strike in Kamshet to avoid inappropriate incident; Most of all shops closed | अनुचित प्रकार टाळत कामशेतमध्ये कडकडीत बंद; बहुतांश सर्व दुकाने बंद

ठळक मुद्देकामशेत शहरातील बाजारपेठ दिवसभर ओस, सर्वत्र शुकशुकाटसोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवर केली जाणार कडक कारवाई 

कामशेत : भीमा कोरेगाव येथे झालेल्या वादामुळे निर्माण झालेल्या जातीय तेढ या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी व भीम सैनिकांनी पुकारलेल्या मावळ बंदला कामशेत शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. यावेळी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट), मावळ तालुका यांच्यावतीने कामशेत बंदचे निवेदन पोलीस ठाण्यात देण्यात आले होते.
कामशेत शहरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश सर्व दुकाने बंद होती. याचवेळी शहरातील दवाखाने, मेडिकल या आरोग्य सेवा अंशत: सुरू होत्या. याचप्रमाणे शहरातील पंडित नेहरू विद्यालय हे नेहमी प्रमाणे सुरू होते. जनजीवन सुरळीत सुरू होते. कोठे ही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारी दोन च्या सुमारास देहूरोड ते लोणावळा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व भारिप बहुजन महासंघ यांच्या वतीने सुरुवात करण्यात आली. यावेळी कामशेत पोलीस ठाणे येथून ते पंडित नेहरू विद्यालय या मार्गी रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, मावळ तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, केंद्र्रीय सदस्य रवींद्र्र भवार, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माऊली सोनवणे, नाणे मावळ अध्यक्ष विलास गायकवाड, रवी भवार, मधू कांबळे, अमित वंजारी, प्रमोद गायकवाड, रोहिदास सोनवणे, प्रशांत थोरात, संदीप ओव्हाळ, बाळासाहेब शिंदे, जयराम साळवे, प्रकाश गायकवाड, बबन वंजारी, बाळकृष्ण टपाले आदी उपस्थित होते.
शहरातून गेलेल्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीवर या बंदचा जास्त परिणाम झाला नाही. मात्र शहरातील व आजूबाजूच्या खाजगी शाळांनी बंदच्या भीतीने अचानक अघोषित सुट्टी जाहीर केल्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस न आल्याने पालकांची गडबड झाली. तर अनेक पालकांनी शाळांमध्ये फोन करून शाळा सुरू आहे की नाही याची चौकशी केली. याच प्रमाणे कामशेत शहरातील पवनानगर फाट्यावर असणाऱ्या मजूर अड्ड्यांवर बंदचा मोठा परिणाम झाल्याचे दिसले असून अनेक मजूर काम न मिळाल्याने घरी रिकाम्या हाताने परतले. शहरातील सर्व दुकानदारांनी १०० टक्के बंद पळाला. त्यामुळे कामशेत शहरातील बाजारपेठ दिवसभर ओस पडली होती. सर्वत्र शुकशुकाट होता. 

कामशेत व परिसरामध्ये सर्वत्र शांततापूर्ण वातावरण असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर शिवाय कोणत्याही प्रकारचा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
- आय. एस. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामशेत पोलीस ठाणे