दिवसागणिक दोन ते तीन रुग्णांना या आजाराची लागण होत असून, मृतांची संख्याही वाढत आहे. या आजाराने आतापर्यंत ३३ रुग्ण दगावले आहेत. स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी बहुतांशी रुग्णांना अतिजोखमीचे इतर आजार असल्याचे समोर आले आहे. इतर आजारांमुळे प्रतिकार क्षमता कमी झाल्याने हे रुग्ण स्वाइन फ्लूचे बळी ठरत आहेत.
स्वाइन फ्लूने जानेवारी महिन्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जून महिन्यापर्यंत या आजाराची तीव्रता कमी झालेली पाहयला मिळाली. मात्र जुलैमध्ये अचानक डोके वर काढत या आजारांने तब्बल ३२ जणांचा बळी घेतला. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १७ रुग्णांना हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंड, कर्करोग, उच्च रक्तदाब यांसारखे अतिजोखमीचे आजार होते. तसेच दगावलेले रुग्ण व बाधित रुग्णांमध्ये ३० वर्ष वयोगटापासून पुढील संख्या अधिक आहे. २०१५ साली तब्बल ६४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यानंतर २४ तासांत टॅमी फ्लूची गोळी घेणे आवश्यक आहे. या आजाराचा धोका ओळखून नागरिकांनी वेळेत उपचार घेण्याची आवश्यकता आहे. मात्र बहुतांश वेळा नागरिकांकडून उपचार घेण्यासाठी चालढकल केली जाते. परिणामी हा आजार बळावत जाऊन रुग्ण दगावल्याच्या घटना शहरामध्ये घडल्या आहेत. नागरिक हा आजार बळावल्यानंतर उपचारास सुरुवात करतात. तोपर्यंत स्वाइन फ्लूच्या विषाणूंनी ‘ओव्हर स्टेज’ गाठलेली असते. अनेकवेळा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती करूनही नागरिकांकडून हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध असूनही नागरिकांनी वेळेत लस न घेतल्याने स्वाइन फ्लूचा आजार बळावला आहे. राज्यातील महापालिका स्वायत्त असल्याने पालिकांतर्गत क्षेत्रात आवश्यकतेनुसार टॅमी फ्लू लस पुरवण्यास शासनाने नकार दिला. परिणामी काही प्रमाणात लसीची कमतरता जाणवली. राज्य सरकारने केवळ एक हजार लस उपलब्ध करून दिली होती. महापालिकेने आतापर्यंत सुमारे तीस हजार लस खरेदी केली आहे.अतिजोखमीच्या रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. लक्षणे आढळताच रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा रुग्णालयात जाऊन तपासणी करावी.
>स्वाइन फ्लू आजार आटोक्यात आणण्यासाठीआरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. आतापर्यंत दगावलेल्या रुग्णांपैकी पन्नास टक्के रुग्ण इतर आजारांनी त्रस्त होते. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घेतले पाहिजेत.
- डॉ. लक्ष्मण गोफणे,
समन्वयक, स्वाइन फ्लू विभाग
पिं. चिं. महापालिका

Web Title: Victims of high risk patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.