भाजपाचा आधारवड हरपला, अटलबिहारी वाजपेयी यांना उद्योगनगरीतून श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:21 AM2018-08-17T00:21:34+5:302018-08-17T00:21:36+5:30

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. ‘‘पक्षवाढीसाठी अटलजींचे योगदान मोलाचे होते़ भाजपाचा आधारवड हरपला, अशा भावना उद्योगनगरीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.

Tribute to Atal Bihari Vajpayee in the Pimpari-Chinchwad | भाजपाचा आधारवड हरपला, अटलबिहारी वाजपेयी यांना उद्योगनगरीतून श्रद्धांजली

भाजपाचा आधारवड हरपला, अटलबिहारी वाजपेयी यांना उद्योगनगरीतून श्रद्धांजली

googlenewsNext

पिंपरी  - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. ‘‘पक्षवाढीसाठी अटलजींचे योगदान मोलाचे होते़ भाजपाचा आधारवड हरपला, अशा भावना उद्योगनगरीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अटलजींच्या आठवणींनी उजाळा दिला. शहरातील राजकीय पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा अटलजींशी थेट संपर्क होता. अशा मान्यवरांनी त्या आठवणी कथन केल्या.
शहर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संस्था आणि संघटनांतर्फे अटलजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. अटलजींच्या निधनाने महापालिकेच्या वतीने होणारे नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. महापालिकेच्या स्वच्छता विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन होणार नसल्याचे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

वाजपेयी यांच्या निधनामुळे केवळ भाजपाचे नाही तर, संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे. वाजपेयींनी देशात प्रमुख महामार्ग बनवून ती जोडण्याची योजना राबविल्याने वाहतूक सुरळीत होऊन अनेक मोठी शहरे एकमेकांना जोडली गेली आहेत. परिणामी बाजारपेठा जोडल्या जाऊन, देशातील आर्थिक स्थिती बळकट होत गेली. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करीत आहे.
- राहुल जाधव, महापौर

माझे वडील स्वर्गीय विश्वनाथराव भेगडे यांच्यामुळे मला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना जवळून पाहण्याचे भाग्य मिळाले. देशाचा महान सुपुत्र आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. आपल्या ध्येयांशी प्रामाणिक राहून त्यांनी भारताचे नाव जगात उज्ज्वल केले. विरोधात असताना इंदिरा गांधी यांनी बांगला देशाच्या युद्धात विजय मिळवला. त्या वेळी त्यांचा आवर्जून ‘दुर्गा’ असा उल्लेख करून, ज्या वेळी देशाचा प्रतिष्ठेचा विषय असतो तेव्हा आम्ही एक असतो, असा संदेश अटलजींनी दिला होता. वाजपेयी यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.
- संजय भेगडे, आमदार

वाजपेयी हे कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी विविध अंगी ओळख असलेले अटलबिहारी वाजपेयी असे मोठं नेतृत्व देशाने गमावले आहे. देशहित हेच त्यांचे पहिले प्राधान्य होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी भरीव योगदान दिले. १९९१ मध्ये भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि वाजपेयींच्या काळात त्याला गती देण्यात आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.
- महेश लांडगे, आमदार

अटलबिहारी वाजपेयी यांचे वक्तृत्व, मनमोहक हास्य लोकांना आपलं करून जायचे़ त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात हिंदीत भाषण केले होते. हिंदीत भाषण करणारे ते भारताचे पहिले विदेश मंत्री होते. तसेच भारत व पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली होती. त्यांच्या भाषणातील ‘रग रग से हिंदू हूँ’’ म्हणणारा हिंदुत्ववादाचा हुंकार असो, किंवा सर्वधर्माच्या नागरिकांना समान वागणूक देणारा राजधर्म पाळण्याचा सर्वधर्मसमभावाचा विचार असो, अटलबिहारी वाजपेयी जीवनाच्या प्रत्येक सतरावर अग्रणी राहिले.
- लक्ष्मण जगताप, आमदार

वाजपेयी हे दैवदुर्लभ नेतृत्व होते. त्याच्या पंतप्रधान काळातील कामांमुळे आज भाजपा या स्थितीत आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ते भाजपाचे उमेदवार विराज काकडे यांच्या प्रचारसभेला भोसरीत आले होते. त्यांच्या सभेला तब्बल एक लाख लोकांनी गर्दी केली होती. त्या वेळी पक्ष कार्यकर्ते म्हणून प्रचाराची जबाबदारी आमच्यावर होती. सभेत त्यांची भेट झाली होती़ त्यांच्या निधनामुळे भारताची मोठी हानी झाली असून, भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहील.
- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते

Web Title: Tribute to Atal Bihari Vajpayee in the Pimpari-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.