Training ghat during the examination; Resistance to Jesus, students will get academic losses | परीक्षा काळात प्रशिक्षणाचा घाट; ‘ईसा’चा विरोध, विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान

पिंपरी : नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओपन स्कूलिंग योजनेअंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक शाळेत क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना सलग पंधरा दिवस प्रशिक्षणाचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या शक्यता असल्याने शहरातील ‘ईसा’ (इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन) संघटनेने प्रशिक्षणास विरोध दर्शविला आहे.
‘ईसा’च्या वतीने शिक्षण विभाग व शिक्षण अधिका-यांना त्याविषयीचे निवेदन दिले आहे, अशी माहिती अध्यक्षा जागृती धर्माधिकारी यांनी दिली. एस. श्रीधर, राजेंद्र सिंग, व्ही.जे पवार, विद्या नाळे, वृषाली बागुल, डॉ. सोनिया बेलगावकर, राजीव मैंदीरता, मारूती काटे उपस्थित होते. आरटीई कायद्याअंतर्गत शिक्षक डीएड किंवा बीपीएड असावा. त्यांच्याकडे जर ही पदवी नसेल अथवा तो प्रशिक्षित नसेल, तर एनआयओएसअंतर्गत पंधरा दिवस चालणारे प्रशिक्षण घेणे व त्यास ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. अन्यथा त्या शिक्षकास प्रशिक्षणाची परीक्षा देता येणार नाही, अशा जाचक अटी टाकल्या आहेत.
पिंपरीतील एका महाविद्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणास प्रत्येक शाळेतून एका वेळेस पाच ते सहा शिक्षकांना बोलविले आहे. शिक्षक सलग १५ दिवस उपस्थित राहिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. प्रशिक्षण हे केवळ मराठीमध्ये असल्याने इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना अडचणी येत आहेत. शिक्षण विभागाकडून कोणतीच माहिती पुरविली न गेल्यामुळे अनेक शिक्षकांना या प्रशिक्षणाची नोंद करता आलेली नाही. अशा पध्दतीने प्रशिक्षणासाठी असलेल्या जाचक अटी आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे आम्ही या प्रशिक्षणास विरोध करीत असून, प्रशिक्षणास शिक्षकांना पाठवणार नाही, अशी भूमिका असोसिएशनच्या वतीने धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.

आॅनलाइनची मागणी
- प्रशिक्षण हे शैक्षणिक कालावधीत न ठेवता शालेय सुटीच्या काळात किंवा साप्ताहिक सुटी (शनिवार, रविवार) दिवशी घ्यावे .
- प्रशिक्षण मराठीसह इंग्रजीत द्यावे.
- प्रशिक्षण व्हिडीओ माध्यमातून दिले जाते. हे व्हिडीओ संस्थेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध
- हे प्रशिक्षण आॅनलाइन माध्यमातून आखून त्यानंतर परीक्षा देण्याची मुभा द्यावी.