पिंपरी चिंचवड महापालिकेने पंतप्रधानांना अंधारात ठेवून उरकले वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: October 4, 2023 07:23 PM2023-10-04T19:23:08+5:302023-10-04T19:23:55+5:30

दोन महिने होऊनही पूर्ण क्षमतेने नाही सुरू...

The Pimpri Chinchwad Municipal Corporation kept the Prime Minister in the dark about the inauguration of the Waste to Energy project | पिंपरी चिंचवड महापालिकेने पंतप्रधानांना अंधारात ठेवून उरकले वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन

पिंपरी चिंचवड महापालिकेने पंतप्रधानांना अंधारात ठेवून उरकले वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेने मोठा गाजावाजा करीत मोशी येथील कचरा डेपोत कचऱ्यापासून १४ मेगावॅट वीज निर्मितीचा (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्प सुरू केला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दोन महिने उलटूनही अद्याप पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू झाली नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने पंतप्रधानांना अंधारात ठेवून या प्रकल्पाचे घाईघाईत उद्घाटन आटोपले का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरभरातून मोशी कचरा डेपोत जमा होणाऱ्या ७०० टन सुक्या कचऱ्यावरील वीजनिर्मितीचा प्रकल्प पीपीप तत्त्वावर उभारला आहे. प्रकल्पास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने १२ एप्रिल २०१८ ला मंजुरी दिली होती. कामाची मुदत १८ महिने होती. रखडतखडत अखेर प्रकल्प पूर्ण झाला. त्यासाठी १००० टन क्षमतेचा मटेरिअल रिकव्हरी फॅसिसिटी (एआरएफ) उभारण्यात आला. प्रकल्पासाठी ३०० कोटीचा खर्च झाला असून, महापालिकेने ५० कोटींचे अनुदान, तसेच आवश्यक कचरा आणि जागा दिली आहे.

या प्रकल्पात कचऱ्यापासून प्रत्येक तासाला १४ मेगावॅट वीज तयार केली जाणार आहे. ही वीज महापालिकेस २१ वर्षे केवळ पाच रुपये प्रतियुनिट दराने (महावितरणचा सध्याचा दर ७.५० रुपये प्रतियुनिट आहे) उपलब्ध होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील वीज निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धिकरण केंद्र, रावेत येथील अशुद्ध उपसा पाणी केंद्र आणि शहरातील विविध ११ मैला सांडपाणी जलशुद्धिकरण केंद्रांत वापरण्यात येणार आहे. ती वीज भोसरीतील इंद्रायणीनगर येथील महापारेषण कंपनीच्या क्रमांक दोनच्या वीज उपकेंद्राच्या २२ केव्ही ग्रिडला जोडण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी प्रकल्पाचे उद्घाटन करूनही महापारेषण व महावितरण कंपनीने वीज घेतली नव्हती. त्यामुळे एक महिना प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला नव्हता.

दोन महिने प्रतीक्षा- 

वेस्ट टू एनर्जी प्रकल्प १०० टक्के कार्यान्वित आहे. तशा चाचण्याही झाल्या आहेत. मात्र, सध्या आठ मेगावॅट वीज तयार केली जात आहे. त्याची क्षमता वाढवून पुढच्या महिन्यात १२ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यानंतर १४ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे.
- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता

Web Title: The Pimpri Chinchwad Municipal Corporation kept the Prime Minister in the dark about the inauguration of the Waste to Energy project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.