भुयारी मार्गात वाहनांचा होतोय खोळंबा; पुलाची उंची कमी असल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:54 AM2018-07-26T02:54:26+5:302018-07-26T02:54:49+5:30

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर ताथवडे, पुनावळे येथील समस्या

Vehicular discovery of vehicles in subways; The result of the height of the height of the bridge | भुयारी मार्गात वाहनांचा होतोय खोळंबा; पुलाची उंची कमी असल्याचा परिणाम

भुयारी मार्गात वाहनांचा होतोय खोळंबा; पुलाची उंची कमी असल्याचा परिणाम

Next

वाकड : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर भुयारी मार्गाच्या पुलाची उंची कमी असल्याने वाहनांचा खोळंबा होत आहे. ताथवडे-पुनावळेदरम्यानच्या या भुयारी मार्गात पाणी साचून वाहनांचा खोळंबा होऊन कोंडी होत आहे. या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्त्याच्या ताथवडे आणि पुनावळेदरम्यानच्या भुयारी मार्गाच्या पुलाची ही समस्या आहे. पुलाखाली सखल भाग असल्याने या भुयारी मार्गात पाणी साचते.

पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. बाह्यवळण मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी आयआरबी या कंपनीकडे आहे. या कंपनीने संबंधित पुलाची उंची वाढवून ही समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पहिल्याच पावसात यंदा या पुलाखाली तब्बल पाच ते सहा फूट पाणी साचले होते. पाण्याचा निचरा होत नसल्याने गेल्या सहा वर्षांपासून दर पावसाळ्यात येथे पाणी साठते. वाहतूक ठप्प होते़ काही काळ गावांचा संपर्क तुटतो. जेव्हा काही प्रमाणात पाणी ओसरते तेव्हा जोखीम पत्करून वाहनचालकांना ये-जा करावी लागते.

गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या भेडसावत आहे. मात्र तेव्हा लोकसंख्या विरळ असल्याने या समस्येची तीव्रता एवढी जाणवत नव्हती. मात्र या पंचक्रोशीत अनेक मोठे गृहप्रकल्प उभे राहिल्याने प्रामुख्याने आयटीत काम करणारे आयटीयन्स येथे वास्तव्यास आले. त्यामुळे दोन वर्षांपासून लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. येथे राहण्यास आलेले आयटीयन्स वाकड भूमकर चौकमार्गे न जाता पर्यायी व विना कोंडीचा मार्ग म्हणून जांबे-पुनावळे-मारुंजी मार्गे जात असल्याने या सर्वांना या पुलांचा वापर करून पुढे जावे लागते. मात्र या समस्येमुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने आयटीयन्ससह सर्वांनाच मनस्तापाला सामोरे जावे लागते. या समस्येची प्राधिकरण प्रशासनाला गंभीरता नाही. यावर कायमचा तोडगा काढून भुयारी मार्गाची उंची वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.

रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे पुनावळे आणि ताथवडे येथील भुयारी मार्गाच्या पुलाजवळ रोजच वाहतूक समस्येला सामोरे जावे लागते. हे काम त्वरित करावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते व हमारा साथी हेल्पलाइनचे समन्वयक संदीप पवार यांनी आयआरबीला नुकतेच निवेदन दिले होते. नागरीकरणामुळे या भागात १० वर्षांत प्रचंड मोठा बदल झाला. शहरीकरण झाले. त्यामुळे एक दोन भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यापेक्षा सर्वच पुलांचे सर्वेक्षण करून भविष्यातील गरजेप्रमाणे जागोजागी नवीन भुयारी मार्ग उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त आणि आम्ही असा एकत्र प्रस्ताव करून ते केंद्राकडे पाठविला तर त्याला त्वरित मंजुरी मिळून काम जलद होईल, अशी एखादी एकत्रित बैठकीचे आयोजन होणे अपेक्षित आहे.
- मिलिंद वाबळे, कार्यकारी अभियंता, आयआरबी

पावसामुळे कामे करण्यास अडथळा
भुयारी मार्गाची समस्या लवकर सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र काही वेळा पाऊस असल्यामुळे कामे करता येत नाहीत. पावसाचा अंदाज बघून लवकरच ही समस्या सोडविली जाईल, असे आयआरबीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनाही दिलासा मिळेल.
- राहुल कलाटे, शिवसेना गटनेता, महापालिका

त्वरित उपाययोजना करण्याची गरज
गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. यासाठी मी वारंवार पाठपुरावा केला़ मात्र आयआरबी प्रशासनाने याकडे नेहमीच काणाडोळा केला़ या पावसाळ्यात ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. त्यामुळे हे काम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी सारथी हेल्पलाईनचे समन्वयक संदीप पवार यांनी केली आहे.

पावसाळ्यात वाहतुकीची समस्या
महामार्गाच्या कामानंतर या रस्त्याची उंची वाढली हे काम करताना भुयारी मार्गाचा कुठलाही विचार करण्यात आला नाही. रस्ता उंच झाल्याने भुयारी मार्गात सखल भाग तयार झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात भुयारी मार्गात सखल भागात पाणी साचते. पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे तासन्तास वाहतूक ठप्प होते. याचा सर्वांनाच नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागतो मनस्ताप
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगतचा हा भाग नव्याने विकसित होत आहे. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधून पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने रावेत, देहूरोड, प्राधिकरण, चिंचवड आदी भागांत जाण्यासाठी नागरिक या पर्यायी मार्गाचा वापर करतात. उच्च शिक्षण देणाऱ्या असंख्य नामांकित शिक्षण संस्था व शाळा या भागात आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची येथे मोठी वर्दळ असते. त्यांचीही मोठी हेळसांड होते.

Web Title: Vehicular discovery of vehicles in subways; The result of the height of the height of the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.